मुरुडमध्ये उद्या ‘जटायू महोत्सव’

महाकाय गिधाडांना वाचविण्याची अनोखी धडपड

गिधाडांच्या संवर्धनाचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील फणसड वन्यजीव अभयारण्यात ठाणे वन्यजीव विभाग आणि सृष्टीज्ञान स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी, १२ एप्रिल रोजी ‘जटायू’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गिधाडांची कमी होत चाललेली संख्या पर्यावरण संतुलनासाठी घातक ठरत असल्याने गिधाडांच्या संवर्धनासाठी राज्य वन विभागाने पावले उचलली असून ठाणे, नागपूर, नाशिक, रायगड आणि गडचिरोली जिल्ह्य़ात गिधाड संवर्धनाचे प्रकल्प राबविले जात आहेत. फणसड अभयारण्यात गेल्या वर्षभरापासून गिधाडांसाठी ‘खास रेस्तराँ’ राखून त्यांना भरविण्याची योजना आता यशस्वीपणे आकार घेऊ लागली आहे. या निमित्ताने आयोजित गिधाड महोत्सवात गिधाडांचे जैववैविध्याच्या साखळीतील महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्य़ातील मुरुड येथे सुरू असलेल्या अनोख्या प्रकल्पामुळे गिधाडांची संख्या वाढली आहे. या परिसरात एकेकाळी मोठय़ा संख्येने गिधाडांचा अधिवास होता. परंतु, मेलेल्या जनावरांचे मांस खाऊन जगणाऱ्या या प्रजातीची संख्या दोन दशकांपासून झपाटय़ाने कमी होऊ लागली होती. त्यामुळे वन खात्याने स्वयंसेवी संस्था सृष्टीज्ञानच्या मदतीने यासाठी पुढाकार घेतला. सध्याच्या घटकेला मुरूड परिसरात १७ गिधाडे असल्याचे सांगण्यात आले. सृष्टीज्ञानचे कार्यकारी संचालक प्रशांत शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत परिस्थिती अनुकूल दिसत नाही तोपर्यंत गिधाडे सहजासहजी घरटी बांधत नाहीत वा अंडी देत नाहीत. त्यामुळे फणसड परिसरातील गिधाडांची घरटी सकारात्मक संकेत देणारी आहेत. दऱ्या-खोऱ्यातील कपारी, घळी, उंच वृक्ष जसे वड, पिंपळावर गिधाडांची घरटी पूर्वी दिसून येते.  या विशालकाय आणि निसर्गाचा स्वच्छतारक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्याचे महत्त्व सर्वसामान्य जनता, गावकरी आणि नवीन पिढीला समजावून सांगणे आणि लोकजागृती करणे, हाच गिधाड महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. बीएनएचएसचे राजू कसंबे यांनी या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. 
गडचिरोली जिल्ह्य़ातील धानोरा तालुक्यातील निमगाव येथे ज्येष्ठ शिकारी पक्षी अभ्यासक डॉ. अजय पोहरकर यांच्या मार्गदर्शनात वन्यजीव विभागामार्फत गिधाडांसाठी अशाच प्रकारचा प्रकल्प राबविला जात आहे. या पथदर्शक प्रकल्प देशभरातील गिधाड संवर्धन प्रकल्पांच्या दृष्टीने अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहे. मुरूडच्या ‘जटायू’ महोत्सवाच्या निमित्ताने गिधाडांच्या संवर्धनाची आणखी मोठी पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे. 
साधारण वीस वर्षांपूर्वी भारतातील गिधाडांची संख्या कमी होऊ लागल्याचे संकेत मिळाले. जनावरांच्या औषधातील डायक्लोफिनॅकचे प्रमाण गिधाडांसाठी अपायकारक ठरत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले. त्यामुळे डायक्लोफिनॅकवर सरकारने बंदी घातली. मेलेल्या जनावरांच्या शरीरातील डायक्लोफिनॅकमुळे गिधाडांचे मृत्यू झाल्याचा निकष अत्यंत गंभीर होता. आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जात असल्याने गुरे पालनाची संस्कृती आता रोडावत चालली आहे.
पूर्वीच्या काळी मेलेली जनावरे जंगलात टाकून देण्याचा प्रघात होता. या जनावरांच्या मांसावर गिधाडांची उपजीविका चालायची. आता ही पद्धत जवळजवळ बंद झाली आहे. त्यामुळे गिधाडांची उपासमार होऊ लागली आहे. परिणामी त्यांच्या प्रजननावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे हा पक्षी नामशेषाच्या मार्गावर असल्याचे जाहीर करून त्याच्या संवर्धनासाठी पावले उचलण्यात आली. जंगलतोडीमुळे वृक्षांची संख्या झपाटय़ाने घटली आहे, डोंगर फोडून रस्ते, रेल्वेमार्ग आणि सिमेंटच्या वस्त्या उभारल्या जात आहेत. त्यामुळे गिधाडांच्या घरटय़ांसाठी पोषक असलेल्या उंच कडे-कपाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.
निसर्गाच्या साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या गिधाड पक्ष्यांचा एक मोठा थवा मोठय़ा जनावराच्या मांसाचा २० मिनिटात फडशा पाडू शकतो. साडेतीन ते साडेसात किलोग्रॅम वजनाचा हा पक्षी ७५ ते ९३ सेंमी लांबीचा असून त्याचे पंख ६.३ ते ८.५ फूट लांब असतात. सात हजार फुटांपर्यंत तो झेपावू शकतो आणि १०० किमीचे अंतर पार करून शकेल, एवढा त्याचा झपाटा आहे.
मुरुडला गिधाड महोत्सवाच्या निमित्ताने मेलेली जनावरे गिधाडांसाठी देण्याचे आवाहन केले जाणार आहे. ही जनावरे जंगलात आणण्याची व्यवस्थादेखील प्रकल्पाच्या मार्फत केली जाईल. गिधाड महोत्सवात विविध उपक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून यात पक्षी निरीक्षण, वन्यजीव छायाचित्रण, चित्रपट प्रदर्शन, पोस्टर, स्लाईड शो, टॅटू प्रिंटिंग, चित्रकला स्पर्धा, खेळ आणि अन्य उपक्रमांचा समावेश आहे. ‘गिधाडे वाचवा निसर्ग वाचवा’ हा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे, अशी माहिती प्रशांत शिंदे यांनी दिली. 

सौजन्य:लोकसत्ता

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...