विहंगम संमेलन!

आताशा संमेलने भरपूर झाली आहेत, पण म्हणून काही प्रत्येक संमेलनाला जाणाऱ्यांच्या गर्दीत वाढ झालेली नाही. कमी-अधिक फरकाने तीच मंडळी वेगवेगळ्या संमेलनांमध्ये भेटतात. म्हणजे गिरिमित्र संमेलनाचे सूप वाजले त्या वेळेस अनेकांनी एकमेकांना विचारणा केली होती, पक्षिमित्र संमेलनाला येणार आहेस का? किंवा दुर्गमित्र संमेलनात असणार का? म्हणजे मित्र तेच असतात. फरक इतकाच की, ते कधी दुर्गमित्र असतात, कधी गिरिमित्र तर कधी पक्षिमित्र. एक मोठा गट प्रत्येक संमेलनात असा सारखाच असतो. कारण हे सारे मुळात निसर्गमित्र असतात. त्यांना दऱ्या-खोऱ्यांमध्ये रमायला आवडते, त्याचाच ते अभ्यासही करू लागतात आणि मग निसर्गाच्या अधिक जवळ जातात. त्यांनी हे असे असणे हे एकमेकांना पूरक असेच असते; किंबहुना त्यांनी तसेच असायला हवे, असा आग्रह तर अलीकडेच पार पडलेल्या रौप्यमहोत्सवी पक्षिमित्र संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष प्रख्यात पक्षितज्ज्ञ डॉ. उल्हास राणे यांनी धरला होता. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पक्षिमहर्षी डॉ. सलीम अली आणि हुमायून अब्दुल अली यांच्यासोबत पक्षिअभ्यास करतानाचे काही किस्से सांगितले. पक्षिमित्रांनी गिर्यारोहणाचा वसा घेतला तर अस्तंगत झालेले पक्षीही कसे सापडतात त्याचे ते किस्से होते. ते सांगून डॉ. राणे यांनी पक्षिमित्रांना गिर्यारोहक होण्याचे आवाहन केले. केवळ तेवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी या रौप्यमहोत्सवी पक्षिमित्र संमेलनाचा मूळ विषय असलेल्या महानगरातील पक्षिवैविध्याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. गेली अनेक वर्षे डॉ. राणे यांचा या विषयाचा अभ्यास आहे. त्यामुळेच त्यांनी या संदर्भात काही ठोस सांगावे, असे अपेक्षित होते. ही अपेक्षाही डॉ. राणे यांनी पूर्ण केली आणि महानगरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीत (डीसी रूल्स) जैववैविध्याचा समावेश ‘जैवविविधता कायद्या’च्या मार्फत थेट करण्यात यावा, अशी मागणीच त्यांनी संमेलनाध्यक्ष या नात्याने केली. तशाच आशयाचा ठराव संमेलनाच्या अखेरच्या खुल्या सत्रामध्ये मांडण्यात आला व तो संमेलनाच्या वतीने एकमताने मंजूरही करण्यात आला.
संमेलनाचे उद्घाटन झाले की, मग त्यानंतर संमेलनाध्यक्ष केवळ शोभेचे बाहुले म्हणून संमेलनात फिरतात आणि अनेक सत्रांमधून गायब असतात, असा अनुभव इतर संमेलनांतून अनेकदा येतो, पण डॉ. राणे हे त्याला अपवाद ठरले. संमेलनातील सर्वच्या सर्व सत्रांना ते स्वत: उपस्थित होते. सर्वच सत्रांमधून संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांनी व्यक्त केलेल्या मतांमधून, निरीक्षणांमधून त्यांचा या क्षेत्रातील गाढा अनुभव बोलत होता. शिवाय ते खूप वास्तववादी आणि आदर्श कल्पना वास्तवात येण्यासाठी प्रयत्नशीलही आहेत हे त्यांच्या निरीक्षणांमधून जाणवत होते. या अर्थाने बोलायचे तर संपूर्ण संमेलनावर त्यांचा स्वत:चा असा एक वेगळा ठसा जाणवला.
