म्हसळा-श्रीवर्धनमधील गिधाडांच्या संख्येत वाढ

 
Credit:Loksatta

वाढत जाणारी जंगलतोड, खाद्याची वानवा आणि पर्यावरणाचा असमतोल यामुळे वन्यजीवनावर परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक फटका निसर्गसाखळीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या गिधाडांना बसला आहे. जिल्ह्य़ात गिधाडांची संख्या झपाटय़ाने घटत असल्याचे २००४ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले होते. ही बाब लक्षात घेऊन महाडच्या सह्य़ाद्री मंडळ आणि सिस्केप या संस्थांनी म्हसळा आणि श्रीवर्धनमध्ये गिधाड संवर्धनाची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला आता मोठे यश आले आहे. पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या ११ वरून ७२ वर गेली आहे.
रायगड जिल्ह्य़ात प्रामुख्याने लांब चोचीची आणि पांढऱ्या पाठीची गिधाडे आढळतात. लांब चोचीची गिधाडे प्रामुख्याने डोंगरकडय़ात वस्ती करतात, तर पांढऱ्या पाठीची गिधाडे झाडावर घरटी बांधतात. अशा सर्व प्रकारच्या गिधाडांची गणना करण्यात आली होती. यात म्हसळा आणि श्रीवर्धन परिसरात १९९७ ते २००० मध्ये पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या घसरून सातवर आल्याचे निष्पन्न झाले होते. या भागात होणारी वृक्षतोड, घरटी बांधण्यासाठी आवश्यक विशिष्ट प्रकारच्या झाडांची कमतरता आणि अन्नाची कमतरता यामुळे ही संख्या घटत असल्याचे आढळून आले. ही बाब लक्षात घेऊन रायगडात गिधाड संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली.
सोसायटी ऑफ इको एन्डेजर्ड स्पिसीज कन्जव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड प्रोटेक्शन अर्थात सिस्केप आणि सह्य़ाद्री मंडळाने म्हसळ्यातील चिरगाव आणि भापट या गावात ग्रामस्थांच्या मदतीने काम सुरू केले. गिधाड संशोधन आणि संवर्धन केंद्र सुरू करण्यात आले. यासाठी महाडमधील पक्षीतज्ज्ञ सागर मिस्त्री यांनी मोठा पुढाकार घेतला. वन विभाग आणि गाव कमिटय़ांची मदत घेण्यात आली. गिधाडाच्या राहणीमानाचा शास्त्रोक्त अभ्यास केला गेला. ग्रामस्थांच्या मदतीने गिधाडांना खाद्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले. फिडिंग ग्राऊंडमध्ये मृत जनावरे आणून टाकली जाऊ लागली. गिधाडांचा अधिवास संरक्षित करण्यात आला. याकामी चिपळूणच्या भाऊ काटदरे आणि पुण्याच्या ईला फाऊंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांचे मार्गदर्शन मिळाले. सलग आठ-नऊ वर्षांत ही मोहीम राबवली गेली. याचा चांगला परिणाम अखेर दिसून आला.
म्हसळा श्रीवर्धन परिसरात पूर्वी ११ असणारी गिधाडांची संख्या आज ७२ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे चिरेगाव आणि भापट या ठिकाणाला राज्यातले पहिले गिधाड अभयारण्य म्हणून घोषित करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आल्याचे सागर मिस्त्री यांनी सांगितले. यातून प्रेरणा घेऊन आता महाड तालुक्यातील वाकी बुद्रूक आणि नानेची वाडी इथे लांब चोचीची गिधाडे संवर्धनाचे काम सुरू झाल्याचे सागर मिस्त्री यांनी सांगितले आहे.


सौजन्य: दै.लोकसत्ता प्रतिनिधी, अलिबाग

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...