व्हेल, कासवांच्या मृत्यूभोवती संशयाचे "जाळे'

मुंबई - रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी गेले चार दिवस मृत कासवे आढळली आहेत. उरण येथे आणि मुंबईत वाळकेश्‍वरनजीक किनाऱ्यावर दोन दिवसांच्या अंतराने मृत व्हेल मासेही सापडल्याने प्राणिमित्र आणि पर्यावरणप्रेमी चिंताग्रस्त झाले आहेत. मोठ्या प्रमाणावरील मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या "पर्ससीन' जाळ्यात कासवे वा प्रसंगी व्हेलही अडकू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

"पर्ससीन' प्रकारचे जाळे वापरून मासेमारी करण्यास राज्य सरकारने 1990 मध्ये परवानगी दिली. सुमारे दीड किलोमीटर लांब असलेल्या या जाळ्यात एका वेळी तब्बल दहा टन मासे पकडता येतात. छोट्या प्रमाणातील मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्यांत केवळ 100 ते 150 किलोग्रॅम एवढेच मासे सापडू शकतात. त्यामुळे लहान मच्छीमारांचा "पर्ससीन' जाळ्याला विरोध आहे; म्हणूनच या जाळ्यांच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने एक समितीही नेमली आहे.
वादग्रस्त ठरलेले हे "पर्ससीन' जाळेच मुंबई, रायगडमधील कासवांच्या आणि व्हेलच्या मृत्यूला कारणीभूत असू शकते, अशी शंका काही सागरी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रायगडमधील करंजा, मोरा, उरण आणि काही प्रमाणात मुंबईतील माहुलजवळ "पर्ससीन' जाळ्याने मासेमारी केली जाते. रत्नागिरी जिल्हा तर "पर्ससीन' मासेमारीचा अड्डा समजला जातो. श्‍वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येणारी कासवे या जाळ्यात अडकण्याची दाट शक्‍यता असते.

रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावर ते कासव नेमके जाळ्यातच अडकून मेले का, हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. कारण त्याचे पाय सडलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे त्याचा मृत्यू अनेक दिवसांपूर्वी झाल्याची शक्‍यता आहे, असे सागरी जीव अभ्यासक सारंग कुलकर्णी म्हणतात. उत्तर महाराष्ट्रात प्रदूषणामुळेही कासवांचा मृत्यू होतो. "जेली फिश' हे कासवांचे आवडते खाद्य आहे. "जेली फिश' समजून खाल्लेल्या प्लास्टिकच्या पिशव्या अन्ननलिकेत अडकूनही कासवांचा मृत्यू होतो, असे ते म्हणाले.

"पर्ससीन' जाळ्यात कासव किंवा 30-35 फुटी व्हेलही अडकू शकतात. ही जाळी लाखो रुपयांची असल्याने मोठा मासा अडकल्यास मच्छीमार जाळे कापत नाहीत. म्हणूनच किनाऱ्यावर "इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' असावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ट्रॉलरवरही "टर्टल एक्‍स्प्लोझिव्ह डिव्हाईस' बसवता येते. मात्र ते महागडे असल्याने मच्छीमार दुर्लक्ष करतात. "किलर शार्क'चा हल्ला किंवा जहाजाची धडक लागूनही व्हेल मासे मरू शकतात.
-सारंग कुलकर्णी, सागरी जीव अभ्यासक

"पर्ससीन' जाळ्यामुळे कासवांचा अथवा व्हेलचा मृत्यू झालेला नाही. हे जाळे समुद्रात केवळ 2 ते 3 मीटर खोलीपर्यंत पसरते. त्यामुळे त्यात कासवे अडकण्याची शक्‍यता कमी आहे. कासवांचा आणि व्हेलचा बळी सागरी प्रदूषणामुळेच गेला आहे.

- डॉ. गजेंद्र भानजी, अध्यक्ष-नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन 

-मनीषा फाळके (सकाळ वृत्तसेवा)

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...