बाल्ड ईगलच्या देशात!

Source:baldeagleinfo.com

 
 पाश्चिमात्य देशांमधील वन्यजीव अभ्यासकांची स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट या वाहिन्यांनी जनमानसापर्यंत पोहोचवली. ‘निसर्गात असंही असतं’ असं वाटावं, अशा कितीतरी घटना लोकांना ‘याची देही याची डोळा’ घरबसल्या बघता आल्या. लोकांना हे अनोखं निसर्गदर्शन आवडायला लागलं. ‘वाईल्डलाईफ’ या क्षेत्राची आपल्याकडे तशी क्रेझ कमी, पण आताशा परिस्थिती बदलायला लागलीय. पर्यावरणप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वन्यजीव क्षेत्रात ‘करिअर’ करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे. वन्यजीव संवर्धनासाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. प्रश्न आहे आपल्याकडे ‘झोकून देऊन’ काम करण्याची वृत्ती आहे का? ती वृत्ती तयार करणारी विद्यालये आपल्याकडे आहेत का?
पशुवैद्यकीय महाविद्यालयामधून पदव्युत्तर शिक्षण आटोपल्यानंतर पीएच.डी. साठी अमेरिकेला जाण्याचं निश्चित झालं. स्टिलवॉटर येथील ‘ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी’ मध्ये शिकायला गेल्यावर तिथल्या वन्यजीव क्षेत्रातल्या संशोधकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. डॉ. लिश या पक्षीशास्त्रज्ञांशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मग त्यांच्यासोबत काम करताना आणखी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. गेली ४५ वष्रे केवळ शिकारी पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या डॉ. लिश यांचा सळसळता उत्साह एखाद्या तरुणालादेखील लाजवेल असाच आहे. अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी असलेला ‘बाल्ड ईगल’(Bald Eagle) उत्तर अमेरिकेतून नामशेष होतो की काय, अशी आणीबाणीची परिस्थिती उद्भवली असताना डॉ. लिश आणि सहकाऱ्यांनी त्या पक्ष्याचा संवर्धनाचा विडा उचलला आणि ती मोहीम यशस्वी करून दाखविली. त्यांच्यासोबत ‘ओक्लाहोमा’ या राज्यात या पक्ष्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मग त्यांच्यासोबत जंगल भ्रमंती सुरू झाली.
‘ओक्लाहोमा’ तसा घनदाट अरण्याचा प्रदेश नाही. अपार वृक्षतोडीचा आणि बेसुमार अवैध शिकारीचा फटका याही राज्याला सोसावा लागला आहे. उत्तर अमेरिकेतल्या अनेक राज्यांप्रमाणे या राज्यातूनदेखील ‘बाल्ड ईगल’ नामशेष होण्याच्या मार्गावर आला असताना वेळीच केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे या पक्ष्याची संख्या हळूहळू वाढत गेली. या पक्ष्याचं दर्शन घ्यायचंच असं ठरवून एके दिवशी डॉ. लिशसोबत ‘विचिता’च्या दिशेने प्रयाण केलं. ‘स्टीलवॉटर’हून सकाळीच निघालो. बऱ्याच वेळ गाडी चालत राहिली. मलोन् मल पसरलेले ‘रँचेस’ बघून नंतर नंतर तर कंटाळा यायला लागला होता. हे ‘रँचेस’ म्हणजे गवताळ कुरण. मांसल जातीच्या गायींची पदास करण्यासाठी प्रामुख्यानं ही ‘रँचेस’ वापरली जातात. दोन ते तीन तास अंतर पार केल्यानंतर आम्ही एका गावाबाहेरच्या कुरणाळ प्रदेशात शिरलो. काही अंतर गेल्यानंतर डॉ. लिश यांनी गाडी थांबवून एका झाडाकडे बोट दाखवलं आणि ते म्हटले ‘बाल्ड ईगलचं घरटं’.
माझी नजर सहजच त्या दिशेला गेली. बघितलं तर झाडावर भल्लं मोठं घरटं दिसलं. घरटं कसलं एक लहान घरचं होतं ते. घरटय़ाचा आकार बघितल्यावर ते बांधणाऱ्या पक्ष्याला मनापासून दाद दिली. या पक्ष्याच्या अभ्यासादरम्यान बऱ्याच गोष्टी कळाल्या. उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या कुठल्याही पक्ष्याच्या घरटय़ापेक्षा ‘बाल्ड ईगलचं’ घरटं सगळ्यात मोठं असतं. वर्षांनुवष्रे तेच ते घरटं वापरल्यानं कधी कधी तर घरटं इतकं मोठं आणि जड होतं की त्याचं वजन जवळपास एक टन होतं. एवढय़ा मोठय़ा वजनाचा