गिधाडांच्या अस्तित्वाने निसर्गप्रेमी सुखावले

सध्या अतिशय दुर्मीळ झालेल्या किंबहुना नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या गिधाडांचे अस्तित्व अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड आणि विश्रामगडाच्या परिसरात आढळून आले आहे. नगर जिल्ह्य़ात पश्चिमेकडील हरिश्चंद्रगडाच्या आसमंतात गिधाडांची एक जोडी आकाशात घिरटय़ा घालताना दिसते, तर विश्रामगड परिसरात पाच सहा गिधाडे पाहिल्याचे निसर्गप्रेमी सांगतात. जैव साखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या या पक्षी जातीच्या जतन संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमी तसेच काही स्वयंसेवी संस्थांकडून प्रयत्न सुरू  आहेत, मात्र ते अतिशय तोकडे आहेत. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील त्यांचे वास्तव्य लक्षात घेऊन वन्यजीव विभागाने नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या या पक्षी प्रजातीच्या संरक्षण व संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
गिधाडे मृतोपजीवी आहेत. मेलेल्या जनावरांचे मांस खाऊन ती जगतात. गिधाडांच्या जठरातील आम्ल अतिशय क्षरणकारी असते. त्यामुळे विविध जिवाणूंनी संसर्गित झालेले (सडलेले) मृतदेहाचे मांस ते सहजरीत्या पचवू शकतात. मृतोपजीवी असल्याने पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास ते मदत करतात.
निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी काही वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण भागात सहज दृष्टीस पडायचा. खेडोपाडी शिवारात एखादे जनावर मरून पडले की काही तासांतच गिधाडे तेथून घिरटय़ा घालू लागायचे, परंतु अलीकडे या पक्षाचे दर्शन दुर्लभ झाले असून ही पक्षी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याला कारणीभूत ठरले आहे ते पाळीव जनावरांवर उपचार करताना वापरले जाणारे डायक्लोफिनॅक हे औषध. हे औषध घेतलेली जनावरे मेल्यानंतर त्यांचे मांस गिधाडांनी खाल्ले तर काही दिवसांतच ती मरतात. मध्यंतरीच्या काळात या औषधाचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला तो गिधाडांच्या मुळावर आला. हे औषध घेतलेल्या जनावरांचे मांस खाऊन मोठय़ा प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडली. बघताबघता ही पक्षी प्रजातीच आज विनाशाच्या उंबरठय़ावर उभी आहे. निसर्गातील त्यांचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी निसर्गप्रेमींना झगडावे लागत आहे.
गिधाडांची घरटी उंच झाडांवर, खडकांच्या कपारीत अथवा जुन्या पडक्या इमारतींच्या तटबंदीतील कोनाडे अशा दुर्गम ठिकाणी असतात. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाच्या कपारीत काही गिधाडांची वस्ती होती. जैववैविध्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगडाच्या आसमंतात गिधाडांची जोडी विहार करताना अनेकदा दिसते. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत चार ते पाच गिधाडे तेथे दिसायची, परंतु आता मात्र केवळ एक जोडी तेथे दिसते. विश्रामगडाच्या परिसरात मात्र त्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे. तेथे पाच ते सहा गिधाडे दिसत असल्याचे स्थानिक आदिवासी तसेच निसर्गप्रेमी सांगतात.
दुर्मीळ झालेल्या या पक्षी जातीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे काही कार्यकर्ते प्रयत्नरत आहेत, मात्र त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील ३५० चौ.किमी क्षेत्र कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथील जैववैविध्याचे संवर्धन करण्याच्या हेतूने व वन्यप्राण्यांना अभय मिळावे यासाठी अभयारण्य निर्माण केले गेले. गिधाडासारख्या धोक्यात आलेल्या पक्षाचे या अभयारण्यातील वास्तव्य लक्षात घेऊन ते संपण्यापूर्वीच धोक्यात आलेला हा पक्षी वाचविण्यासाठी वन्यजीव विभागाने संवेदनशीलतेने काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.


सौजन्य: प्रकाश टाकळकर, अकोले, दै.लोकसत्ता

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...