राहिले रे दूर घर माझे!


 वन्यजीव क्षेत्रात वन्यजीव पशुवैद्यक म्हणून काम करताना नेहमीच भावस्पर्शी अनुभवांना सामोरं जावं लागतं. हे अनुभवसंपन्न जीवन जगत असताना जीवनाच्या जडणघडणीचा प्रवास अधिकच रंजक होत जातो. एखादा वन्यजीव जखमी झाल्याची बातमी कळल्यावर होणारी मनाची घालमेल, मग ज्या ठिकाणी तो जीव जखमी झालेला असेल तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मनात होणारी चलबिचल, त्या जखमी जीवाला पकडण्यासाठी खंबीर करावं लागणारं मन आणि मग त्या जीवाला पकडल्यानंतर चेहऱ्यावर आणि मनावर उडणारे आनंदाचे तुषार, या सगळ्या मानसिक बदलांना सामोरं जाताना माझं भावविश्व आपोआपच खुलत जातं. बरं, प्राण्याला पकडल्यानंतरही हा मानसिक प्रवास इथंच संपत नाही. त्यानंतर त्याच्यावर उपचार करताना त्याच्याशी भावनिक नातं जुळतं न जुळतं तोच त्याला परत त्याच्या नसíगक अधिवासात सोडायची तयारी सुरू होते. मग त्या जखमी जीवाच्या मनात डोकावून बघितल्यावर कधी आपल्या कुटुंबीयांना भेटायची त्याची ओढ दिसून येते, तर कधी त्याला असह्य़ होणाऱ्या वेदना मनाला जखमी करून जातात. मग एवढी मानसिक स्थित्यंतरं झाल्यानंतर तो जीव त्याच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचला तर जीवन सार्थकी लागल्याचं समाधान ओसंडून वाहायला लागतं, तर कधी दुर्दैवानं तो जीव मृत्युमुखी पडला तर नैराश्याचं सुतक बरेच दिवस मनाला कुरतडत राहतं, पण निसर्गचक्राच्या ‘द शो मस्ट गो ऑन’ या नियमानुसार पुन्हा कामाला लागतो आणि नवीन पाहुण्याच्या स्वागताला पुन्हा सज्ज होतो.
‘सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कॉन्सव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अँड रिसर्च’ या निसर्गसंस्थेच्या वतीनं आम्ही नागपूर शहरात वन्यजीवांसाठी खास बचावपथक तयार केलं आहे. नागपूर शहरात किंवा शहरालगत कुठंही जखमी पशुपक्षी सापडला तर त्याला वाचवणं, त्याच्यावर उपचार करणं आणि त्याला पुन्हा त्याच्या नसíगक अधिवासात परत सोडणं, ही आमची जबाबदारी असते. या बचाव पथकाच्या सदस्यांनी एकदा एक जखमी माकडाचं पिल्लू पकडून उपचार करण्यासाठी आणलं होतं. त्या पिल्लाबाबत अधिक माहिती कळली तेव्हा काहीसा चिंतातुर झालो, कारण त्या माकडाच्या पिल्लाच्या आईचा मृत्यू झालेला होता. मांज्यामुळे की अन्य कुठल्या तरी कारणानं जखमी झाल्यानं माकडीण आणि तिचं पिल्लू कळपापासून वेगळी पडली होती. त्यानंतर दोन दिवस जखमी अवस्थेत जीवन-मरणाची लढाई झुंजत झुंजत त्या माकडिणीचा मृत्यू झाला होता. आईचा मृत्यू सहजपणे स्वीकारायला तयार नसलेलं पिल्लू आईच्या छातीला चिकटून होतं. ते पिल्लू अनाथ झालं असल्याचा विचार मनात येताच मलाच पोरकं वाटायला लागलं.
त्याची आई मेली असली तरी कळपातील वयात आलेल्या इतर माद्या त्या पिल्लाचा सांभाळ करतील, असा विश्वास होता. त्याला घरी आणल्यानंतर प्रथमोपचार सुरू केले; ते पिल्लू जखमी होतं म्हणून नाही, तर आईच्या मृत्यूमुळे झालेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी, पण फार काही खटाटोप करावा लागली नाही, कारण लवकरच त्या पिल्लाचं खाणंपिणं नॉर्मल झालं आणि ते अगदी सहजपणे घरात खेळायला लागलं होतं. त्याचं बरं होणं मनाला आनंद देत होतं, पण त्याला कळपात परत सोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीच्या विचारानं मनात विचारांचं वादळ घोंगायला सुरुवात झाली होती. पिल्लाला त्याच्या कुटुंबीयांसोबत परत भेटवण्यासाठी काय ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ असायला हवा, याची तयारी सुरू केली. पिल्लू बऱ्यापकी मोठं म्हणजे साधारणपणे ८ ते १० महिन्यांचं होतं त्यामुळे ते सुखरूप राहील, असा मनाला दिलासा होता, पण त्याची आई मेलेली असल्याचं माहीत असल्यामुळे त्याला कळपातील इतर माकडं स्वीकारतील की नाही, स्वीकारलं तरी त्याला नेहमीसारखंच जीवन जगता येईल की नाही, कळपातली इतर माकडं त्याला डॉमिनेट करून त्रास तर देणार नाही ना, असे नाना प्रकारचे प्रश्न डोक्यात येत होते आणि त्याला कळपात परत सोडण्याच्या माझ्या स्वप्नांवर पाणी फिरत असल्यासारखं वाटत होतं.
