विंचवाचे जीवनदायी विष-scorpion's life saving poison

 जोसेफ तुस्कानो

 बहुसंख्य विंचवांचा डंख वेदनादायक असला, तरी त्यांचे विष माणसाला फारशी इजा पोहोचवीत नाही. तरीही माणसाला मारू शकणारे विंचूदेखील निसर्गात आहेत, हेही विसरता येत नाही. विंचवाच्या विषातील प्रथिनांचा सविस्तर अभ्यास करून, त्यापासून नाना औषधे निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक मंडळी करीत आहेत. त्याविषयी..


विषाची परीक्षा घेण्याचे धाडस कुणी सहसा करीत नसते; परंतु संशोधक काटय़ाने काटा काढण्याच्या हेतूने सापांच्या विषांचा अभ्यास करीत असतात. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर येथील प्रोफेसर मंजुनाथ किणी यांनी नागाच्या (किंग कोब्रा) विषातून ‘हॅडिटॉक्सिन’ नावाचे प्रथिन हुडकून काढले आहे. या प्रथिनाचा परमाणू हा एखाद्या जुळ्या रसायनाप्रमाणे आहे व त्या प्रथिनांना ‘थ्री फिंगर टॉक्सिन’ असे नाव आहे.
नागाच्या जहरी विषावर जगभरचे संशोधक गेली पाच दशके अभ्यास करीत आहेत. हे विष विविध अशा ५० जैविक परमाणूंचे मिश्रण आहे व अजूनही त्याचा पुरता थांगपत्ता लागलेला नाही. कारण या विषाचे घटक हे सभोवतालचे पर्यावरण, हंगाम तसेच सापाचे अन्न यानुसार बदलत राहतात.
माणसाच्या शरीरातील चेतासंस्थेत असलेले न्युरोट्रान्समीटर्स हे शरीराचे स्नायू व चेतातंतू यांच्यात संदेशांची देवाणघेवाण करीत असतात. त्या संदेशवाहकांना निकामी करण्याचे काम विष करते. परिणामी माणूस पक्षाघात, श्वसन संस्थेतील बाधा, रक्तप्रवाहात अडथळा इ. व्याधींनी ग्रस्त होतो. डॉ. किणींनी शोधलेल्या विषातल्या प्रथिनाचे ‘परमाणूशोधक’ म्हणून वापर करून, न्युरोट्रान्समीटर्स हतबल करण्याची विषाची कृती समजली तर विषबाधेवर प्रतिबंधक औषध तयार करण्यास हातभार लागणार आहे. हॅडिटॉक्सिन गटातली टॉक्सिन रसायने खूप वैशिष्टय़पूर्ण आणि ठळक कार्य करणारी असतात. आणि त्यामुळेच अल्झायमर व पार्किन्सन यांसारख्या चेतासंस्थेशी निगडित रोगांवर उपाय करण्यासाठी लागणारे ड्रग्जस् तयार करण्याकरिता त्यांचा वापर करता येतो.
युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न, दी नॉर्वेजियन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ हॅम्बर्ग या तीन विश्वविद्यालयांतील संशोधकांच्या चमूने अंटाक्र्टिकामध्ये आढळणाऱ्या ऑक्टोपस या समुद्रातील जीवाच्या विषाचा सखोल अभ्यास केला. वास्तविक ऑक्टोपस, स्क्विड आणि कटलफिशसारखे सागरी मासे खोल थंडगार पाण्यात वावरतात. या थंड तापमानाला विष निष्प्रभ होत असते. मग हे प्राणी आपल्या विषाचा प्रताप कसा दाखवतात, हे कोडे संशोधकांना उलगडायचे होते. त्यांच्या विषात सामावलेल्या जैविक रसायनाची ती किमया असावी, असे संशोधकांना वाटत होते. या चमूने ऑक्टोपसच्या विषाचे विश्लेषण केले तेव्हा त्यांना त्यात पूर्वी न आढळलेली दोन छोटय़ा आकाराची टॉक्सिन्स गवसली. या रसायनाच्या रचनांचा अभ्यास करून त्यापासून उपयुक्त ड्रग्जस् तयार करण्यात संशोधक गुंतले आहेत. विशेष म्हणजे, या संशोधकांना उपयुक्त विषाची निर्मिती करणारे अन्य भिन्न जातीचे समुद्रजीव आढळले आहेत. चीनमधील वुहान युनिव्हर्सिटीतील यिबाओ मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत