गिधाडांवरही धाड...(Vultures are vanishing)

सौजन्य: विजया जंगले , लोकसत्ता दिवाळी २०११


 एका वर्कशॉपला जात होते. पनवेल मागे पडलं आणि फोन वाजला. फोनवर माझी जिवलग मैत्रीण स्मिता होती. ती म्हणाली, ‘‘आरे कॉलनीतल्या जंगलात ‘तो’ जखमी अवस्थेत पडलाय.’’ मी ताबडतोब ऑफिसला फोन लावला. त्याच्यासाठी एका खास गाडीची व्यवस्था तातडीनं करण्यात आली. त्याला आणून आमच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. बाहेरच्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून त्याच्यावर ताबडतोब उपचार सुरू झाले. मी बाहेरगावी असले तरी सतत फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारपूस करीत होते. त्याच्या आजारपणाची बातमी पत्रकारांना समजली. त्याबरोबर त्यांनी आमच्या इस्पितळाकडे धाव घेतली. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून सगळ्या मुंबईला त्याच्या आजारपणाची बातमी समजली.
‘तो’ म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून एक गिधाड पक्षी होता! त्याला एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींप्रमाणे वागणूक मिळत होती, कारण गेल्या काही वर्षांमध्ये गिधाडांचं वर्गीकरण अतिदुर्मीळ पक्ष्यांच्या यादीत झालं आहे. १० वर्षांपर्यंत सगळीकडे मुबलक दिसणारी गिधाडं अचानक १९९० पासून हळूहळू दिसेनाशी झाली. हे सर्वप्रथम केएलोडिओ राष्ट्रीय उद्यानात पक्षी निरीक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर संपूर्ण आशिया खंडातूनच गिधाडं नाहीशी होत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे ‘बर्ड्स लाइफ इंटरनॅशनल’ या संस्थेनं गिधाडांचं वर्गीकरण ‘अतिदुर्मीळ’ पक्षी- प्राण्यांच्या वर्गात केलं. शास्त्रज्ञांना काळजी वाटू लागली. गिधाडांची संख्या अचानक कमी होण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले.
सन २००० मध्ये पेरेग्राईन फंडानं ‘आशियाई व्हल्चर क्रायसिस’ प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पात त्यांनी पाकिस्तानच्या ऑरनिथॉलॉजिकल सोसायटीची मदत घेतली. या प्रकल्पात सन २००० ते २००३ या काळात पाकिस्तानातल्या कसूर खानेवाल आणि मुज्जफरगर या जिल्ह्य़ातल्या गिधाडांच्या २४०० घरटय़ांचं निरीक्षण केलं. त्या काळातल्या लहान-मोठय़ा मृत गिधाड पक्ष्यांचं शवविच्छेदन करून त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा त्यांनी अभ्यास केला. त्या काळात जवळजवळ ३४ ते ९५ टक्के गिधाडं मृत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्यापैकी बहुतेक गिधाडांना मूत्रपिंडामध्ये बिघाड झाल्यामुळे मृत्यू आला होता. त्यामुळे शास्त्रज्ञांनी मूत्रपिंडाच्या बिघाडाचं कारण शोधलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, गिधाडांच्या मृत्यूला ‘डायक्लोफेनॅक’ हे औषध कारणीभूत आहे. हे औषध गायी-गुरांच्या आजारात मोठय़ा प्रमाणात वापरलं जातं. हे औषध टोचलेली जनावरं मृत झाल्यावर गिधाडांनी खाल्ली, तर हे औषध गिधाडांच्या मूत्रपिंडात साठतं व मूत्रपिंड निकामी होऊन गिधाड मृत पावतं, असा निष्कर्ष लिंडसे ऑक आणि इतर काही शास्त्रज्ञांनी काढला. ‘डायक्लोफेनॅक’ गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात गायी- गुरांमध्ये वापरलं गेलं आणि त्याचमुळे गिधाडांची जवळजवळ ९९ टक्के संख्या नष्ट झाली, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला. हे संशोधन जगन्मान्य ‘नेचर’(Nature) या शास्त्रीय जर्नलमध्ये फेब्रुवारी २००४ मध्ये प्रसिद्ध झालं. शास्त्रज्ञांच्या वर्तुळात त्यामुळे मोठी खळबळ उडाली.
