दिवाणखान्यात कैद जंगलाचा ‘राजा’

राज्यभरात वाघांच्या ५२ ‘ट्रॉफी’
 
जंगलाचा राजा वाघ दिवाणखान्यात कैद झाला आहे. अनेकांनी त्याच्या देहाच्या अवयवांना शोभेची वस्तू बनवून घरात सजविले आहे. वन विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार राज्यभरात सुमारे ५२ पेक्षा अधिक वाघांच्या ‘ट्रॉफी’ दिवाणखान्याची शोभा वाढवित आहेत, तर काही ‘ट्रॉफी’ वन अधिकार्‍यांच्या कक्षात सजल्या आहेत.
यात वाघाचे शीर, कातडे, दात व नखांचा समावेश आहे. दिवाणखान्यात वाघाची ट्राफी, कातडी व नखे असणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाते. भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आली आहे.
वाघाची शिकार करणे शौर्याचे मानले जात होते. त्यामुळे राजे, महाराजांचा तो शौक असायचा. पुढे ब्रिटिश काळात वाघांच्या शिकारीसाठी खास अभयारण्येच स्थापली गेली. त्या काळात अनेक महान शिकारी उदयास आले. वाघाची शिकार करणे हा एक खेळ समजला जात होता; पण त्यानंतर वाघांच्या शिकारीवर कायद्याने प्रतिबंध घातला. दरम्यान, पूर्वी शिकार केलेल्या वाघांचे अवयव अनेकांच्या दिवाणखान्याची अजूनही शोभा वाढवित आहेत.
वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून दिली जाते. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. भारतासह जगभरातील वाघांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. जाणकारांच्या मते, २0 व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात सुमारे १ लाख वाघांची संख्या होती. परंतु स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ती ४0 हजारांपर्यंत खाली आली. २0११ च्या व्याघ्रगणनेनुसार जगभरात केवळ चार हजार वाघ शिल्लक राहिले आहेत. त्यापैकी भारतात १८00 वाघांची नोंद आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात १६९ वाघ असल्याची माहिती आहे.
बिबट्यांच्या १0३ ‘ट्रॉफी’
वाघापाठोपाठ बिबट्यासुद्घा लोकांचे आकर्षण ठरला आहे. वाघाप्रमाणेच बिबट्याच्याही राज्यभरात सुमारे १0३ ‘ट्रॉफी’ घरोघरी सजल्या आहेत. यात ८ पूर्णाकृती बिबट्यांच्या ‘ट्रॉफी’ असून, १८ शीर, ६७ कातडी व १0 नखे असल्याची नोंद वन विभागाकडे सापडते. वाघ व बिबट्यांसोबतच इतर वन्यप्राण्यांच्या सुमारे ६८५ ‘ट्रॉफी’ असून, वन विभागाने त्यांना कायदेशीर परवाना बहाल केला आहे. यात १६ लोकांकडे जिवंत अस्वल पाळण्यात आल्याची माहिती आहे. सामान्य नागरिकांसोबतच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये वाघाच्या ‘ट्रॉफी’ चे फार मोठे आकर्षण असल्याचे दिसून येते. नागपूर सर्कलचे मुख्य वनसंरक्षक शेषराव पाटील यांच्या कक्षासह चंद्रपूर, गडचिरोली, वडसा व आलापल्ली येथील वन अधिकार्‍यांच्या कक्षात पूर्णकृती वाघांच्या ‘ट्रॉफी’ सजल्याची वन विभागाकडे नोंदी आहेत.
कायदा काय म्हणतो?
कायद्यानुसार कोणत्याही वन्यप्राण्यांची ट्रॉफी वा अवयव सामान्य नागरिकांना बाळगता येत नाही. त्यासाठी वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागतो. माहिती सूत्रानुसार राज्य सरकारने गत १९७३ मध्ये एक अध्यादेश जारी करून ज्यांच्याकडे वन्यप्राण्यांच्या ट्रॉफी असेल, त्यांना वन विभागात नोंदणी करून परवाना घेण्याचे निर्देश देण्यात आले होते; परंतु त्याला राज्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे २00३ मध्ये पुन्हा नवीन अध्यादेश काढण्यात आला. त्यानुसार राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांच्या कार्यालयात सुमारे ६८५ वन्यप्राण्यांच्या ट्रॉफीची नोंद करण्यात आली असून, वन विभागाने त्यांना रीतसर परवाना प्रदान केला आहेत.


-जीवन रामावत (नागपूर लोकमत-३० जुलै १२ )

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...