जंगलची खरीखुरी लेकरं

अरुणाचलमधील ‘पाक्के’ जंगलातील १२ गावांतील आदिवासींनी एकत्र येऊन धोरा आबे सोसायटी स्थापन केली. तीत जंगल विभाग आणि गावकरी मिळून एकत्रितरीत्या काम करतात. गावकऱ्यांनी शिकार करणे सोडून दिले आहे. शिकारीची हत्यारे सरकारजमा केली आहेत. आता जंगलातील हॉर्नबिल(Hornbill) पक्ष्यांचे संरक्षण करण्याचे व इथे येणाऱ्या निसर्गप्रेमींना मार्गदर्शक म्हणून हे निशी आदिवासी काम करतात आणि त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या मिळकतीत आपला उदरनिर्वाह चालवतात.. पहिल्यांदा आसाममध्ये काझीरंगाला गेलो तेव्हा नमेरी जंगलानजीक अरुणाचलमध्ये ‘पाक्के’ म्हणून व्याघ्रप्रकल्प आहे असे समजले. पुढच्याच वर्षी पाक्केला भेट दिली. आसाममधील पाक्केला जायचा रस्ता खूपच खराब होता. त्याला ‘भयानक’ याशिवाय दुसरा कोणताच शब्द शोभला नसता. अरुणाचलमध्ये पोहोचल्यावर नदी ओलांडून जंगलात जावे लागते. पण नदीवरचा पूल २००४ च्या पावसात वाहून गेलाय आणि तो अजूनही दुरूस्त केलेला नाही. या एका उदाहरणावरूनच हा प्रदेश किती दुर्लक्षित आहे याची कल्पना येते. आणि याच कारणामुळे हे जंगल मात्र अजूनही सुरक्षित राहिले आहे.या जंगलात उपवनाधिकारी असलेले श्री. तापी जंगल वाचविण्याकरता आणि या कामी स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी खूपच प्रयत्नशील आहेत. नदी ओलांडून एकदा जंगलात प्रवेश केला की या जंगलाचे वेगळेपण आणि नैसर्गिकता लगेचच जाणवते. जंगलात गेल्यावर प्राणी पाहायला मिळतीलच असे नाही, पण खूप वेगळ्या प्रकारचे पक्षी मात्र नक्कीच पाहायला मिळतात. त्यातले कित्येक तर मी मध्य दक्षिण व उत्तर भारतात कोठेही पाहिलेले नव्हते. कित्येक पक्षी तर असे होते, की मी ते फक्त पुस्तकातच पाहिले होते. आणि ते आपल्याला या आयुष्यात तरी पाहायला मिळणार नाहीत म्हणून त्यांना शोधायचा नादही सोडून दिला होता.
एकदा या जंगलाला भेट दिल्यावर मी दरवर्षी पुन:पुन्हा भेट देत राहिलो आणि प्रत्येक वेळेला तिथे मला नवीन काहीतरी आढळत राहिले. त्यात कधी कइ जवळ ग्रेट हॉर्नबिल पाहायला मिळाला, तर कधी हत्ती. कधी सोनेरी रंगाच्या किडय़ाचा कानातल्या डुलासारखा कोषही बघायला मिळाला. एकदा तर अन्यत्र कोठेही पाहायला न मिळणारे रिज हॉर्नबिल कॉलनीजवळच्या एका झाडावर रात्रीच्या विश्रांतीकरिता येऊन बसलेले पाहिले. ते पाच-दहा नव्हते, तर एका झाडावर मोजून १६७ रिज हॉर्नबिल जमले होते. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.


