बाभळीवरचे बगळे

Photo:Baiju Patil
या फोटोने मला २00९ मध्ये छायाचित्रणातील ‘सेंच्युरी एशिया पुरस्कार’ मिळवून दिला. फोटो पाहिल्यानंतर हा रात्रीचा फोटो आहे, पाण्यातही त्याचे प्रतिबिंब पडलेले आहे, हे कोणाच्याही सहज लक्षात येते. परंतु हे झाड कशाचे आहे, त्यावरचे हे पांढरे पुंजके कशाचे आहेत, ते मात्र कळत नाही. हा ‘सस्पेन्स’ मी या मजकुराच्या शीर्षकातच मुद्दाम उलगडला आहे. पौर्णिमेचा चंद्र आणि बाभळीवरचे बगळे! बगळा हा पक्षी अन्य पक्ष्यांपेक्षा खूप ‘फ्रेंडली’ असतो. तो माणूस जवळ आला तरी भुर्रकन उडून जात नाही किंवा झाडीझाडोर्‍यात अदृश्य होत नाही. त्यामुळे पक्ष्यांच्या छायाचित्रणाचा सराव करण्यासाठी बगळा हा पक्षी चांगला. म्हणूनच बगळ्याला ‘प्रॅक्टीस फोटोग्राफी बर्ड’ असे म्हटले जाते.
आमच्या औरंगाबाद शहराच्या छावणी भागातून दररोज संध्याकाळी बगळ्यांचा एक थवा वेरूळच्या दिशेने जातो, असे मी पाहात होतो. हा थवा नेमका कुठे जातो याचा मी माग काढला. थवा आकाशातून आणि मी रस्त्यावर माझ्या मोटारसायकलवर, अशाप्रकारे मी त्यांचा ‘पाठलाग’ केला. दौलताबादपर्यंत हा पाठलाग व्यवस्थित होत असे. नंतर पाठलाग करता येत नसे कारण थवा दौलताबाद घाटीच्या दरीत कुठेतरी अदृश्य होत असे. पण मी चिकाटी सोडली नाही. हा थवा शेवटी खुलताबाद नजीकच्या कागझीपुरा नामक वस्तीनजीक असलेल्या एका तळ्यात उभ्या असलेल्या बाभळीच्या झाडावर दिवेलागणीच्या सुमारास विसावतो. रात्रभर शेकडो बगळे त्या बाभळीच्या झाडावर विश्रांती घेतात, असे मला आढळले. या तळ्यात ऐन मध्यभागी ही बाभळीची झाडं आहेत. चोहोबाजूंनी पाणी आहे. तळ्याच्या काठाकाठाने बेशरमीची झाडंझुडपं माजलेली आहेत. बगळ्यांच्या रात्रीच्या विश्रांतीसाठी हे उत्तम स्थान. कारण त्यांना कुठल्याही प्रकारचा उपद्रव वा धोका इथे अजिबात नाही. म्हणजे रात्रीच्या निर्धोक विसाव्याची गॅरंटी! झाड बाभळीचे म्हणजे काट्यांचे. त्यामुळे सापाचीही भीती नाही! निसर्गानं प्रत्येक प्राणीमात्राला आपलं पोट भरण्याची कला आणि जीव वाचविण्याचे बुद्धिकौशल्य दिलेले आहे म्हणतात, त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे बगळे आणि त्यांच्या रात्रनिवासाचे बाभळीचे रिसॉर्ट! मी अनेक दिवस हे पाहत होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात हे झाड, त्यावरचे बगळे याचे फार सुंदर आणि आगळेवेगळे फोटो आपल्याला मिळू शकतात!
त्याप्रमाणं मी थंडीच्या मोसमात माझा कॅमेरा घेऊन तळ्यात उतरलो. थंडीच्या दिवसात रात्र लवकर पडते. बगळेही मोठय़ा संख्येने जमतात. त्या बाभळीच्या झाडाच्या दिशेने मी पाण्यातून जाऊ लागलो. काही पावलंच गेलो असेल आणि माझ्या लक्षात आलं, तळ्यातल्या पाण्याचा गाळ काळ्या दाट चिकणमातीचा आहे. झाडाजवळ जाणं शक्य नाही. त्यामुळे मग काठावरच झाडापासून साधारण शे-दीडशे मीटरवर ट्रायपॉड स्टॅण्डवर मी कॅमेरा फिक्स केला. माझा हा उद्योग कागझीपुर्‍यातील लोक पाहत होते. त्यांना माझा काय संशय आला कुणास ठाऊक, त्यांनी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, मी कोण आहे, हे फोटो कशाला काढतोय, सरकारची परवानगी घेतली का, वगैरे वगैरे. शेवटी त्याच परिसरात ज्याची शेती आहे, अशा माझ्या एका परिचिताला मी साइटवर बोलावून घेतलं. तो आला. गावकर्‍यांशी बोलला. मी कोणीही महसूल खात्याचा वा गौणखनिज खात्याचा वा वनखात्याचा वा जमिनीची खरेदी-विक्री करणारा माणूस नाही, याची खात्री पटविली आणि फोटोग्राफीचा माझा मार्ग मग मोकळा झाला. तांत्रिकदृष्ट्या लाँग एक्स्पोजर आणि वाईड अँगलने काढलेले हे फोटो आहेत. रात्री नवाच्या सुमारास काढलेले फोटो आहेत. शांतपणे झोपलेल्या त्या शेकडो बगळ्यांना बिलकूल डिस्टर्ब न करता, खरेतर त्यांना चाहूलही न लागू देता काढलेले हे फोटो आहेत. फोटोग्राफीच्या तज्ज्ञांनी या फोटोची पुष्कळ प्रशंसा केली. अनेक देशी-विदेशी छायाचित्रण नियतकालिकांतून हा फोटो प्रसिद्ध झाला. ‘सेंच्युरी एशिया पुरस्कारा’चा मानकरी ठरला. त्याविषयीचे वृत्त माझ्या फोटोसह वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. मला फोटो काढण्यास विरोध करणार्‍या कागझीपुर्‍यातील लोकांनीही ते वृत्त वाचले. मला कागझीपुर्‍यात आमंत्रित केले. माझा सत्कारही केला. कारण या फोटोमुळे कागझीपुर्‍याचे नाव मी ‘रोषन’ केले होते! आज हा फोटो ‘एन्लार्ज’ करून कागझीपुर्‍याच्या ग्रामस्थांनी तो त्यांच्या ग्रामपंचायत कार्यालयात मोठय़ा अभिमानाने आणि दिमाखाने लावलेला आहे, माझ्या नाव- पत्त्यासहीत!


सौजन्य :बैजू पाटील ,शब्दांकन : सुधीर सेवेकर, manthan@lokmat.com

1 Comment:

Digamber said...

खूप चांगला फोटो आहे, पोस्ट वाचून आनंद आणि अभिमान वाटला. आपले अभिनंदन! आपल्याकडे कोणता camera होता त्यावेळी?


www.dtawde.wordpress.com

Related Posts Plugin for WordPress, Blogger...