हिरवे दुवे! (Green links)

धर्मराज पाटील - लोकसत्ता 
dharmarajraptor@gmail.com

 
 वन्यजीवनाचे अथवा जैवविविधतेचे दोन ‘अतार्किक ’ भाग पाडले गेले आहेत-
१. मोठमोठय़ा प्रसिद्ध जंगलांमध्ये आढळणारे वन्यजीवन. यांना वन्यजीवन म्हणून दर्जा दिला गेला आहे. शासनाकडून काही प्रमाणात त्याच्या संवर्धनाचे प्रयत्नही सुरू आहेत, 
२. आपल्या आसपास आढळणारी जैवविविधता. हा भाग मुख्यत: दुर्लक्षित राहिला आहे. त्यातही मोठय़ा आकाराच्या जैवविविधतासंपन्न ठिकाणांबद्दल बर्यापैकी  जागरूकता आहे, त्यांना वाचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. पण आपल्या जवळपास म्हणजे अंगणात, परसात असलेल्या जैवविविधतेला सापत्न वागणूक मिळते. ती खरेतर आपल्या संस्कृतीचा एक भाग बनली आहे, पण ती दिवसेंदिवस नष्ट होत आहे आणि त्याकडे काही अपवाद वगळता ना पर्यावरणप्रेमींचे लक्ष आहे, ना वन्यजीवप्रेमींचे!
हे अधोरेखित करण्यामागं एक कारण आहे. ही आसपासची जैवविविधतेवरच शहरातील महत्त्वाच्या जैवविविधतासंपन्न क्षेत्रांचं अस्तित्व अवलंबून आहे. शहरातील हिरव्या टेकडय़ा, पाणथळ जागा, संरक्षित झाडी अशी जैवविविधतासंपन्न ठिकाणं शहराची फुप्फुसं आहेत. या फुप्फुसांचं अस्तित्वच मुळात ‘हिरव्या दुव्यांवर’ तोललेलं आहे. खुरटी झुडपं, छोटे पक्षी, अनेक प्रकारचे किडे, कोळी, साप, सरडे, बेडूक, खार हे सर्व जीव मानवी वस्तीशी इतके जोडले गेले आहे की त्याकडे वन्यजीवन म्हणून पाहिलंच जात नाही. प्रश्न आहे त्यांच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा!
हे सर्व जीव राहतात कोठे? त्यांचा नेमका अधिवास काय? कोणालाही सहज सांगता येईल. बागा, रिकामे भूखंड (प्लॉट्स), घरे-इमारतींच्या आसपासच्या बोळांमधील छोटी झाडं-झुडपं, काटेरी झाडोरा, वाढलेलं गवत, रस्त्याकडील झाड-झाडोरा अशा जागा संपूर्ण शहरभर विभिन्न प्रमाणात पसरलेल्या आहेत. हे अधिवास म्हणजेच ‘हिरवे दुवे’ आहेत. अशा अधिवासात हे छोटे वन्यजीव राहतात आणि प्रजनन करतात. ते आपल्या आसपास राहतात म्हणण्यापेक्षा आपण त्यांच्या आसपास राहतो. कारण ते इथं पूर्वीपासून आहेत, आपण नंतर आलो. आता ऐरणीचा विषय असा, की जर आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी स्वच्छ हवा आणि पर्यावरण हवं असेल, तर अशी जैवविविधतासंपन्न ठिकाणं वाचवणं आवश्यक आहे आणि आधी उल्लेख केलेले हिरवे दुवे टिकविले तरच ती टिकून राहील. दिवसेंदिवस आधुनिकतेकडे वाटचाल चाललेल्या शहरात रिकाम्या मोकळ्या जागांसारखी ठिकाणं बांधकामाच्या रेटय़ातून वाचवणं महाकठीण आहे. परंतु स्वअस्तित्व आणि आधुनिकता यातून निवड करणंही सोपं आहे. रिकामे भूक्षेत्र हे आपल्यासाठी भलेही ‘रिकामे’ असतील, परंतु जैवविविधतेच्या दृष्टीने ते रिकामे नक्कीच नाहीत.
राखी वटवटय़ा, चाळशा,शिंजीर, शिंपी , टीट यांसारखे छोटे पक्षी एका दमात उडून लांबच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. त्यांना छोटय़ा झाडोऱ्यांचा आधार-आडोसा घेतच मार्गक्रमण करावे लागते, पण झाडोरे नष्ट केले, तर दोन प्रमुख जैवविविधता क्षेत्रांमधील संपर्कच तुटून जाईल. जमिनीवरून धावणाऱ्या तितर आणि लाव्हरीसारख्या पक्ष्यांसाठी तर ते आणखी कठीण आहे आणि मग उडताच न येणाऱ्या जिवांसाठी तर अशक्यच. छोटे किडे, सरिसृप, उभयचर, सस्तन प्राण्यांच्या गटांची बेटं बनून राहतील. अशा