परंतु या संशोधनाला छेद देणारं दुसरं एक संशोधन सन २००९ मध्ये प्रसिद्ध झालं. डॉ. अजय पोहरकर या महाराष्ट्रीय पशुवैद्यानं गडचिरोलीच्या जंगलातील गिधाडांवर संशोधन केलं. गिधाडं ‘डायक्लोफेनॅक’मुळे नव्हे तर मलेरियामुळे मृत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांना आजारी व मृत गिधाडांच्या शरीरात मलेरियाचे जंतू आढळले. आजारी गिधाडांवर त्यांनी मलेरिया प्रतिबंधक औषधांनी उपचार केल्यावर ती गिधाडं बरी झाली. त्यांच्या संशोधनाला ‘करंट सायन्स’ या जगप्रसिद्ध जर्नलनं आपल्या फेब्रुवारी २००९ च्या अंकात स्थान देऊन त्यावर मान्यतेची मोहोर उठविली आहे; परंतु या महत्त्वाच्या संशोधनाची दखल अजूनही आपल्याकडे मात्र म्हणावी तशी घेतली गेलेली नाही.
मलेरियामुळे असो की, ‘डायक्लोफेनॅक’मुळे, गिधाडांची संख्या कमी झालेली आहे, एवढं निश्चित. एवढय़ा कमी कालावधीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एखादा पक्षी किंवा प्राणी नष्ट होण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी. भारत सरकारनं आता ‘डायक्लोफेनॅक’च्या जनावरांमधील वापरावर बंदी घातली आहे. आहेत ती गिधाडं वाचविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.



 मी वर्कशॉपहून आल्या आल्या त्या गिधाडाकडे धाव घेतली. साधारणपणे दीड फूट उंच, करडय़ा, काळपट रंगाचे पंख, बाकदार चोच, टक्कल पडल्यासारखं डोकं व लांब मान आणि मान जिथं शरीराला जोडली जाते, तिथं स्कार्फ गुंडाळल्यासारखा पांढऱ्या केसांचा पुंजका, एखादे रिटायर्ड टक्कल पडलेले म्हातारबुवा काळा कोट घालून, गळ्याला पांढरा स्कार्फ गुंडाळून झोपलेत असं मला त्या गिधाड पक्ष्याकडे बघून वाटलं. तो अजूनही बेशुद्धावस्थेतच होता. माझ्या लक्षात आलं हा ‘व्हाइट बॅकड’ जातीचा गिधाड आहे. गिधाडांमध्ये डोक्यावर आणि मानेवर केस नसतात, कारण गिधाड मेलेल्या जनावराच्या मांसामध्ये डोकं खुपसून मांस खातात. डोक्यावर आणि मानेवर पिसं असती तर मांसाचे तुकडे पिसांमध्ये अडकून राहिले असते. म्हणजे गिधाडाचं टक्कल पडलेलं डोकं हे त्याच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असतं. कोणाला प्रश्न पडेल, डोकं तर स्वच्छ राहील, पण पायांच्या स्वच्छतेचं काय? पाय तर तो कुजलेल्या मांसावर ठेवून, ते मांस खातो, पण निसर्गाकडे याचंही उत्तर आहे. गिधाड जी विष्ठा टाकतो, त्यात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण जास्त असतं. ही युरिक अ‍ॅसिडयुक्त पातळ विष्ठा गिधाड आपल्या पायांवर टाकतो त्यामुळे पायावरचे जंतू मरून जातात. हे झालं डोक्याचं आणि पायांचं, पण पोटाचं काय? गिधाड तर कुजलेलं मांस खातो. गिधाडाच्या पोटात असे काही अ‍ॅसिडिक स्राव असतात, ते त्या कुजलेल्या मांसातल्या सगळ्या जंतूंना मारून टाकतात. जगातल्या अस्वच्छतेला पचवून स्वत: निर्मळ राहण्याची ही गिधाडांची किमया बघून आश्चर्यचकित व्हायला होतं.
