भीमाशंकरचे अरण्यवाचन!

 वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणाबरोबर निसर्गाच्या प्रत्येक घटकांवरचे अतिक्रमणही वाढले आहे. याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो आमच्या निसर्गदत्त जंगलांना! यातून वनस्पती, पशू-पक्षी आणि एकूण जंगल ही परिसंस्था धोक्यात येऊ लागल्यानेच सरकारतर्फे अशा वनांना संरक्षण देत ती ‘संरक्षित क्षेत्रे’ म्हणून जाहीर करावी लागली. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्रप्रकल्प अशा नावाखाली सुरक्षित झालेली अशी अरण्ये आज राज्यभरात चाळीमधून अधिक आहेत. यात पुण्याजवळच्या भीमाशकंर अभयारण्याचा क्रमांक खूप वरचा आहे.
 श्री क्षेत्र भीमाशंकरमुळे हे स्थान तसे जनसामान्यांच्या परिचयाचे. परंतु या तीर्थक्षेत्राच्या भोवतीने जे घनदाट जंगल वसलेले आहे, तिकडे अभ्यासक किंवा डोंगरभटके वगळले तर altफारसे कोणी वळत नाही. उन्हाळा हा किती रुक्ष आणि रखरखीत असा ऋतू वाटला तरी जंगलवाचनासाठी, त्यातले बदल टिपण्यासाठी हा ऋतू सर्वात चांगला मानला जातो. तेव्हा याच काळात भीमाशंकर नाहीतर अन्य कुठल्याही जंगलवाटेकडे एकदा वाट वाकडी करावी.
भीमाशंकरला यायचे असेल तर पुणे-नाशिक महामार्गावरील पुणे जिल्ह्य़ातील मंचर किंवा राजगुरुनगर या दोन ठिकाणाहून मार्ग आहेत. या दोन्ही गावांपासून हे अंतर साधारण सत्तर किलोमीटरचे! भीमाशंकरचे पर्यटन महत्त्व ओळखून एमटीडीसी आणि वनखात्याने इथे आपली विश्रामगृहे यापूर्वीच थाटली आहेत. याशिवाय काही खासगी हॉटेल किंवा घरगुती स्वरूपाचीही राहण्या-जेवणाची सोय होते. हा झाला सोयी सुविधांचा मामला. पण पाठीवर सॅक घेत डोंगरवाटा तुडवणाऱ्यांसाठी ही सारी भूमीच सुजलाम सुफलाम अशी आहे.
भरपूर पाऊस आणि अनुकूल स्थिती यामुळे आमची बहुतेक जंगले ही घाटमाथ्याच्या आश्रयाने वाढलेली दिसतात. भीमाशंकर जंगलही असेच घाटमाथ्यावर वसलेले. भीमा आणि घोड नद्यांचा उगम आणि भीमाशंकर सारख्या तीर्थक्षेत्रामुळे या जंगलाचे प्राचीन काळापासूनच ‘देवराई’ म्हणून जतन होतच होते. इथे राहणाऱ्या आदिवासींनी त्यांचे हे घर राखले-वाढवले. इथल्या वनसंपदेचे महत्त्व लक्षात घेऊन, सर्वप्रथम ब्रिटिशांनी १९२७ मध्ये या जंगलाची ‘रिप्रेझेंटिटिव्ह फॉरेस्ट’ म्हणून नोंद घेतली. पण पुढे स्वातंत्र्यानंतर इथे जंगलतोड आणि शिकार वाढल्याने १० ऑक्टोबर १९८५ रोजी महाराष्ट्र शासनाने हा १३० चौरस किलोमीटरचा सदाहरित जंगलाचा प्रदेश ‘अभयारण्य’ म्हणून घोषित केला.
पुणे जिल्ह्य़ातील एकमेव अभयारण्य असलेल्या या जंगलाचा विस्तार लोणावळ्याच्या उत्तरेस राजमाची किल्ल्यापासून ते थेट आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील आहुपे खोऱ्यापर्यंत आहे. पुण्याबरोबरच रायगड आणि ठाणे जिल्ह्य़ातील जंगलाचा भागही याला जोडलेला आहे. दरवर्षी पडणारा साधारण तीन हजार मिलिमीटर पाऊस आणि घाटमाथ्याचा आश्रम यामुळे इथली हिरवाई वर्षांमागे अधिकाधिक घट्ट झालेली आहे. नानाविध वनस्पती आणि तेवढेच पशू-पक्षी हे या अरण्याचे वैशिष्टय़ आहे. अगदी झाडांचे पाहू लागलो तर, जांभूळ, हिरडा, बेहडा, पिसा, अंजन, उंबर, वड, पिंपळ, आंबा, चिंच, लोथ, गेळा, पांगारा, पळस, शेंद्री, साग आणि अशीच कितीतरी झाडे. या झाडांच्याच जोडीला करवंद, कारवी, लोखंडी, लोहारी, रामेठा अशी असंख्य झुडपेही आणि पुन्हा नाना तऱ्हेच्या वेली हे या वनराईचे वैशिष्टय़. वसंतात यातील बहुतेक झाडांना बहर येतो, तर वर्षां ऋतूत सोनकी, तेरडा सारख्या हजारो रानफुलांच्या पायघडय़ा साऱ्या जंगलभर उमटतात.
