पिंजऱ्यातून जंगलात मुक्त केलेल्या वाघिणीने दिला दोन बछडय़ांना जन्म

पन्नाच्या जंगलात जगातील पहिला प्रयोग यशस्वी
 खास प्रतिनिधी , मुंबई लोकसत्ता
  जन्मापासून पिंजऱ्यात वाढलेल्या वाघिणीला जंगलात सोडल्यानंतर त्या वाघिणीने दोन बछडय़ांना जन्म दिल्याची जगातील पहिली घटना मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्रप्रकल्पात घडल्याने वन्यजीवज्ज्ञांमध्ये या नव्या प्रयोगाविषयी आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.पाच वर्षांच्या या वाघिणीने तिला प्राणीसंग्रहालयातून जंगलात सोडल्यानंतर नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेतले आणि जोडीदाराची निवड करून दोन बछडय़ांना जन्म दिला हा वन्यजीव क्षेत्रातील नवा आश्चर्यकारक बदल आहे, अशी माहिती पन्ना व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक आर.एस. मूर्ती यांनी दिली.
या वाघिणीचा जन्म कान्हा व्याघ्र प्रकल्पात मे २००६ मध्ये झाला होता. तिला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनीच तिची आई मरण पावली. आईविना पोरक्या झालेल्या या वाघिणीचे पालपोषण कान्हा व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी केले. पाच वर्षेपर्यंत ही वाघीण पिंजऱ्यात होती. तिला पन्नाच्या जंगलात सोडण्याचा धाडसी निर्णय वनाधिकाऱ्यांनी घेतला. या वाघिणीला गेल्यावर्षी २७ मार्च रोजी पन्नाच्या जंगलात मुक्त करण्यात आले. ही वाघीण नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेईल का, अशी शंका होती. परंतु, आश्चर्य म्हणजे या वाघिणीने दूर जंगलात स्वत:च सावज शोधण्याचा प्रयत्न केला. शिकारीची सवय नसतानाही तिने शिकार करून उपजीविका करणे आत्मसात केले. हिंस्र प्राणी जन्मजात शिकारी असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. जंगलात शिकारीसाठी भटकणाऱ्या या वाघिणीला पन्नाच्या जंगलातील एकमेव जोडीदार भेटला आणि वनाधिकाऱ्यांनी केलेला धाडसी प्रयोग यशस्वी झाला. गेल्या १५ डिसेंबर रोजी ही वाघीण तिच्या दोन बछडय़ांसह पन्नाच्या वनकर्मचाऱ्यांना आढळून आली. तेव्हापासून तिच्यावर वनकर्मचाऱ्यांनी खास नजर ठेवली होती. गेल्या आठवडाभरापासून तिचे दोन्ही बछडे बाहेर भटकताना दिसत आहेत.
यापूर्वी दोन वाघिणींचे अन्य जंगलात स्थलांतरण करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, या दोन्ही वाघिणी जंगलातच राहणाऱ्या होत्या. पिंजऱ्यातील वाघिणीला जंगलात सोडण्याचा प्रयोग यापूर्वी कधीही झालेला नव्हता.
पन्ना व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या आता १३ झाली असून यात चार वाघिणी आहेत. २००९ साल प्रारंभ झाले तेव्हा पन्ना व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ शिल्लक नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर पन्नाच्या जंगलात अन्य जंगलातील वाघिणींचे कृत्रिम स्थलांतरण करण्यात आले.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...