एकदा असाच गावच्या बाजारात फेरफटका मारताना एक आदिवासी माणूस डोक्यावर वेताची विणलेली टोपी (केसांचा अंबाडा बांधतात तसा!), कपाळावर बांधलेले केस, त्यातून आडव्या घातलेल्या बांबूच्या दोन काडय़ा आणि त्यावर ग्रेट हॉर्नबिलची चोच अशा अवतारात दिसला. गर्दीतून त्याला गाठेस्तोवर तो कुठेतरी गायब झाला. बरोबरच्या माणसाकडे चौकशी केली तर तो निशी आदिवासी असून कोठेही महत्त्वाच्या ठिकाणी किंवा सणाला जाताना ते अशी टोपी घालतात असे कळले. मी ते माझ्या डायरीत नोंदवून विषय तिथेच सोडून दिला.यावर्षी परत पाक्केला गेलो. आता तिथे ओळखही वाढली होती. हॉर्नबिलवर अभ्यास करणारी अमृता राणे तिथेच काम करत होती. मला घेऊन जायला ती तेजपूरला आली होती. आसाममधला मुख्य रस्ता सोडल्यावर पुढे कल्याणच होते. रस्ता भयानकहून भयानक होता. आणि तो चांगला नाही म्हणून निषेध म्हणून स्थानिक लोकांनी रस्त्यात तीन-चार फूट खोल चर खणले होते. त्यामुळे त्याला रस्ता म्हणणे शक्यच नव्हते. मागे मी पावसात आलो तेव्हा चिखलातून गाडी नेणे कठीण गेले होते. पण आता रस्ता कोरडा असल्यामुळे मी पुढे सरकू शकत होतो.
अमृताने माझी राहायची सोय पाक्के जंगल कॅम्पवर केली होती. या भागात तसं पाहिलं तर सेजूसापुढे रस्ताच नाही. पूर्वी कधीतरी सरकारने लंकावरून इटानगरला जायला रस्ता तयार करायला घेतल्याच्या प्रयत्नांच्या खुणा दिसतात. परंतु पुढे जंगलात रस्त्यावर डोंगराची माती आल्यामुळे ते कामही बंद झाले.

Male hornbill transfers a fig to the female. ImageSource:Wikipedia

इथल्या जंगल कॅम्पची संकल्पना खूपच वेगळी आणि आपणा शहरी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. इथे १२ गावांतल्या लोकांनी एकत्र येऊन धोरा आबे सोसायटी तयार केली आहे. त्याद्वारे जंगल विभाग आणि गावकरी यांनी मिळून  एकत्रितरीत्या काम करण्याचे ठरवले. या गावकऱ्यांनी काळाची निकड ओळखून शिकार करणे पूर्णपणे सोडून दिले आहे. शिकारीकरिता ते जी हत्यारे वापरायचे, त्या बंदुका त्यांनी आता सरकारजमा केल्या आहेत. आपल्या उदरनिर्वाहाचे हे एकुलते एक साधन त्यांनी खूप शहाणपणाने व विचारपूर्वक सोडून दिले आहे. त्याचबरोबर समाजात मानाचे स्थान असलेल्या त्यांच्या हॉर्नबिलच्या चोचीच्या टोप्या त्यांनी सरकारत जमा केल्या व त्याऐवजी फायबर ग्लासपासून तयार केलेल्या चोची वापरायला सुरुवात केली. अरुणाचल सरकारने या गोष्टीचा मोबदला म्हणून या सर्वाना जमिनी दिल्या. पण स्थानिक ऑफिसमधल्या बाबूंनी या भोळ्याभाबडय़ा लोकांना त्याचा पत्ताच लागू दिला नाही. त्यामुळे त्या जमिनी कागदोपत्रीच राहिल्या आहेत. या गावकऱ्यांना त्या दिल्यात खऱ्या, पण कसणारे मात्र कुणी दुसरेच आहेत.
या भागात अमृता आली आणि तिने इथे एक नवीन प्रयोग केला. शहरातून हॉर्नबिल नेस्ट अ‍ॅडॉप्शनकरिता पैसे गोळा केले आणि त्या पैशातून रिज हॉर्नबिलचे घरटे वाचवायचे काम इथल्या गावकऱ्यांना दिले. आता या १२ गावांतले गावकरी व गावचे प्रमुख आपल्या प्रदेशातल्या रिज हॉर्नबिलच्या घरटय़ांचे पूर्ण विणीच्या काळात घरटय़ाखाली बसून राखण करतात.
तसं पाहिलं तर इथल्या लोकांच्या गरजाही खूप नाहीत. या कामाच्या मिळकतीतून त्यांचे तीन-चार महिने निभावतात. पण उरलेल्या सात-आठ महिन्यांत त्यांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असतो. १२ गावांच्या प्रमुखांनी जी सोसायटी स्थापन केली आहे, तिच्या नियमांना ते व त्यांचे गाव बांधील आहेत. यावर्षी तर या लोकांनी कमालच केली. २ मार्च रोजी झालेल्या सभेत एक ठराव पास करण्यात आला. त्यानुसार- १) हॉर्नबिलच्या घरटय़ापासून २०० मीटर अंतरापर्यंत झाडे पाडणे व बांबू तोडण्यास मज्जाव करण्यात आला. असे केल्यास ५०,०००/- रु. दंड. २) जर कोणी हॉर्नबिल मारला तर त्याला हॉर्नबिलच्या प्रजातीनुसार २० ते ५० हजार रुपये दंड. ३) इतर प्राण्यांकरिता दंड पुढीलप्रमाणे : हत्ती- १ लाख, वाघ- २ लाख, अस्वल- १ लाख, नदीत विष कालवणे (मासेमारीकरिता)- ५० हजार, गौरला ७० हजार. सांबर, डुक्कर, हरीण, साप, मासे इ.करिता ५ हजार रुपयांपर्यंतचा दंड बसवण्यात आला आहे. आणि अशा घटनेची माहिती देणाऱ्याला त्यातली ५० टक्के रक्कम इनाम म्हणून मिळेल असे जाहीर करण्यात आले आहे. सोसायटी अशी केस जंगल विभागाकडे सुपूर्द करेल.
 हे नियम सरकारने किंवा कोणी बाहेरून येऊन त्यांच्यावर लादलेले नाहीत, तर आदिवासी आणि शहरी लोकांच्या दृष्टीने अडाणी असणाऱ्या लोकांनी स्वखुशीने ते स्वत:वर लादून घेतले आहेत. यात त्यांनी आपले उदरनिर्वाहाचे साधनही गमावले आहे. अमृताच्या प्रकल्पातून मिळणारे काही पैसे व जंगल कॅम्पमधून मिळणाऱ्या पैशांवर त्यांचे घर आता चालणार आहे. कॅम्पवर काम करणारे सगळे स्थानिक लोक आहेत. तिथे शहरी सुविधा नाहीत, पण आपुलकी आहे. तिथे काम करणाऱ्या स्त्रिया फावल्या वेळात शाली तयार करतात व जंगलात येणाऱ्या प्रवाशांना देतात. पूर्वी ज्यांच्या खांद्यावर बंदुकी असायच्या, ते आता गळ्यात दुर्बीण लटकावून उत्साहाने प्रवाशांना पक्षी दाखवतात. मार्गदर्शक म्हणून तुमच्यासोबत येताना त्यांच्यात तुम्हाला नवनवीन पक्षी दाखविण्याची अहमहमिका लागते. पक्ष्याची शिकार करण्यापेक्षा त्यांची नावं समजावून घेत त्यांची जीवनशैली अभ्यासण्यात त्यांना आता आनंद वाटतो. शिकार सोडून आता ही सर्वच्या सर्व १२ गावे जंगलाच्या रक्षणात गुंतली आहेत. आणि ते त्यांचे हे काम अपेक्षेपेक्षा जास्त चांगले करीत आहे.
त्यांच्याकडे पाहिल्यावर आपण काहीच करत नाही, हे जाणवते. आपल्याला जंगलात जाऊन असे काम करणे शक्य नाही; परंतु जे अशा प्रकारचे काम करत आहेत त्यांना आपण मदत तर नक्कीच करू शकतो! त्यांना तुम्ही दिलेली पैशाची भीक नकोय. त्यांना तुमच्याकडून कशाची अपेक्षाही नाही. पण एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी चालवलेल्या जंगल कॅम्पला तुम्ही भेट दिलीत तर त्यातून त्यांना थोडीफार आर्थिक मदत होणार आहे. त्याच त्या ‘बाजारू’ झालेल्या जंगलांना भेट देऊन तेच ते पक्षी-प्राणी पाहण्यापेक्षा इथे तुम्हाला नवीन विश्व पाहायला मिळेल. बाजारूपणाचा मागमूस नसलेले जंगल उपभोगायला मिळेल. अमृताच्या कामाला आर्थिक मदत करून थेट नसले, तरी दुसऱ्या मार्गानी आपल्या परीने निसर्ग व पर्यायाने काही प्रमाणात मनुष्यजात वाचविल्याचे समाधान यातून तुम्हाला मिळेल.
इथे एक गोष्ट विशेष नोंदवण्यासारखी आहे. या जंगलभेटीत निशी गाईडच्या सोबतीने मी आत्तापर्यंत कधीही न पाहिलेले २८ नवीन पक्षी प्रथमच पाहिले. नवख्या माणसाकरिता तर तो स्वर्गच असेल. आणि निशी लोकांबरोबर जंगलात काढलेले ते दोन-चार दिवस तुम्ही कधीही विसरणे शक्य नाही.


अनंत झांजले ,लोकसत्ता
lokrang@expressindia.com

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...