संमेलनाचे उद्घाटन हा तर औपचारिक समारंभच असतो. खऱ्या अर्थाने संमेलन सुरू होते ते दुसऱ्या दिवशी. आजवरची सर्व पक्षिमित्र संमेलने ही राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाली आणि हे रौप्यमहोत्सवी संमेलन मुंबईत. ते रौप्यमहोत्सवी होते म्हणूनच त्याचे प्रमुख आयोजक असलेल्या अश्वमेध प्रतिष्ठानने ते तीन दिवस करण्याचा घाट घातला होता. रौप्यमहोत्सवी संमेलन मुंबईत, राज्याच्या राजधानीमध्ये व्हायला हवे म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिभास आमोणकर प्रयत्नशील होते. त्यांनी हाक दिली आणि मग मकरंद येडुरकर, प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे, सुहास जोशी आदी त्यांचे मित्र मदतीला धावून आले. मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात तीन दिवसांचे संमेलन करणे हे शिवधनुष्यच होते. पण तरुण कार्यकर्त्यांची फळी कामाला लागली. राज्याच्या वनविभागाचा सहभाग लाभला आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सहआयोजक झाले. उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी मदतीचा हात पुढे केला तसाच हात पुढे केला तो सहआयोजक असलेल्या श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळाने. त्यांच्या चोगले शाळेमध्येच संमेलनाची सर्व सत्रे पार पडली. पहिल्या दिवशी सकाळी शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा पार पडली. ऑलिम्पसच्या वतीने छायाचित्रकार गोपाळ बोधे यांचे वन्यजीव चित्रणावरील शिबीर पार पडले. त्याच वेळेस राष्ट्रीय उद्यानाच्या केंद्रामध्ये टॅक्सिडर्मी शिबीरही झाले. मृत पक्ष्यांच्या शरीरात भुसा भरून त्यांचे जतन करण्याची ही कला आता अस्तंगत होत आहे. त्यानंतर सायंकाळी औपचारिक उद्घाटन पार पडले.
दुसऱ्या दिवशी सर्व अभ्याससत्रे होती. याचसाठी संमेलनाचा घाट घालण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील वरणगावच्या चातक नेचर क्लबच्या अनिल महाजन यांनी १२० गायबगळ्यांच्या केलेल्या मुक्ततेवर सादरीकरण केले. गावातील एका मोठय़ा वृक्षावर त्यांची वस्ती होती. मात्र त्यांचा आवाज आणि खाली पडणारी विष्ठा यामुळे हैराण झालेल्या काही गावक ऱ्यांनी झाडाच्या फांद्या कापायला घेतल्या. त्याला पक्षिमित्रांनी विरोध केला. एका रात्रीत पक्षिमित्र एकवटले. त्यांनी टोपल्या घेतल्या. त्यात काटक्यांची बिछायत तयार केली. दोन खांबांना दोऱ्या लावून त्यावर त्या टोपल्या टांगल्या. कारण रात्री त्या टोपल्या झाडावर टांगणे शक्य नव्हते. पक्षी परतले त्यांच्या बाळांची काळजी घेण्यासाठी.. आणि सकाळ होताच त्या टोपल्या झाडावर टांगल्या. केवळ आठ पिल्ले दगावली, मात्र १२० वाचली. हे सादरीकरण तुफान प्रतिसाद घेऊन गेले. एवढेच नव्हे तर आयोजकांनी अखेरच्या दिवशी या सादरीकरणाला विशेष पुरस्कार देऊन गौरविले.
डॉ. उमेश करंबळेकर यांनी ‘पक्ष्यांची तहान’ या विषयावर केलेले सादरीकरण साधासाच वाटणारा प्रयोगही किती शिकवून जातो, ते सांगणारा होता. साताऱ्यानजीक असलेल्या त्यांच्या जागेमध्ये त्यांनी पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी एक मध्यम आकाराचे भांडे ठेवले होते. त्यावर तब्बल १५ प्रकारचे पक्षी आले. त्याची नोंद तर त्यांनी केलीच पण त्या वेळेस त्यांना पक्ष्यांच्या वर्तणुकीविषयी खूप चांगले शिकता आले. एक पक्षी पाणी पीत असताना दुसरा थांबलेला असतो. त्याचे झाले की, दुसरा पुढे येतो.. तिथे कुठेही बोर्ड नसतो लावलेला ‘रांगेचा फायदा तुम्हाला, आम्हाला, सर्वाना..’ ..पण पक्षी माणसे नाहीत, हेच यातून लक्षात आले.
