दुर्गम बेटावर अतिदुर्मिळ नारकोंडम हॉर्नबिलची अस्तित्वाची लढाई..

अंदमान आणि निकोबारमधील दुर्गम नारकोंडम बेटावर असलेल्या अतिदुर्मिळ नारकोंडम हॉर्नबिल-Narcondam hornbill  (Aceros narcondami)पक्ष्याची प्रजाती रडार आणि डिझेल ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी सुरू असलेल्या आग्रहामुळे धोक्यात आली आहे. बेटावरील पोलीस चौकी वगळता कुठेही मानवी वसाहत नाही. दोन्ही प्रकल्पांसाठी सुरू असलेला आग्रह भविष्यात संरक्षण क्षेत्र विरुद्ध जंगल असे वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली असून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला आहे.
नारकोंडम बेटाचा प्रदेश अत्यंत लहानसा परंतु अप्रतिम निसर्गसौदर्य लाभलेला आहे. भारताच्या मालकीच्या या बेटावर नारकोंडम हॉर्नबिलचा अधिवास आहे. या प्रदेशाला अधिसूचित वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला असून साधारण ३०० नारकोंडम हॉर्नबिल या बेटावर आहेत आणि जगातील ही एकमेव अतिदुर्मिळ पक्षीप्रजाती आहे. या प्रदेशात एक छोटीशी पोलीस चौकीदेखील उभारण्यात आली आहे. मानवी हालचालींचा हा भाग वगळता येथे दाट वसाहती नाहीत. भारतीय तटरक्षक दलाने या बेटावर रडार आणि डिझेल ऊर्जा निर्मिती केंद्राच्या उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. रडार आणि डिझेल ऊर्जा निर्मिती केंद्राचा प्रस्ताव तयार केल्यानंतर तो राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीसमोर पाठविण्यात आला होता. पर्यावरणाशी संबंधित अशा किचकट मुद्दय़ांवर निर्णय घेणारी ही एकमेव संस्था असल्याने यावर निर्णय घेण्यापूर्वी नारकोंडम बेटाची पाहणी करण्यात आली. हा संपूर्ण प्रकल्प २ किलोमीटर अंतरापर्यंतचा निसर्ग विस्कटून टाकणार आहे. या परिसरातील जंगल अत्यंत घनदाट असून मानवी वस्त्यांचा स्पर्शदेखील येथे झालेला नाही. त्यामुळे नारकोंडम हॉर्नबिल नशिबाने अद्यापही तगून आहेत. रडार आणि डिझेल ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर पोलीस चौकीत अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. परिणामी या बेटावरील मानवी हालचाली वाढणार आहेत. जर या प्रकल्पाला हिरवी झेंडी मिळाली तर आपसुकच नारकोंडम हॉर्नबिल प्रजातीला धोका निर्माण होईल.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. असद रहमानी यांनी गेल्या फेब्रुवारी महिन्यात बेटाला भेट देऊन वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार केला. हा अहवाल राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीला सादर करून प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव पूर्णत: फेटाळून लावला. यावर स्थायी समितीच्या गेल्या १३ जून रोजी झालेल्या बैठकीत मॅरेथॉन चर्चा करण्यात आली. या बैठकीत डॉ. एम.के. रणजितसिंह, किशोर रिठे, डॉ. दिव्यभानूसिंह, प्रेरणा सिंह बिंद्रा, डॉ. मधुसूदन आणि डॉ. ए.जे.टी. जॉनसिंग सहभागी झाले होते. उपस्थित सर्वच सदस्यांनी रडार आणि डिझेल प्रकल्पाचा प्रस्ताव धुडकावून लावला.





वास्तविक पोलीस चौकीपायी मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे बेटावर एकमात्र जलस्रोत आहे. या बेटावर मानवी वसाहतीचे प्रयत्न झाल्यास जंगलप्रदेशावर दबाव येणार असून वन्यजीव आणि पक्ष्यांसाठी मोठय़ा प्रमाणात समस्या निर्माण होतील, असे कारण देण्यात आले आहे. संरचनात्मक बदलांनी ही भौगोलिक परिस्थिती पालटून जाणार असून माणसाचा राबता वाढणार आहे. त्यामुळे जंगलतोड भाग पडणार आहे. नारकोंडम हा भारतातील एकमेव असा प्रदेश आहे जेथे मानवी वसाहती नाहीत. एकदा प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले तर हा प्रकल्प संरक्षण विभागाचा म्हणून गणला जाईल. बेटावर एकदा का माणसे येऊ लागली तर निसर्गाचे सारे चित्रच बदलून जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांना कडाडून विरोध केला जात आहे. तरीही प्रकल्पासाठी दबाव आणण्यात येत असल्याचे राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
भारतीय तटरक्षक दलाला या बेटावर अचानक रडार उभारणीची उपरती का झाली, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. रडार उभारणीचा निर्णय घेण्यापूर्वी कोणतेही पर्यावरणीय सर्वेक्षण करण्यात आलेले नसताना राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर प्रकल्पाचा प्रस्ताव थेट वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीपुढे पोहोचला. वास्तविक वन्यजीव (संरक्षण) कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने जंगलप्रदेशातील वन्यजीव-पक्ष्यांना धोकादायक ठरणाऱ्या अशा प्रकल्पांना सातत्याने रद्दबातल ठरविलेले आहे.
हा प्रस्ताव आता केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री जयंती नटराजन यांच्याकडे प्रलंबित आहे. या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी जोरदार विरोध केल्यास अतिदुर्मीळ नारकोंडम हॉर्नबिलची प्रजाती लुप्तप्राय होण्यापासून वाचू शकते, असे किशोर रिठे यांनी म्हटले आहे.

 विक्रम हरकरे,नागपूर,लोकसत्ता प्रतिनिधी

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...