डोलारा न पेलवल्यामुळे शेवटी झाड उन्मळून पडते. वयस्कर ‘बाल्ड ईगलच्या’ घरटय़ाची खोली १२ ते १५ फूट आणि रुंदी ५ ते ८ फूट असू शकते. एवढय़ा मोठय़ा अवाढव्य घरटय़ाच्या वजनानं झाड तुटलं नाही तर नवलंच. त्यामुळेच तर हा पक्षी घरटं बांधण्यासाठी मजबूत खोड असलेल्या कोनीफेरस झाडांची निवड करतो. कधी कधी मात्र अननुभवी पक्षी चुकीचं झाड निवडतो आणि घरटय़ाच्या वजनानं झाड पडतं. मग मात्र त्या पक्ष्याला शहाणपण सुचतं आणि पुढचं घरटं बांधताना तो मोठय़ा झाडाचीच निवड करतो. खरं तर ‘बाल्ड ईगल’ हा ‘बाल्ड’ अर्थात टकला नाहीच. त्याच्या डोक्यावरच्या पिसांचा रंग पांढरा असल्यामुळे त्याला ते नाव पडलंय. याच्या डोक्याचा आणि शेपटीचा रंग पांढरा असतो, तर चोच मात्र पिवळी असते. या देखण्या पक्ष्याच्या पंखांचा विस्तार ६ ते ८ फूट इतका मोठा असू शकतो. मासे हे या पक्ष्याचं आवडतं खाद्य असल्यामुळे नदीकिनारी, समुद्रकिनारी, तलावाच्या काठानं याचं वास्तव्य प्रामुख्यानं दिसून येतं. हा पक्षी खूपच लाजाळू असल्यामुळे माणसांच्या वस्तीपासून दूर राहणं पसंत करतो. ‘ओरेगॉन’ आणि आणखी काही शहरात हा पक्षी मानवी वस्तीत आढळून आल्याची नोंद असली तरी ती त्याची सवय नक्कीच नाही. त्यामुळेच तर हा पक्षी अलास्कासारख्या दुर्गम प्रदेशात सर्वत्र आढळतो.
या पक्ष्याला उडताना, शिकार पकडताना आणि शिकार पकडून उडताना बघणं म्हणजे एक पर्वणीच असते. ५० ते ७० कि.मी. प्रती तास या वेगानं उडू शकणाऱ्या या राजेशाही पक्ष्याचं मासा पकडण्याचं कौशल्य अचंबित करून सोडतं. पाण्याच्या पातळीला समांतर उडत राहून तीक्ष्ण नजरेनं पाण्यात पोहणारा मासा हेरायचा आणि नेम धरून त्याच्या शरिरात तीक्ष्ण नखे घुसवून त्याला पाण्याबाहेर काढायचं. काळ काम वेगाचं गणित इतक्या वेगानं सोडवू शकणारा पक्षी कधी कधी तर माशाच्या वजनानं पाण्यातदेखील ओढला जातो, पण िहमत न हारता पंखांची फडफड करत तो माशाला किनाऱ्याजवळ आणतो आणि मग त्याचा फडशा पाडतो. त्याच्या पायांना खास ‘स्पिक्यूलस्’ असल्यानं त्याला मासे पकडायला मदत होते. एकदा तर साधारण ४ ते ५ किलो वजनाचा मासा पायात पकडून घेऊन जाताना दिसला आणि मला त्याच्या ताकदीची कल्पना आली.
पन्नास-साठच्या दशकात डीडीटी या कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे या पक्ष्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला होता. हे कीटकनाशक पोटात गेल्याने बाल्ड ईगलच्या अंडय़ांची जाडी कमी होऊ लागली आणि त्यामुळे त्यांच्या प्रजोत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ लागला. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आला तेव्हा १९७२ साली अमेरिकेत या कीटकनाशकावर बंदी आली. त्यानंतर कॅनडानंही अमेरिकेचा कित्ता गिरवत १९८९ ला बंदी आणली. या बंदीमुळे बाल्ड ईगलच्या संवर्धनाला मदत तर झालीच, पण त्यांची संख्या वाढायलादेखील मदत झाली. आता अमेरिकेत हा पक्षी सर्वत्र आढळून येतो. त्यामुळेच त्याचं नाव अति धोका असलेल्या पक्ष्यांच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे.
प्रामाणिक प्रयत्न, स्वत:च्या कामावरचा विश्वास, यश हातात येईल की अपयश, याचा जराही विचार न करता वर्षांनुवष्रे या पक्ष्याचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लढणाऱ्या सर्व पक्षीशास्त्रज्ञांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आपल्याला गरज आहे ती स्वत:ला झोकून देऊन काम करत राहणाऱ्या प्रवृत्तीची. बोला, आहे तय्यार?  

डॉ. बहार बाविस्कर -लोकसत्ता- रविवार, १७ जून २०१२
९९७५६८०३७५

1 Comment:

साधक said...

मस्त लेख. मराठी माणसे अशा क्षेत्रांत कार्यरत असल्याचे पाहून छान वाटले.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...