मी त्याच्या पंखांची काळजीपूर्वक  तपासणी केली तर त्याच्या डाव्या बाजूच्या पंखाचं हाड मोडलं होतं आणि खूप खोल जखम झाली होती. त्याला तो पंख हलवताही येत नव्हता. मी सर्वप्रथम त्याला ठेवायचं कुठं, याचा विचार केला. त्याची अवस्था खूपच गंभीर होती. त्यामुळे आमच्या हॉस्पिटलमधली एक खोली त्याच्यासाठी तयार करण्यात आली. माणसांच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट अ‍ॅडमिट होण्यासाठी आला की, नर्सेस पहिल्यांदा बेड तयार करतात. मी आमच्या प्राणिरक्षक झिरवेला वडाची पानं आणि डहाळ्या आणण्यासाठी पाठवलं. वडाची पानं आणि डहाळ्या जमिनीवर अंथरून आमच्या रुग्णाचा ‘बेड’ तयार झाला. थंडीचे दिवस होते. आमचा रुग्ण काही पांघरूण घेऊन झोपू शकत नव्हता, त्यामुळे हीटरची सोय केली. त्याला सलाइन देणं आवश्यक होतं. त्याचा पाय हातात पकडून पायाच्या शिरेत सुई खुपसली आणि सलाइन चालू केलं. त्या दिवशी पूर्ण रात्रभर ते गिधाड बेशुद्धच होतं. आमचे प्राणिरक्षक त्याच्या बाजूला त्याचा सलाइन लावलेला पाय पकडून रात्रभर बसून होते. मी रात्रभरातून दोन-तीन फेऱ्या मारून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. सकाळी हॉस्पिटलमध्ये मी आले तो अजूनही बेशुद्धावस्थेतच होता. मी मनोमन धसकले, पण त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे त्याचं श्वसन आणि तापमान नियमित होतं. दुपापर्यंतही तो शुद्धीवर आला नाही. हा गिधाड कोमात गेला की काय, असं मला वाटू लागलं. भारतातले जेवढे म्हणून गिधाडांचे तज्ज्ञ डॉक्टर होते त्यांच्याशी मी फोनवर संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार चालू केले, पण हा  बेटा काही शुद्धीवर यायला तयार नव्हता. जवळजवळ ४८ तास झाले. माझे प्राणिरक्षक पाळीपाळीने रात्रंदिवस त्याच्याजवळ थांबत होते. मी तापमान घेण्यासाठी थर्मामीटर त्याच्या गुदद्वारात घातला, पण थर्मामीटरचा पारा काही वर चढेना. त्याचं शरीर थंड पडत होतं. मी त्याचं श्वसन बघितलं तर तेही खूप मंद होऊ लागलं होतं. आम्ही सगळे सुन्न झालो. हा जाणार की काय, असं वाटू लागलं. आमचे प्रयत्न फोल ठरणार, असं वाटू लागलं, पण त्या क्षणी माझ्यातला जिद्दी डॉक्टर जागा झाला. उपचार करून मी मरणाच्या दारातून बाहेर काढलेल्या सगळ्या केसेस आठवल्या. निराशेच्या कडय़ावरून आशेकडे फिरायची ती माझी नेहमीची पद्धत होती. मी आमच्या प्राणिरक्षकांना सांगितलं, ‘‘हे बघा, आजारी प्राण्यासाठी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. त्याला वाचवायचं की मारायचं हे तो वर बसलेला ठरवणार आहे.’’ तेवढय़ानंही आमच्या प्राणिरक्षकांच्या चेहऱ्यावर उत्साह आला. मी ताबडतोब जीवरक्षक औषधं हातात घेतली. त्याला देण्याच्या डोसचं मनातल्या मनात मोजमाप केलं आणि भराभर ती औषधं शिरेतून त्याला दिली. त्याच्या श्वसनाकडे मी बारकाईने लक्ष ठेवून होते. थोडय़ा वेळातच त्याचं श्वसन आणि तापमान हळूहळू सामान्य स्थितीत येऊ लागलं, पण तो शुद्धीवर येत नव्हता. आम्ही त्याला शिरेतून सलाईन आणि ग्लुकोज देत होतो. तिसऱ्या दिवशी दुपारी मी पार्कमधल्या इतर प्राण्यांची तपासणी करण्यासाठी गेले होते. गिधाडाकडे असलेल्या प्राणिरक्षक झिरवेचा अचानक फोन आला. मी थोडी धसकले. म्हटलं, गिधाडाचं काही तरी बरंवाईट झालं की काय? झिरवे फोनवर बोलत होता- ‘‘मॅडम, गिधाड आपले पंख आणि चोच हलवायला लागला आहे.’’ मी ताबडतोब तिथं धाव घेतली. गिधाड एका कोपऱ्यात उठून बसला होता. मी खाली बसले. हळूच त्याच्या पंखांवर हात ठेवला, तर तो पुन्हा धडपडू लागला. मी मागे झाले. आमच्या प्राणिरक्षकांनी माझ्याकडे बघितलं. आमच्या साऱ्यांच्याच श्रमाचं सार्थक झालं होतं. गिधाड शुद्धीवर तर आला, पण आता पुढचं आव्हान होतं, ते त्याच्या जखमेची काळजी घेण्याचं. त्याच्या जखमेचं रोजच्या रोज आम्ही ड्रेसिंग करत होतो, पण तो अजून खायला लागला नव्हता. मग आम्ही थोडं चिकन मागवलं. त्याचं सूप केलं. प्राणिरक्षक मोरेनं गिधाडाला टेबलावर घेतलं.
