.. जटायू पुन्हा भरारी घेईल



गिधाडांबद्दल लोकांच्या मनांत निरनिराळ्या प्रतिमा असतात. अनेक वेळा गिधाडांना दुष्काळ, उपासमारी व मृत्यूचे प्रतीक म्हणून दर्शविलं जातं. व्यंगचित्रांमध्ये एखादा रोडावलेला माणूस, भेगाळलेली भूमी आणि वर एका निष्पर्ण झाडावर टपून बसलेलं गिधाड असं पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे भक्षक वृत्तीचं दर्शन गिधाड या शब्दातून घडतं, परंतु आपल्या प्राचीन वेदिक परंपरेनुसार इतर असंख्य जीवांप्रमाणेच गिधाडालाही देवत्व प्राप्त झालं आहे. रामायणातील जटायू व संपातीच्या रूपात यांना महत्त्वाचं स्थान मिळालं आहे. निसर्गाच्या चक्रात स्वच्छता व निरोगी वातावरणाकरिता गिधाडाचं कार्य पाहिलं की या दिमाखदार पक्ष्याचं महत्त्व लगेच पटतं.
भारतामध्ये गिधाडांच्या नऊ जाती आहेत; पांढरं गिधाड (इजिप्तशियन गिधाड), काळं गिधाड (सिनेरियस गिधाड), लाल डोक्याचं गिधाड (राज गिधाड), पांढऱ्या पाठीचं गिधाड, लांब चोचीचं गिधाड, करडं गिधाड (युरेशियन ग्रिफॉन), दाढीवालं गिधाड (लॅमरगिअर), हिमालयीन करडं गिधाड (हिमालयीन ग्रिफॉन) व पातळ चोचीचं गिधाड. यातील पहिल्या सहा प्रकारची गिधाडं महाराष्ट्रात सापडतात.
गिधाडांचे मृत्यू व बीएनएचएसचा अभ्यास
कधी काळी शहरालगतच्या, ग्रामीण तसेच नसर्गिक अधिवास असलेल्या प्रदेशांत हजारोंच्या संख्येने दिसणारी गिधाडं गेल्या दशकभरात दुर्मिळ होत गेली. विशेषत पूर्वी मोठय़ा संख्येने आढळणाऱ्या पांढऱ्या पाठीच्या, लांब चोचीच्या आणि पातळ चोचीच्या गिधाडांची संख्या ९९ टक्के घटली. वरील तीन प्रजातींची गिधाडं लक्षणीय प्रमाणात दुर्मिळ होत असल्याचं देशभरातील अनेक पक्षीप्रेमींच्या लक्षात आलं. अशा परिस्थितीत बीएनएचएसने युके-स्थित रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड्सच्या (आरएसपीबी) मदतीने देशभरात गिधाडांचा सखोल अभ्यास, गुरांमधील डायक्लोफीनॅकचं प्रमाण, गिधाडांनी अशा गुरांची कलेवरं खाण्याचं प्रमाण, गिधाडांचा अधिवास असलेली क्षेत्रं शोधणं आणि गिधाडांच्या मृत्यूमागे अन्य काही करणं असल्यास शोधून काढणं अशा विविध अंगांनी अभ्यास सुरू केला. यामध्ये देशभरात ११००० किमीचा प्रवास करून अभ्यासकांनी गिधाडांची पाहणी केली.
पाहणीअंती बीएनएचएस संशोधकांच्या असं लक्षात आलं, की गुरांकरिता वापरल्या जाणाऱ्या वेदनाशामकांतील डायक्लोफीनॅक या घटकाने या तीन प्रजातींच्या गिधाडांचा मृत्यू होत आहे. डायक्लोफीनॅक टोचलेल्या गुरांचा ४८ तासांत मृत्यू झाला आणि अशा कलेवरांना या प्रजातींच्या गिधाडांनी खाल्लं तर त्यांचा मूत्राशय निकामी होऊन मृत्यू ओढवतो. अशा प्रकारचं मांस या गिधाडांनी एकदा जरी खाल्लं, तरी ते त्यांच्या मृत्यूस पुरेसं होतं. निसर्गाचे साफसफाई घटक इतक्या मोठय़ा प्रमाणावर नष्ट होऊ लागल्याने मृत गुरं व अन्य पाळीव/वन्य जनावरांच्या शरीराची विल्हेवाट लागण्याचा वेग मंदावला. यामुळे रोगराई, शेतांतील माती व पाणी दूषित होणे, कुत्र्यांची संख्या, त्यांची दांडगाई व रेबीजसारखे जंतू फैलावणे अशी विविध प्रकारची संकटं निर्माण झाली. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या गिधाडांची उणीव प्रकर्षांने जाणवू लागली. काही भागात अन्नाची कमतरता, अधिवास कमी होणं व अपघाती मृत्यू अशा सर्व वन्यजीवांना भेडसावणाऱ्या समस्या होत्याच.
पशुवैद्यकीय डायक्लोफीनॅकवर बंदी
गिधाडांची वेगाने घटणारी संख्या पाहता एक गोष्ट स्पष्ट होती, की गुरांवरील डायक्लोफीनॅकच्या वापरावर बंदी आणल्याशिवाय त्यांना नामशेष होण्यापासून वाचवणं शक्य नाही. अन्य संवर्धन संस्था व पक्षिप्रेमींच्या मदतीने बीएनएचएसने सरकार व संबंधित अधिकाऱ्यांना हे पटवून देण्याकरिता अथक प्रयत्न चालू केले. शेवटी २००६ मध्ये भारत सरकारने गिधाडांना असलेल्या धोक्याचं गांभीर्य लक्षात घेऊन डायक्लोफीनॅकच्या पशुवैद्यकीय उत्पादन, आयात व वापरावर बंदी घातली. पाठोपाठ अन्य दक्षिण आशियायी देशांनीसुद्धा अशी बंदी आणली. इथे गिधाड वाचावण्याच्या युद्धातील पहिली बाजी जिंकली गेली.
