डायक्लोफेनेक औषधांच्या बेकायदेशीर वापरामुळे गिधाडांना अजूनही धोका

डायक्लोफेनेक या बंदी घालण्यात आलेल्या पशुवैद्यकीय औषधाचा बेकायदेशीर वापर अजूनही मोठय़ा प्रमाणात सुरू असून गिधाडांना अजूनही धोका आह, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मुळातच आतापर्यंत या औषधाच्या वापरामुळे गिधाडांची संख्या कमी झाली आहे.
ऐंशीच्या दशकात दिल्लीतील तालकटोरा गार्डन्समध्ये काही गिधाडे होती. शहराच्या इतर भागातही गिधाडे होती. एके काळी त्यांची संख्या जास्त होती पण आता परिस्थिती फारच निराशाजनक आहे. गेल्या काही दशकात गिधाडांची संख्या खूपच कमी झाली आहे, असे पर्यावरणवादी रवी आगरवाल यांनी सांगितले.
निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाडांची संख्या कमी झाली असून त्यातील ९९ टक्के गिधाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे सांगून ते म्हणाले, की या एरवी दीर्घकाळ जगणाऱ्या पण कमी जननदर असलेल्या पक्ष्यांची संख्या आता ५ टक्केही उरलेली नाही. १९९० व २००० या दरम्यान या गिधाडांच्या मृत्यूचा दर हा खूपच जास्त होता व ९० टक्के गिधाडे त्यामुळे नष्ट झाली, असे बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या (BNHS)गिधाडे संवर्धन कार्यक्रमाचे विभू प्रकाश यांनी सांगितले.
पशूंवरील उपचारांसाठी वापरले जाणारे डायक्लोफेनेक हे औषध ही गिधाडे जेव्हा मृत जनावरे खातात, तेव्हा त्यांच्यातही येते व त्यांच्यातील महत्त्वाच्या अवयवात युरिक अ‍ॅसिडचे खडे तयार होतात. हे युरिक अ‍ॅसिड बाहेर टाकता न आल्याने ही गिधाडे मरतात, काही वेळा ती निर्जलीकरणामुळे मरतात. भारतात ७६ टक्के मृत गिधाडांचा व्हिसेरा तपासला असता त्यांना गाऊट झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या शरीरात डायक्लोफेनेकचा अंश सापडला असून हे औषध गिधाडांसाठी ३० ते ४० टक्के अधिक विषारी असते. जसे सायनाइड हे उंदरांना जास्त विषारी असते, असे प्रकाश यांनी सांगितले. एक टक्का मृत जनावरांमध्ये जरी या औषधाचा जास्त अंश आढळला, तरी गिधाडांची संख्या मोठय़ा प्रमाणात घटत जाते.
२००६ मध्ये गिधाडे कृती कार्यक्रम आखण्यात आला. डायक्लोफेनेक औषधावर बंदी घालण्यात आली  तसेच गिधाडांच्या प्रजोत्पत्तीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. डायक्लोफेनेक या औषधांचा वापर पशूंवर करण्यास बंदी घातली असली, तरी मानवासाठीच्या वापराकरिता असलेले औषध आता जनावरांसाठी बेकायदेशीर रीत्या वापरले जात आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी म्हणजेच बीएनएचएस या संस्थेने हरयाणातील पिंजोर, आसाममधील राणी तसेच पश्चिम बंगाल या ठिकाणी गिधाडांची पैदास केंद्रे सुरू केली आहेत. त्यात ३०० पक्षी जन्माला आले असून त्यात ४६ पिलांचा समावेश आहे. या गिधाडांना २०१६ पर्यंत निसर्गात सोडले जाईल, असे प्रकाश यांनी सांगितले. आशियाई जातींच्या गिधाडांची संख्या दक्षिण आशियात ९९ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. अणकुचीदार चोचीची गिधाडे १,०००, गोल चोचीची गिधाडे ४४,००० व पांढरी गिधाडे १२,००० एवढीच त्यांची संख्या उरली आहे.


सौजन्य: पीटीआय, नवी दिल्ली ,दै.लोकसत्ता

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...