ईला फाऊंडेशनतर्फे शिकारी पक्ष्यांवर माहितीपट


पुणे - शिकारी पक्षी आणि त्यांच्या संरक्षणासाठी अभ्यासाची आवश्यकता, या मुख्य उद्देशाने येथील ईला फाऊंडेशनतर्फे येत्या शनिवारी (ता. ११) विशेष माहितीपट दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निसर्गसेवक संस्थेने प्रायोजित केला असून, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) टाटा सभागृहात होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे डॉ. सतीश पाटील आणि राजगोपाल पाटील यांनी येथे दिली. या कार्यक्रमासाठी प्रवेश शुल्क नाही.

दक्षिण कोरियामध्ये अलिकडेच सातव्या आशियाई शिकारी पक्षी संशोधन आणि संवर्धनावर (एआरआरसीएन) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात डॉ. पांडे, पाटील, प्रशांत देशपांडे आणि संजय खटावकर उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. पांडे आणि आयएसएसईआरचे डॉ. नीलेश डहाणूकर यांनी घुबडांवर केलेल्या संशोधनाबाबतचा शास्त्रीय अहवाल सादर केला. एआरआरसीएनचे(ARRCN) जगभरात ३४ देश सदस्य आहेत.

या माहितीपटामध्ये उणे १४० अंश तापमानात राहणारे शिकारी पक्षी, विशिष्ट प्रजातीच्या गिधाडांचे प्रचंड थव्यांसह जपानी रेड क्राऊन्ड क्रेन आणि व्हाईट नॅप्ड क्रेनसह अन्य अनेक पक्ष्यांचे दर्शन होईल. ईला फाऊंडेशनच्या या पथकाने शिकारी पक्ष्यांच्या मलेशिया, थायलंड, फिलिपीन्स, तैवान आणि मंगोलियातील अभ्यासकांच्या खास मुलाखती घेतल्या आहेत. अमेरिकेतील पेरेग्रिन फाल्कन निधी आणि डेन्व्हर प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनाही शिकारी पक्ष्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता पटलेली आहे. निसर्गप्रेमींना पहिल्यांदाच विविध देशांतील शिकारी पक्ष्यांच्या अभ्यासकांचे मत पाहता येणार आहे.

निसर्गसंवर्धनामध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकाने हा माहितीपट पाहण्याची आवश्यकता आहे. ईला फाऊंडेशनतर्फे निसर्ग संवर्धनासाठी तयार करण्यात आलेला हा दहावा माहितीपट आहे, असे डॉ. पांडे आणि निसर्गसेवकचे विवेक वेलणकर यांनी सांगितले.


-सकाळ वृत्तसेवा

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...