जी गोष्ट झाडांची तीच इथे वावरणाऱ्या पशू-पक्ष्यांची! आश्रयासाठी घनदाट अरण्य, पाण्यासाठी ठरावीक अंतरावरील झरे-ओढे आणि मुख्य म्हणजे एक समतोल वन्यजीवांची साखळी यामुळे अनेक पशू-पक्ष्यांचे भीमाशंकर एक हक्काचे घर बनले आहे. बिबटय़ा, रानडुक्कर, कोल्हे, साळिंदर, रानमांजर, सांबर, तरस, मुंगुस, भेकर, ससे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विविध जाती इथे आढळतात. पक्ष्यांमध्येही अनेक दुर्मिळ जातींचे दर्शन इथे घडते.
१९८९ च्या प्राणिगणनेत या अभयारण्यात आठ बिबटे आढळले होते. आज ही संख्या ३० च्या वर गेली आहे. चापडा (बाम्बू पिट व्हायपर) ही विषारी सापाची जात इथेच या जंगलात आढळते. पण या साऱ्यात या जंगलाचे महत्त्व याहून निराळे! अवघ्या भारतात वैशिष्टय़पूर्ण समजली जाणारी शेकरू (जायंट स्क्विरल) ही महाखार या जंगलात मुक्कामाला असते. खरेतर तिच्या या अधिवासालाच संरक्षण देण्यासाठी या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कळसूबाई-हरिश्चंद्रगड आणि भीमाशंकरच्या जंगलातच आढळणारी ही खार तब्बल साडेतीन फूट लांबीची. पाठीवर तांबूस तर तोंड व शेपटीकडे पांढऱ्या रंगाच्या असणाऱ्या या भल्यामोठय़ा खारीस महाखार किंवा भीमाशंकरी असेही म्हणतात. अतिशय चपळ असणारी ही खार कायम झाडावर राहते. ठरावीक जागीच घरटे करते. लोभस रूप आणि आकर्षक रंगछटा असणाऱ्या या दुर्मिळ शेकरूला आमच्या राज्याच्या मानचिन्हाचा दर्जा मिळाला आहे. भीमाशंकरच्या जंगलात फिरताना ही शेकरू पाहणे हेच मुख्य आकर्षण राहते.
भीमाशंकरच्या या अभयारण्याचे आणि त्यातील शेकरू खारीचे दर्शन घ्यायचे असेल तर मात्र त्याची मुख्य रस्त्याची वाट सोडून थोडे जंगलात शिरावे लागते. या जंगलात फिरण्यासाठी काही पायवाटा आहेत. अरण्यातील काही गावांसाठी ये-जा करण्याच्या घाटवाटाही आहेत. याशिवाय लोणावळा, कर्जत आणि राजगुरुनगर जवळील भोरगिरीहून या भीमाशंकरच्या दिशेने डोंगरभटक्यांच्या काही ट्रेकच्या वाटाही धावतात. राजमाची, ढाकचा बाहेरी, कोथळीगड, पदरचा किल्ला, सिद्धगड असे गडकोट ही या अरण्याच्या हद्दीत येतात. या सर्व वाटांवरून फिरू लागलो की भीमाशंकरचे हे अरण्यवाचन सहज होते. दोन झाडांच्या एकत्र आलेल्या फांद्यावरून धावणारी एखादी शेकरू नजरेस पडते. कुठेतरी एखाद्या तळ्याकाठी बिबटय़ाच्या पायाचे ठसे डोळू चमकून जातात. छोटय़ाशा झुडुपांना जोडत धागे विणणारा एखादा सिग्नेचर स्पायडरही लक्ष वेधून घेतो. पळस, सावरीचा बहर आणि जांभूळ-आंब्यांचा मोहर त्यावरची पक्ष्यांची धावपळ दाखवत नजरेचा गोंधळ उडवून टाकतो.
कुठल्याही जंगलातील भ्रमंती आणि सामान्य पर्यटन यात फरक आहे. इथले पर्यटन हे निसर्गाशी एकरूप होत, त्याच्याशी मैत्र साधतच तुम्हाला करावे लागते. यामध्येही शांतता आणि निरीक्षणाला खूप महत्त्व असते. पण हे सारे सोडत जंगलातील पाणी खराब करणे, वृक्ष तोडणे, आग लावणे, गाणी वाजवणे, आरडाओरडा- गोंधळ घालणे, फटाके वाजवणे यामध्येच काही मंडळी रमतात. कायद्याला आणि मुख्य म्हणजे इथल्या पशू-पक्ष्यांना या अशा गोष्टी आवडत नाहीत. मग यातून कधीतरी जीवावर बेतले जाते.
खरेतर कुठलेही जंगल फक्त पाहायचे, अनुभवायचे, वाचायचे असते. सांबराने झाडाला घासलेली शिंगे, बिबटय़ाने ओरखडे ओढत नखांना लावलेली धार, अस्वलाने उकरलेली वारुळे, प्राण्यांचे बदलणारे आवाज, पक्ष्यांचे एकमेकांना साद घालणे, वनस्पतींचे बहर, पशू-पक्ष्यांबरोबरचे त्यांचे सहजीवन हे सारे-सारे खूप वेगळे जग असते. हे अनुभव घेण्यात एक मजा असते. जंगलची ही एक भाषा असते. ती थोडीफार जरी आत्मसात केली तरी मग असे हे अरण्यवाचन खूप मजेशीर आणि रंजक होत जाते.


-अभिजित बेल्हेकर ,लोकसत्ता
abhijit.belhekar@expressindia.com

(http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=213319:2012-02-28-17-11-38&catid=362:trek-&Itemid=365)

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...