अमळनेरच्या उडाण पक्षिमित्र संघटनेच्या वतीने अश्विन पाटील यांनी रातबगळ्यांचा जन्मसोहळा हे सादरीकरण केले. उन्हाळ्याच्या कडाक्याने बगळ्यांच्या पिल्लांना उष्माघाताचा फटका बसला, ते घरटय़ातून खाली पडले. त्यांना संघटनेच्या पक्षिमित्रांनी वाचवले आणि त्यांना पुन्हा निसर्गात सोडून दिले.. गावागावांतून सुरू असलेले पक्षिमित्रांचे चांगले काम यानिमित्ताने समोर येत होते. डॉ. ए. एन. कुलकर्णी यांनी किनवट परिसरातील पक्षिजीवन आणि ऋतुमानाचा त्यांच्यावर होणारा परिणाम यावर सादरीकरण केले. शिवडी-माहुल परिसरातील फ्लेमिंगो आणि पक्षिवैविध्य यावर सृष्टिज्ञानच्या प्रशांत शिंदे यांनी सादरीकरण केले. प्रस्तावित शिवडी-न्हावाशेवा पुलामुळे मात्र ते धोक्यात येण्याची शक्यता आहे. शिवाय गेल्या काही दिवसांत या खाडी परिसरातील पाण्यातही काही विषद्रव्ये आढळली आहेत. त्यामुळे या परिसराला संरक्षित घोषित करून पक्षिवैविध्य राखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका प्रशांतने मांडली. बीएनएचएस अर्थात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने हा पूल ७०० मीटर्स दक्षिणेला सरकवल्यास प्रश्न सुटेल, असे म्हटले आहे. तो मुद्दाही सादरीकरणात अधोरेखित करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे अखेरच्या सत्रात हा परिसर संरक्षित परिसर म्हणून घोषित करण्याचा ठरावही संमत करण्यात आला.
डॉ. जयंत वडदकर यांनी सातपुडय़ात पुन्हा एकदा दिसू लागलेल्या जंगल घुबडासंदर्भातील सादरीकरण केले. झाडांच्या ढोलीमध्ये ते राहायचे. मात्र मोठी ढोली असणारे वृक्षच जंगलतोडीमध्ये नष्ट झाले आहेत. मोठी माळराने नष्ट झाली आहेत. त्यामुळेच घुबडांवर संक्रात आली आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाची कारणे आहेत, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ आदेश शिवकर यांनी पक्षिपर्यटन या सध्या वेगात विस्तारणाऱ्या क्षेत्राकडे लक्ष वेधले. त्या संदर्भातील आकडेवारी तर त्यांनी सादर केलीच, पण त्यातील निसर्ग संवर्धनाच्या मुद्दय़ावर भर दिला. राज्याचे प्रधान वनसंरक्षक माधव गोगटे यांनी वनकायद्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी समजावून सांगितल्या आणि पक्ष्यांच्या तस्करीच्या मुद्दय़ावर सादरीकरण केले.
संमेलनातील हा दुसरा दिवस खूपच महत्त्वाचा होता कारण पक्षिमित्र संमेलनाचे प्रणेते डॉ. प्रकाश गोळे स्वत: या सर्व सत्रांना उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या सारस क्रौेच पक्ष्यांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांवर ईश्वरप्रसाद गौतम यांनी सादरीकरण केले. त्या वेळेस त्यांनी भीती व्यक्त केली की, या पक्ष्यांची गेल्या २५ वर्षांतील घरटे करण्याची जागा ही आता नष्ट होण्याच्या बेतात आहे. कारण त्या जागेची विक्री होते आहे. त्यावर मूळ पक्षिमित्र संघटनेचे भाऊ काटदरे यांनी पुढाकार घेऊन संघटनेनेच ती जागा विकत घेण्याची शिफारस केली आणि ते संमेलनात मान्यही करण्यात आले. रौप्यमहोत्सवी संमेलनाची ही मोठीच फलश्रुती होती. त्याला डॉ. गोळे यांनी संशोधन प्रयोगशाळेचे एक वेगळे परिमाणही दिले. या ठिकाणी आता पक्षिमित्रांना प्रशिक्षण देण्यासाठी काम केले जाईल.
दुसऱ्या दिवशी खुल्या अधिवेशनात यावल अभयारण्यासंदर्भातील ठरावही संमत करण्यात आला. संमेलनाच्या समारोपाला पर्यावरणवादी असा परिचय असलेले संवेदनशील अभिनेते अतुल कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पर्यावरणाचे शत्रू वाढल्याने मित्रांचे संख्याबळ वाढविण्यावर तर त्यांनी भर दिलाच, पण आपल्या मनातील काही गैरसमज काढून टाकून मानसिकता बदलण्याचे आवाहनही त्यांनी केले. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नेहमीच्या पद्धतीने पोडियमजवळ जाऊन भाषण करणे टाळले आणि उपस्थितांशी संवाद साधला. संमेलन चढत्या भाजणीने उत्तरोत्तर रंगत गेले आणि अतुल कुलकर्णी यांच्या तेवढय़ाच संवेदनशील संवादाने आणि मानसिकतेच्या बाबतीत ‘कान टोचण्याने’ त्याची सांगता झाली. संमेलनाचे सूप वाजले की, त्यातून काय हाती लागले याची चर्चा होते. या रौप्यमहोत्सवी संमेलनाची फलश्रुती लिहायला घेतली तर बