देशातील १५ पक्षीप्रजाती नामशेषाच्या वाटेवर


जंगलतोड, दूरसंचार टॉवर्स, कीटकनाशके करीत आहेत घात

विक्रम हरकरे, मुंबई लोकसत्ता


 काय म्हणतो अहवाल?


सीमेंटीकरणासाठी बेधुंदपणे होत असलेली जंगलतोड पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट करत आहे. सागरी पक्ष्यांचे जीवन वाळू उपश्याने धोक्यात आणले आहे. आकाशातील स्वच्छंद पक्षीविहाराला सर्वाधिक धोका कीटकनाशकांच्या अतिवापराने निर्माण झाला आहे. शेतातील पिके आणि झाडांवर फवारण्यात येणारी विषारी कीटकनाशकेसुद्धा पक्ष्यांच्या प्राणावर बेतू लागली आहे.

पर्यावरणाच्या आघाडीवर भारताचे अपयश दिवसेंदिवस अधिक ठळकपणे नोंदवले जात असून जैववैविध्याच्या साखळीतील लाखमोलाचे पक्षीजीवन धोक्यात आले आहे. अपरिमित शिकार, कीटकनाशके, रसायनांचा अतिवापर आणि झपाटय़ाने नष्ट होत चाललेले नैसर्गिक अधिवास या कारणांमुळे भारतातील १५ पक्षी प्रजाती नामशेषाच्या मार्गावर असल्याचा इशारा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचरने (आययूसीएन) नुकताच एका अहवालातून दिला आहे. यात महाराष्ट्रातील माळढोक पक्ष्याचाही समावेश असून सुदैवाने भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरावर ही वेळ अद्याप आलेली नाही. 
नामशेषाच्या मार्गावर असलेल्या पक्षी प्रजातींमध्ये ग्रेट इंडियन बस्टार्ड (माळढोक), व्हाईट रम्पड् व्हल्चर (पांढऱ्या पाठीचे गिधाड), इंडियन व्हल्चर (भारतीय गिधाड), रेड हेडेड व्हल्चर (लाल मस्तकाचे गिधाड), पिंक हेडेड डक (गुलाबी मस्तकाचे बदक), व्हाईट बेलेड हेरॉन (पांढरे पोट असलेला करकोचा), सोशएबल लॅपविंग (टिटवी), ख्रिसमस फ्रिगेटबर्ड (सागरी पक्षी), जेर्डान्स कोर्सर (जेर्डानचा धावक), सायबेरियन क्रेन (सायबेरियन सारस), बेंगाल फ्लोरिकन (बंगालचा तणमोर), हिमालयन क्वेल (हिमालयन बटेर), फॉरेस्ट आऊलेट (वनपिंगळा) आणि स्पून बिल्ड सँडपायपर (चम्मच पक्षी) यांचा समावेश करण्यात आला आहे. आयसीयूएनच्या अहवालात पक्ष्यांच्या प्रजाती झपाटय़ाने नामशेषाच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचा इशारा देतानाच यासाठी जबाबदार असलेल्या कारणांचा ऊहापोह करण्यात आला आहे. 
सिमेंटीकरणासाठी होत असलेली जंगलतोड पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट करत आहे. सागरी पक्ष्यांचे जीवन वाळू उपशाने धोक्यात आणले आहे. शेतातील पिके आणि झाडांवर फवारण्यात येणारी विषारी कीटकनाशके पक्ष्यांच्या प्राणावर बेतू लागली आहेत. तंत्रज्ञानाचा अतिरेकसुद्धा जैववैविध्याचे संतुलन बिघडवत असून दूरसंचार टॉवर्समुळे उद्भवणारा किरणोत्सर्ग पक्ष्यांना असह्य़ झाला आहे.
पुद्दुचेरीत तर घरचिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून घरचिमणी दिसणेदेखील दुर्मीळ झाले आहे. सिमेंटीकरण, हिरवाईवर चालवली जाणारी कुऱ्हाड आणि पर्यावरणीय अडथळे ही कारणे यासाठी पुढे करण्यात आली आहेत. अरुणाचल प्रदेशात हॉर्नबिल (शिंगचोचा) या राज्यपक्ष्याची शिकार मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. याची गंभीर दखल घेण्याची सुबुद्धी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला झाली. त्यामुळे हॉर्नबिलची शिकार करणाऱ्याला आता ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.  मानवी हस्तक्षेपाने प्रभावित झालेले पक्षीजीव वाचवण्यासाठी सरकारी पातळीवर उचलण्यात आलेली पावले अत्यंत तोकडी असल्याचे मत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. अनिल पिंपळापुरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...