त्याला एका हातात नीट धरलं आणि मोरे सिरींजनं चिकनचं सूप त्याच्या चोचीतून भरवू लागला. पहिलं दिलेलं सूप त्याच्या चोचीतून तसंच खाली पडलं. मग झिरवेनं मोरेला पुन्हा दुसरी सिरींज भरून सूप दिलं. ती सिरींज मोरेनं थोडी चोचीतून आत घालून ते सूप त्याला दिलं. मी त्याच्या गळ्यावर लक्ष ठेवलं. दुसऱ्या घासाला त्यानं आवंढा गिळला. ते सूप त्यानं स्वत:हून गिळलं. मग आमचा हुरूप वाढला. त्याला आम्ही आणखी सूप दिलं. त्याच्या गळ्याच्या खालची पिशवी चांगलीच भरली. मग आम्ही थोडं थांबलो. गिधाड पक्षी खाल्लेलं अन्न प्रथम गळ्याच्या खालच्या पिशवीत भरून घेतो आणि मग ते अन्न पोटात जातं. आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी तो चोचीतून मांस आणत नाही, तर गळ्याला लटकलेल्या या पिशवीतूनच मांसाचे गोळे भरून आणतो. घरटय़ात आल्यावर उलटी करतो. मग ते नरम मांसाचे गोळे पिल्लं खातात. आमचा गिधाड पक्षी आता सूप पोटात जात असल्यानं दोन-तीन दिवसांतच थोडा तरतरीत दिसू लागला होता. मग आम्ही त्याला चिमटय़ाने चिकनचे तुकडे भरवू लागलो. तेही तो आता घेऊ लागला. त्याला आता चांगलीच ताकद आली. आता तो आमच्या त्या छोटय़ाशा खोलीत राहणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्याला आम्ही आता मोठय़ा पिंजऱ्यामध्ये नेण्याचं ठरवलं. एका छोटय़ा पिंजऱ्यात त्याला ठेवलं. तो पिंजरा हातात घेऊन आमचा प्राणिरक्षक माझ्या बाइकवर मागे बसला. मी बाइक घेऊन पिंजऱ्याकडे निघाले. मोठय़ा पिंजऱ्याकडे येऊन मी थांबले. गिधाडाला त्या छोटय़ा पिंजऱ्यातून बाहेर काढलं. मोठय़ा पिंजऱ्यात त्याला ठेवणार, एवढय़ात त्यानं आपली मान ताणल्यासारखी करून उलटी केली. प्रवासात आपल्यालाही कधी कधी मळमळल्यासारखं होतं. गिधाडालाही प्रवास सहन होत नसावा. त्याच्या जखमेला आम्ही ड्रेसिंग केलं, पंखाला बँडेज बांधलं. त्याला त्या खोलीत सोडल्यावर तो तुरुतुरु चालत एका कोपऱ्यात गेला. आपले पंख मिटून कोपऱ्यात बसला. त्या जखमेमुळे त्याला एक पंख हलवताच येत नव्हता. त्याला खाण्यासाठी आम्ही चिकन मागवलं. तो चिकनचे मोठे मोठे तुकडे उचलून खाऊ लागला. जंतुसंसर्ग होऊ नये, म्हणून प्रतिजैविकांची इंजेक्शन्स चालू केली. जखम बरी झाली. आता त्या तुटलेल्या हाडाकडे लक्ष देणं आवश्यक होतं. सर्वप्रथम आम्ही त्या पंखाचा ‘एक्स रे’ काढायचा ठरवला. पोर्टेबल एक्सरे मशीन मागवून घेतलं. डॉ. वाकणकरांना आम्ही बोलावून घेतलं. त्यांनी टेबलावर प्रथम ‘एक्स रे’ शीट ठेवली. गिधाडाला हातात पकडून आमचा एक मजूर टेबलाच्या