पण त्या पिल्लाच्या डोळ्यात बघितलं की, ते अगदी निरागस भावनेनं ‘मला माझ्या कळपात परत जायचं आहे’ असं सांगत असल्यासारखं वाटायचं. जणू ते पिल्लू डोळ्यांनी ‘राहिले रे दूर घर माझे’ असं काहीतरी सांगत असल्यासारखं वाटायचं. माकडांच्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या निरीक्षणातून एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली आहे ती ही की, इतर कुठल्याही प्राण्यांच्या तुलनेत वन्यप्राण्यांमध्ये जिवंत राहण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहण्याचा ‘बेसिक इंस्टिंक्ट’ खूप जागृत असतो. मृत्यू जवळपास भटकायला जरी लागला तरी त्याला जोमानं दूर झुगारून जिवंत राहण्याचा प्रयत्न सगळेच वन्यजीव करतात. काही वेळा ते त्यात अपयशी होत असले तरी बरेचदा ही लढाई जिंकतातही त्यामुळेच की काय, मलादेखील हे पिल्लू कळपात स्वीकारलं जाईल आणि उर्वरित आयुष्य सुरळीतपणे जगेल, असा विश्वास होता. याशिवाय, हे जखमी पिल्लू एक मादी होती. त्यामुळेही कळपाचा नायक आणि कळपातले इतर सदस्य या पिल्लाचा सहज स्वीकार करतील, असा आशेचा किरण दिसत होता. त्याऐवजी हे पिल्लू नर  असते तर कळपातल्या इतर सदस्यांनी त्याला कळपाचा भविष्यातला दावेदार म्हणून नक्कीच त्रास दिला असता.
ठरलं, पिल्लाला लवकरच कळपात परत सोडायचं. त्यासाठी त्या कळपाचा शोध सुरू झाला. सलग दोन तीन दिवस कळपाचा माग काढल्यावर कस्तुरचंद पार्कजवळील झाडांच्या गर्दीत तो कळप आढळून आल्याचं कळलं. ही बातमी कळताच पिल्लाला िपजऱ्यात ठेवून कळप शोधून काढला. कळपापर्यंत पोहोचल्यावर एक कृती आराखडा तयार केला. कळपातल्या इतर सदस्यांनी पिल्लाचा स्वीकार न करता त्याच्यावर हल्ला केला तर काय करायचं, लोकांनी गर्दी करून कामात अडथळा आणायला सुरुवात केली तर काय करायचं, पिल्लू अगदी भलत्याच दिशेला पळायला लागलं तर काय करायचं, अशा सगळ्या शक्यता गृहीत धरून कामाला सुरुवात केली. पिल्लाला झाडाखाली नेताच कळपातल्या लहान पिल्लांनी एकच गलबला केला. बहुधा त्यांनी आपल्या मैत्रिणीला ओळखलं असावं. पिल्लाला जेव्हा सोडलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिनं झाडाकडे धूम ठोकली. डोळ्याची पापणी मिटण्यापूर्वीच ते पिल्लू झाडाच्या टोकावर उंच जाऊन बसलं. थोडय़ाच वेळात कळपातली लहान माकडं तिच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तिचे जोरदार स्वागत केले. थोडय़ावेळानं त्यांचं एकमेकांचे पाय ओढणं, एकमेकांच्या मागं लागणं, शेपटय़ा ओढणं, असे खेळ सुरू झाले. कळपातल्या इतर माद्या बहुतेक तिच्या परत येण्यावर नाराज होत्या. चार पाच माद्यांपकी एकीनं पिल्लाला जाणूनबुजून त्रास द्यायला सुरुवात केली. कधी पिल्लाचे पाय ओढून तर कधी शेपटी ओढून ती त्या पिल्लाला जवळ ओढू पहात होती. काही वेळानं ते पिल्लू अगदी लहान फांदीच्या टोकावर जाऊन बसून राहिलं.
तिथपर्यंत पोहोचता येत नसल्यानं त्या मोठय़ा मादीनं पिल्लाचा नाद सोडला. पिल्लूदेखील लगेच नॉर्मल झालं. चिंचेच्या झाडावर बसून ते झाडाचा कोवळा पाला खायला लागलं. त्याच्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज नॉर्मल होत्या. ते बघून मला खूप बरं वाटलं, पण तरीही पिल्लाची आई जिवंत नसल्याचं माहीत असल्यामुळे अस्वस्थच होतो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. कळपातली सगळी माकडं झाडावर वेगवेगळ्या फांद्यांवर जाऊन बसली. त्यांची झोपायची तयारी सुरू होती. थोडय़ाच वेळात सगळीकडे काळोख दाटून आला. कळपातली सगळी माकडं झोपी गेली. सोडलेलं माकडाचं पिल्लूदेखील आरामात पहुडलं होतं.
पिल्लू कळपात परतलं होतं, कळपानं तिचा स्वीकारही केला होता, तिला तिचं घर परत मिळालं होतं, पण माझ्या मते तिचं ‘खरं’ घर दूरच राहिलं होतं.


-डॉ. बहार बाविस्कर, लोकसत्ता
९९७५६८०३७५

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...