शिकारी पक्ष्यांच्या अद्भुत विश्वाला ‘घरघर’

* जगप्रसिद्ध पक्षीसंशोधक डॉ. जेम्स लिश  भारतात येणार
* नागपुरच्या वाईल्ड सीईआर स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार
‘रॅप्टर बर्ड’ची  अनोखी दुनिया  डोळ्याची पापणी लवते न लवते तोच लक्ष्यावर अचूक झडप घालणाऱ्या शिकारी पक्ष्यांच्या अद्भुत विश्वाला ग्लोबल वार्मिग, मानवी हस्तक्षेप आणि आधुनिकीकरणाच्या अतिहव्यासाने संकटात टाकले आहे. शिकारी पक्ष्यांच्या संशोधनासाठी जगभरातील पक्षी अभ्यासक पुढाकार घेत असताना शिकारी पक्ष्यांचे महत्त्व भारतात मात्र दुर्लक्षित होत आहे.   परंतु, भारतातील गरुड, सुवर्ण गरुड, घार, ससाणा, घुबड, गिधाड आदी शिकारी पक्ष्यांचा अभ्यास आणि त्यांच्या संवर्धनाच्या योजनांविषयी जाणून घेण्यासाठी नागपुरातील डॉ. बहार बावीस्कर यांच्या वाईल्ड-सीईआर या स्वयंसेवी संस्थेने अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिकारी पक्षी संशोधक डॉ. जेम्स डब्ल्यू. लिश यांना निमंत्रित केले असून आगामी मे-जून महिन्यात त्यांचा मुक्काम भारतात राहणार आहे. नागपुरात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे पक्षी बचाव केंद्र (विशेषत: शिकारी पक्ष्यांसाठी) उभारण्याची वाईल्ड सीईआर संस्थेची योजना असून याचा आराखडा तयार करण्यासाठी डॉ. लिश यांची मदत घेतली जाणार आहे.
जेम्स डब्ल्यू. लिश गेली साडेचार दशके शिकारी पक्ष्यांच्या अद्भुत जीवनाचा अभ्यास करत असून त्यांच्या अनेक संशोधनांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. शिकारी पक्ष्यांच्या निसर्गदत्त तीक्ष्ण दृष्टीवरील त्यांचे संशोधन अफलातून आहे. या पक्ष्यांच्या डोळ्यांच्या अनाकलनीय रचनेविषयीचे त्यांचे शोधनिबंध नवसंशोधकांना मार्गदर्शक ठरले आहेत. पासष्ट वर्षांच्या डॉ. जेम्स लिश यांनी आयुष्यातील तब्बल ४५ वर्षे शिकारी पक्षी (रॅप्टर बर्ड) संशोधनात व्यतित केली. विशेषत: गरुड आणि सुवर्ण गरुडावरील त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे.
सुवर्ण गरुड भारतात हिमालयाच्या कुशीत आढळून येतो. सुवर्ण गरुडाच्या पंखांचा आकार, त्याचे शरीर आणि जमिनीवरील धावत्या भक्ष्यावर झेपावण्याची त्याची आश्चर्यकारक चपळता, हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय आहे. सुवर्ण गरुडांची संख्या झपाटय़ाने कमी होऊ लागली असून त्यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. त्याच्या अभ्यासासाठी ओक्लाहोमा विद्यापीठाच्या पशू आरोग्य विज्ञान केंद्रात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. लिश पुढील महिन्यात पहिल्यांदाच भारतात येतील. लिश यांच्या आगामी भारत भेटीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पक्षीतज्ज्ञांमध्ये उत्साहाची लाट आली आहे.
शिकारी पक्ष्यांची खास वैशिष्टय़े म्हणजे त्यांची बाकदार अणुकुचीदार चोच, दणकट पाय, पोलादी पंजे, टोकादार नखे आणि कित्येक मैलांवरचे भक्ष्य हेरणारी तीक्ष्ण दृष्टी आणि अफाट ताकद. या पक्ष्यांचे जीवन हाच अत्यंत गूढ असा विषय असल्याने जगभरातील संशोधकांनी शिकारी पक्ष्यांच्या अभ्यासावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे जगात आजपर्यंत सर्वाधिक संशोधने पक्ष्यांवर केली गेली आहेत. शिकारी पक्ष्यांची संख्या घटण्याचे प्रमुख कारणे जंगलतोड, डोंगरफोड आणि आधुनिकीकरणाचा अतिहव्यास हीच असल्याचे राज्यातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. चीनमध्ये दहा वर्षांपूर्वी इंटरनॅशनल फंड फॉर अ‍ॅनिमल वेलफेअरच्या
वतीने बीडिंग रॅप्टर रेस्क्यू सेंटर (बार्क)ची स्थापना करण्यात आली. मानवी हस्तक्षेपामुळे शिकारी पक्ष्यांना निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी चीनने पहिल्यांदा पावले उचलली. शिकारी पक्षी वाचवणे आणि पक्ष्यांविषयी लोकजागृती करणे हा बार्कचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेने आतापर्यंत साडेतीन हजार पक्ष्यांचा जीव वाचविला असून यापैकी ५४ टक्के पक्षी पुन्हा आकाशात झेपावले आहेत. भारतातही अशी ठोस पावले उचलण्याची निकड भासू लागली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

विक्रम हरकरे , मुंबई लोकसत्ता

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...