दुसऱ्या बाजूला उभा राहिला. ‘एक्स रे’ शीटवर गिधाडाचा तो पंख पसरवला. तुटलेलं हाड बरोबर ‘एक्स रे’ शीटवर येईल, अशा तऱ्हेनं पंख फिरवला. ‘एक्स रे’चं यंत्र आम्ही हातात धरून हाताने बटण दाबले. अशा तऱ्हेनं दोन-तीन ‘एक्स रे’ घेतले. ‘एक्स रे’मध्ये बघितलं तर त्याच्या पंखाचं हाड एका ठिकाणी अर्धवट तुटलं होतं. ते ऑपरेशननं जोडता आलं असतं. त्यामुळे आता आम्ही त्याच्या पंखाचं ऑपरेशन करायचं ठरवलं. तुटलेली हाडं पिननं जोडून नंतर हाडं जुळल्यावर पिन काढून टाकता आली असती, अशा तऱ्हेनं शस्त्रक्रियेची आखणी केली. शस्त्रक्रियेमध्ये भूल देण्याचा मोठा भाग असतो. आतापर्यंत अशा प्रकारे गिधाडावर फारशा शस्त्रक्रिया कुठे झाल्या नव्हत्या. त्यामुळे गिधाडांच्या काही तज्ज्ञांशी बोलून आम्ही भुलीचा डोस निश्चित केला. ही शस्त्रक्रिया डॉक्टर वाकणकरसरांच्या दवाखान्यात करायचं ठरलं. त्यामध्ये गिधाडांचे तज्ज्ञ डॉ. पर्सी आवारी, हाडांच्या शस्त्रक्रियेतील तज्ज्ञ डॉ. वॉरियन, पशू शल्यचिकित्सक डॉ. वाकणकर, डॉ. नेहा वाकणकर व मी असं आमचं पाच डॉक्टरांचं पथक त्या गिधाडाच्या शस्त्रक्रियेत आपलं कौशल्य पणाला लावणार होतं. सर्वप्रथम त्याला भूल द्यायची होती. थोडं औषध सिरींजमध्ये घेऊन त्याच्या पायाच्या मसल्समध्ये टोचलं. पाच-सहा मिनिटांतच त्याला गुंगी येऊ लागली. त्यामुळे त्याला आडवं झोपवलं. त्याचा डावा पंख वर पकडून त्यातल्या हाडावर उभी चीर दिली, पण तो थोडी हालचाल करू लागला. म्हणून त्याच्या तोंडातून त्याच्या श्वासनलिकेत नळी घातली आणि त्यातून गुंगी येणारा गॅस दिला. तो गॅस फुफ्फुसात गेल्याबरोबर तो एकदम गाढ झोपी गेला. डॉक्टरांनी त्याची तुटलेली हाडं वर काढली. त्या दोन्ही हाडांमध्ये भोक पाडलं. त्या भोकांमधून पिन घालून ती तिथे फिक्स केली. वरून टाके घातले. त्यानंतर पूर्ण पंखाला बँडेज केलं. गिधाडाचं श्वसन लयबद्धपणे चालू होतं, पण तो गाढ झोपला होता. त्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही त्याला पुन्हा उद्यानात आणलं. शस्त्रक्रिया तर यशस्वी झाली होती, पण तो अजून शुद्धीवर आला नव्हता. आम्ही त्याच्यासाठी तयार केलेल्या खोलीत ठेवला. गिधाडाची चोच चांगलीच लांब व बाकदार असते. आपल्या चोचीनंच तो मोठमोठय़ा जनावरांचं शरीर तोडून आतलं मांस खातो. त्याने चोचीनं ती शस्त्रक्रियेनं अडकवलेली पिन ओढून काढू नये, म्हणून आम्ही एक ‘एक्स रे’ शीट घेतली. ती गोल कापून कॉलरसारखी त्याच्या मानेत अडकवली आणि त्याला त्या मोठय़ा पिंजऱ्यात सोडले.