गिधाड प्रजनन केंद्रं व जागृती
फक्त १ टक्का उरलेल्या तीन प्रजातींच्या गिधाडांची संख्या नसर्गिक रीत्या वाढायला खूप वेळ लागला असता कारण त्यांचं प्रजनन धिम्या गतीने होतं. तेवढा वेळ गिधाडांपाशी नव्हता. कृत्रिमरित्या त्यांचं प्रजनन करणं आवश्यक होतं. या कामी बीएनएचएस, आरएसपीबी आणि हरयाणा, पश्चिम बंगाल व आसामच्या राज्य सरकारांनी एकत्र येऊन अनुक्रमे िपजोर, बुक्सा व रानी या ठिकाणीं गिधाड संवर्धन प्रजनन केंद्रं सुरू केली. देशाच्या विविध भागातील वनविभागाच्या मदतीने या तीन प्रजातींच्या काही जोडय़ा या केंद्रांमध्ये आणण्यात आल्या. त्यांना जास्तीत जास्त नसर्गिक वातावरण, हवा, उजेड, उडायची संधी व प्रजननयोग्य परिस्थिती मिळावी म्हणून मोठं, उंच, हवेशीर व जाळीने बंदिस्त केलेले निवारे निर्माण करण्यात आले. या गिधाडांना डायक्लोफीनॅकचा मागमूस नाहीये अशा तपासलेल्या बकऱ्यांचं मास देण्यात येऊ लागलं. हे अत्यंत खर्चिक काम आहे.
त्याचबरोबर बीएनएचएसने सरकारी अधिकारी, औषध विक्रेते, शेतकरी व पत्रकार अशा विविध स्थरांवर जनजागृती सुरू केली. डायक्लोफीनॅकमुळे होणारे गिधाडांचे मृत्यू, त्यामुळे होणारी पर्यावरण व आरोग्याची हानी, गुरांवरील डायक्लोफीनॅकच्या वापरावरील बंदी अशा मुद्यांचा यामध्ये समावेश होता. या कामी प्रसारमाध्यमांची चांगली मदत होऊ लागली. बीएनएचएसचे शास्त्रज्ञ व उप-संचालक डॉ. विभू प्रकाश व त्यांचे सहकारी ही दोन्ही कामं अथकपणे करत आहेत.
परिस्थितीत सुधारणा
एकीकडे गिधाड प्रजाननात यश येऊ लागलय तर दुसरीकडे जनजागृतीचे परिणाम दिसू लागलेत. प्रजनन केंद्रांत यशवीरित्या पिल्लं जन्मास येऊ लागली व आजच्या घडीला २५० च्या वर गिधाडे या तीन केंद्रात नांदत आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा केलेल्या पाहणीत असं दिसून आलय की गुरांमधील डायक्लोफीनॅकचं प्रमाण बरंच घटलय. याचा थेट परिणाम म्हणजे तीन संकटग्रस्त प्रजातींच्या गिधाडांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होऊन त्यांची संख्या घटण्याचं प्रमाणही कमी झालयं. काही ठिकाणी तर पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या किंचित वाढली असल्याचं अभ्यासक सांगतात. आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांमध्ये सुद्धा याची आता दाखल घेतली जातेय.
पुढील आव्हाने
पशुवैद्यकीय डायक्लोफीनॅकवर बंदी असली, तरी अजून मानवी वापराकरिता असलेल्या डायक्लोफीनॅकचा गुरांवर अवैधपणे वापर होतो आहे. त्यामुळे डायक्लोफीनॅकच्या मानवी वापरावर बंदी आवश्यक वाटू लागली आहे. त्याचप्रमाणे वापरात असलेली असेक्लोफीनॅक व केटोप्रोफेनसारखी अन्य पशुवैद्यकीय वेदनाशामकं सुद्धा गिधाडांकरिता घातक असल्याचं निदर्शनास आलय. या व अन्य संशयित औषधांवर सुद्धा बंदी आवश्यक आहे. अशा आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्यासाठी बीएनएचएस, आरएसपीबी, अन्य संस्था, इतर देशांतील संस्था व सर्व संबंधित सरकारे यांनी "सेव्हिंग एशियाज व्हल्चर्स फ्रॉम एक्सटिंकशन" (SAVE-सेव्ह) ही समिती २०११ मध्ये स्थापन केली.
देशभर गिधाडांना पोषक असं वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत सद्य:स्थितीत काही सुरक्षित गिधाड क्षेत्र शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. अशी काही क्षेत्रं गुजरात व उत्तर प्रदेश-नेपाळ सीमेवर शोधण्यात आली आहेत. पण संपूर्ण देशात सुरक्षित वातावरण निर्माण होईल, तेव्हाच जटायू पुन्हा आकाशात स्वच्छंद भरारी घेईल.
(लेखक बीएनएचएसचे जनसंपर्क व्यवस्थापक आहेत)


Publishedin Loksatta: Tuesday, May 21, 2013

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...