सर्रासपणे आढळणाऱ्या स्कोर्पियोस जेन्डेकी या जातीच्या विंचवाच्या विषाचा कसून अभ्यास केला. त्यातून विषनिर्मिती प्रक्रिया कशी घडते, याचा सुगावा लागला; पण विविध प्रकारची ज्ञात-अज्ञात प्रथिनेदेखील विंचवांच्या विषात आढळली. त्यांच्या संशोधनानुसार, भिन्न जातींच्या विंचवांतील विषात प्रथिन रसायनांचे वेगवेगळे घटक असतात. हे निरीक्षण विंचवातील उत्क्रांतीचे प्रतीक म्हणता येईल. बहुसंख्य विंचवांचा डंख वेदनादायक असला, तरी त्यांचे विष माणसाला फारशी इजा पोहोचवीत नाही. तरीही माणसाला मारू शकणारे विंचूदेखील निसर्गात आहेत, हेही विसरता येत नाही. विंचवाच्या विषातील प्रथिनांचा सविस्तर अभ्यास करून, त्यापासून औषधे निर्माण करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक मंडळी करीत आहेत.
विशेष म्हणजे मेंदूच्या कर्करोगावर ‘जीन-थेरपी’चा उपचार करण्यासाठी विंचवाच्या विषातील क्लोरोटॉक्सिन नावाचे रसायन वापरले तर मेंदूचा कर्करोग पसरण्यास अटकाव होतो, असे संशोधकांना आढळले आहे. ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या एका विंचवाने डंख मारला की स्वादुपिंडाला सूज (पॅनक्रियाटिटीस) येते. या टायटस सेरूलॅटस जातीच्या विंचवाच्या विषाची स्वादुपिंडावर होणारे पेशीय पातळीवरील बदल अभ्यासले असताना कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या डॉ. पॉल फ्लेचर यांच्या लक्षात आले की, त्या विषामुळे स्वादुपिंडात कार्यरत असलेल्या दोन महत्त्वपूर्ण प्रथिनांची कार्यक्षमता पूर्णपणे खालावते. त्यामुळे इन्सुलिनसारखे संप्रेरक रक्तात सोडणे किंवा पचनविकरांना आतडय़ात सोडण्याचे कार्य बाधित होते. पेशीभित्तिकेतून होणारी अन्नद्रव्ये, पाचक रसायने, संप्रेरके यांची देवाणघेवाण थांबली की स्वादुपिंड निकामी झाल्यासारखे होते व सुजते. विंचवाच्या विषातील एका विशिष्ट विकराचा हा प्रताप असल्याचे लक्षात आल्याने त्यावर प्रतिबंधक औषधे तयार करणे सोपे जाणार आहे.
तेलअविव युनिव्हर्सिटीचे प्रो. मायकेल गुरेवित्झ हे एक वेगळाच प्रस्ताव मांडीत आहेत. त्यांनी विंचवाच्या विषातील काही रसायनांपासून ‘पेनकिलर्स’ तयार करता येतात व ती मॉर्फिनसारख्या मादक पदार्थाना पर्याय होऊ शकतात, असे म्हटले आहे. प्रा. गुरेवित्झ जुन्या-पुराण्या चिनी उपचारपद्धतींची आठवण करून देतात. चिनी वैदू वेदनाशामक औषध म्हणून विंचवाचे विष वापरीत. त्याचप्रमाणे या इस्रायली संशोधकांनी विंचवाच्या विषापासून जैविक कीटकनाशके तयार करण्यासाठी उपयोग होत असल्याचे दाखवून दिले आहे. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनीदेखील त्यास दुजोरा दिला आहे. के. डॉन्ग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्री’ या शोधनियतकालिकात प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात स्पष्ट केलंय की, कीटकातील स्नायू नि चेतासंस्था यांच्यात समन्वय राखणाऱ्या ‘सोडियन चॅनेल’वर आघात करण्याची किमया विंचवाचे विष साधत असते. त्यामुळे कीटकनाशक म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो.

[This article is about scorpion's poison by Mr. Joseph Tuskano For Loksatta Daily.]

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...