पण तो अजून शुद्धीवर येत नव्हता, पण आधीच्या अनुभवामुळे मी शांत होते. मला माहीत होतं, तो नक्की शुद्धीवर येणार. फक्त चिंता एकाच गोष्टीची होती, शस्त्रक्रिया केलेली पिन त्यानं चोचीनं काढू नये.
दुसऱ्या दिवशी मी गिधाडाची तपासणी करण्यासाठी गेले. माझी भीती खरी ठरली होती. पाहिलं तर एवढी सगळी काळजी घेऊनही त्या गिधाडानं पायाच्या नख्यांनी पिन काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याच नख्यांनी त्यानं ती गळ्यात अडकवलेली कॉलर तोडून टाकण्याचा प्रयत्न केला होता. जंगली प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या शस्त्रक्रियेत ही एक मोठी अडचण असते.


शस्त्रक्रिया कितीही यशस्वी झाली तरी शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेणं, हे एक मोठं आव्हान असतं. प्राणी कधी तोंडानं टाके तोडतात तर कधी पायानं खाजवून जखम वाढवतात. मी त्या गिधाड पक्ष्याची जखम बघितली. पिन बरीच बाहेर आली होती, पण अजून तुटलेल्या हाडांना आधार मिळत होता. आम्ही पुन्हा त्या जखमेचं ड्रेसिंग केलं. पुन्हा एकदा गळ्यातील कॉलर व्यवस्थित केली. त्याच्या चोचीला रबरबँड लावला. त्यानं ती पिन पुन्हा ओढली असती तर मात्र मग शस्त्रक्रियेचं खरं नव्हतं. मी दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याच्या तपासणीसाठी गेले, तेव्हा गिधाड महाशय पिंजऱ्यात कोपऱ्यात आराम करत बसले होते. माझी भीती खरी ठरली होती. एवढी सगळी काळजी घेऊनही त्यानं पायानं प्रथम चोचीचा रबरबँड काढून टाकला होता आणि पाय व चोचीनं मिळून पंखाची पिन उपसून काढली होती. त्या क्षणी मी खूप हताशपणे त्या अपंग झालेल्या गिधाडाकडे पाहिलं. आता त्याचं संपूर्ण आयुष्य पिंजऱ्यात जाणार होतं. उत्तुंग आकाशात भराऱ्या घेणाऱ्या या पक्ष्याला आता कधीही उडता येणार नाही, याची निराश वेदना मनभर दाटून आली.
जंगली प्राण्यांच्या उपचाराच्या क्षेत्रात पूर्ण काळजी घेऊनही कधी कधी अशी अपयशाची गावं लागतात, पण त्याच गावात रेंगाळत तर राहता येत नाही. त्या गावानं शिकवलेल्या धडय़ांचं गाठोडं सोबत घेऊनच नव्या उमेदीनं पुढे चालत राहावं लागतं.
हे गिधाड जगलं, हेच आमच्या दृष्टीनं मोठं होतं. आमचं गिधाड जगलं, पण निसर्गातली गिधाडं नष्ट होत आहेत. गिधाडांच्या अंडय़ांमध्ये कीटकनाशकांचं प्रमाणही काही ठिकाणी जास्त आढळलंय. एखादा पक्षी- प्राणी पर्यावरणातून नष्ट होणं, म्हणजे निसर्गाच्या साखळीतला एक दुवाच निखळण्यासारखं असतं.
विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ नावाच्या नाटकात त्यांनी आत्यंतिक स्वार्थी वृत्तीच्या माणसांना गिधाडाची उपमा दिली आहे, पण निसर्गातली अस्वच्छता पचवून टाकणाऱ्या गिधाडांचं महत्त्व आज साऱ्या निसर्गप्रेमींना जाणवत आहे, कारण गिधाडं नसतील तर जंगलातली मेलेली जनावरं कोण खाणार? जंगलातून इतरत्र पसरणाऱ्या रोगराईला आळा कोण घालणार? पारशी लोकांचे मृतदेह आतापर्यंत गिधाडं खात होती. आता त्यासाठीही गिधाडं उरली नाहीत!
गिधाडं नष्ट झाली तर विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’चा संदर्भ तरी पुढच्या पिढीला कसा लागणार?


0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...