काळा बिबट्या - फरक फक्त रंगाचा...(Black Panther)


Black Panther
कर्नाटकातील भद्रा व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ काळ्या बिबट्याचे दर्शन झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. वास्तविक पाहता, काळा बिबट्या ही वेगळी जात नसून, मार्जार कुळातील बिबट्याचाच हा भाऊ आहे. आपल्याला माहिती असलेला बिबट्या म्हणजे पिवळ्या कातडीवर काळे ठिपके असलेला. काळा बिबट्याही तसाच असतो; फक्त कातडीच्या रंगामुळे त्याच्या अंगावरचे ठिपके लपतात. वाघांमध्ये पांढरा वाघ जसा दुर्मिळ, तसा काळा बिबट्याही दुर्मिळ. बिबट्याचा चुलतभाऊ म्हणावा असा दक्षिण अमेरिकेतील सदस्य जॅग्वार मात्र बरेचदा काळा असू शकतो. 


कातडीचा रंग त्वचेतील "मेलनिन' या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. या द्रव्याचे प्रमाण जास्त झाल्यास, कातडी काळी किंवा गडद रंगाची होते. काळ्या बिबट्याच्या बाबतीत हेच होते. त्याच्या शरिरात "मेलनिन'चे प्रमाण जास्त असल्यामुळे तो काळा किंवा गडद रंगाचा होतो. त्याच्या शरिरारवर नेहमीच्या बिबट्याप्रमाणे काळे ठिपके असतात, पण गडद रंगामुळे ते अगदी जवळ गेल्याशिवाय दिसू शकत नाहीत. पांढऱ्या वाघाबाबत नेमके याच्या उलट होते. "मेलनीन'चे प्रमाण अगदी कमी असल्यामुळे तो पांढरा दिसतो. अर्थात, या रंगबदलामुळे प्राण्याच्या वर्तणुकीत किंवा स्वभावात काही फरक पडत नाही. ते त्यांच्या कुळातील प्राण्यांप्रमाणेच वागतात. 


निसर्गात रंगसंगतीला, त्यातही सरूपतेला (कॅमाफ्लॉज) अत्यंत महत्त्व असते. काळ्या बिबट्याला हा रंग फायद्याचा ठरतो. तिन्हीसांजा किंवा रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्या या प्राण्याला काळ्या रंगामुळे फायदाच होतो. अंधारात एकरूप होणाऱ्या रंगामुळे बिबट्या दिसणे कठीण होते. याच्या उलट पांढऱ्या वाघाचा तोटा होतो. निसर्गात पांढरा रंग कमी असल्यामुळे जंगलाच्या पार्श्‍वभूमीवर पांढरा वाघ लवकर दिसतो व त्याचे भक्ष्य पळून जाते. पांढरा वाघ निसर्गात, मुक्त वातावरणात जगू शकत नाही असे म्हणतात, त्याचे कारण हेच असावे. त्यामुळे पांढरे वाघ फक्त प्राणीसंग्रहालयांत आढळतात. 


चीन, म्यानमार, जावा, उत्तर मलेशिया, नेपाळसह भारतात आसाम, मध्य भारत, दक्षिण भारतात काळे बिबटे आढळतात. महाराष्ट्रात चांदोली अभयारण्यात त्याचे अस्तित्व जाणवले आहे; पण तो दिसलेला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्‍यातील माणगाव खोऱ्यात गेल्या वर्षी काळा बिबट्या दिसला होता. आंबोली-चौकूळपर्यंत त्याचा वावर असल्याचे आढळले आहे. जुन्या नोंदींनुसार, आंबोली-महादेवगड परिसरात 16 मार्च 1933 रोजी काळ्या बिबट्याची शिकार झाली होती. 


दक्षिण भारतातील केनेथ ऍण्डरसन या प्रख्यात शिकाऱ्याने अनेक नरभक्षक वाघ-बिबट्यांना ठार केले. त्याने काळा बिबट्याही मारला होता. "द ब्लॅक पॅंथर ऑफ शिवानीपल्ली'(The Black Panther Of Sivanipalli (1959)- Author: Kenneth Anderson) या त्याच्या पुस्तकात या शिकारीचे वर्णन त्याने केले आहे. 


कोकणात काही भागांत अद्याप बऱ्यापैकी जंगल आहे, तर काही ठिकाणी तोड वाढल्यामुळे भक्ष्याच्या शोधात प्राणी गावांत शिरून मरत आहेत. गुहागर तालुक्‍यातील पोमेंडी येथे 27 ऑगस्ट 2011 रोजी कुत्र्याच्या मागावर आलेला बिबट्या विहिरीत पडून मरण पावला होता. हा बिबट्या काळा असल्याचे सकाळी लक्षात आले. 


काळा बिबट्या ही वेगळी जात नसल्यामुळे त्याच्या सवयी नेहमीच्या बिबट्यांप्रमाणेच असतात. बिबट्याच्या मादीला होणाऱ्या पिलांपैकी एखादे काळ्या रंगाचे असू शकते. वयाच्या दीड वर्षापर्यंत पिले स्वतंत्र शिकार करू लागतात. वन्यावस्थेत काळे बिबटे 11 वर्षांपर्यंत, तर प्राणीसंग्रहालयात वीस वर्षांपर्यंत जगत असल्याच्या नोंदी आहेत. 


बाकी सर्व सवयी बिबट्याच्याच आणि खाद्यही तेच असल्यामुळे रंग वगळता, काळा बिबट्या आणि नेहमीचा बिबट्या यांच्यात काहीही फरक नाही, मात्र अशा रंगाचा प्राणी दुर्मिळ असल्यामुळे त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.


-उदय हर्डीकर,सकाळ

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...