गटामध्ये अंतप्रजननाच धोकाआहे. हे टाळण्यासाठी हिरवे दुवे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जसं आपण एखादं मोठं डबकं पार करायला त्यातील ठरावीक कोरडय़ा जागा अथवा दगडांवर पाय ठेवत पुढे जातो, तसंच काहीसं हे आहे. आता दिवसागणिक एका नवीन इमारतीचा बांधकाम आराखडा बनत आहे आणि शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागा हळू-हळू भरत चालल्या आहेत. नागरिक म्हणून आपणही आपल्या अंगणा-परसातील झाडोरा वाचवण्यासाठी ठाम पाऊल उचलत नाही. अशा वन्यजिवांचा आता देवच वाली आहे!
हिरवे दुवे आणि रिकामे भूखंड हे स्थलांतरित पक्ष्यांसाठीही अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. हिवाळा येऊन ठेपलाच आहे. या मोसमात युरोप, हिमालय आणि सायबेरियातून कितीतरी पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. यापकी कित्येक प्रवासी पक्षी आपल्या शहरी वस्त्यांच्या आसपास या ऋतूत दिसून येतात. अशा पक्ष्यांसाठीसुद्धा या जागा महत्त्वाच्या ठरतात. काळा थिरथिरा , पिवळा धोबी , करडा धोबी , विभिन्न प्रकारचे वटवटे  असे कितीतरी हिवाळी पाहुणे आहेत. एकीकडे हवामान बदलावर आंतरराष्ट्रीय चर्चा झडत असताना, दुसरीकडे मात्र जैवविविधता नष्ट होत आहे. स्थानिक प्रशासन आपल्या गतीने कार्यरत राहीलच पण वैयक्तिक पातळीवर जबाबदारी स्वीकारून त्या दिशेनं कृती करणं आज महत्त्वाचं आहे.
संपूर्णपणे अर्थशास्त्रावर आधारित विकासप्रक्रियेमध्ये जैवविविधता टिकवणं हे एक आव्हान आहे, पण ते पेलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असाही एक मतप्रवाह आहे, की शहरांमध्ये विकास अपरिहार्य आहे, त्यामुळे जागा रिकाम्या ठेवणं शक्य होणार नाही (याला खरा 'विकास' म्हणता येईल का? हा एक निराळाच विषय आहे.) यालाही पर्याय काढता येईल. त्यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित विषयातील तज्ज्ञांना एकत्र यावं लागेल. शहराचा संपूर्ण आराखडा समोर ठेऊन त्यातील अशा रिकाम्या जागा हेराव्यात ज्या की मोक्याच्या ठिकाणी आहेत; मोक्याच्या अशा अर्थाने की ती जागा दोन ठळक जैवविविधता क्षेत्रांना जोडणारी असावी. आता अशा जागांवर बिलकुल बांधकाम होणार नाही याची काळजी नक्कीच घेता येईल. म्हणजे पुढच्या कित्येक पिढय़ांसाठी शहरातील जैवविविधतेचा जनुकीय संग्रह  सुदृढ राहील. एकदा अशा मोक्याच्या जागा आणि इतर हिरवे दुवे निश्चित केले की मग त्यांना संरक्षित ठेवायची जबाबदारी नागरिक आणि प्रशासन यांवर समान राहील. अशा जागांवरील होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात नागरिकांकडून माहिती नोंद करवण्यासाठी स्थानिक प्रशासनानं एखादी हेल्पलाइन सुरू करणं फायदेशीर ठरू शकेल.
प्रश्न सह-अस्तित्वाचा आहे, त्यामुळे सदसद्विवेकबुद्धीचा कस लागणार, हे नक्की! द्रष्टेपणा आणि संवेदनक्षमतेचा अमूल्य वारसा तर महाराष्ट्राला लाभला आहेच. नुसतं नाव जरी घेतलं, तरी रोमांच यावा अशी कितीतरी व्यक्तिमत्त्वं या दगडा-धोंडय़ांच्या महाराष्ट्रदेशानं दिलेली आहेत. त्याच वैचारिकतेचा वारसा याही बाबतीत पुरेसा दिशादर्शक ठरू शकेल, हे निसंशय! 

1 Comment:

Vinayak Pandit said...

तुमचा निसर्गवार्ता ब्लॉग आवडला प्रवीण! वेगळा तर आहेच आणि तो तुम्ही मांडलायही छान! मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...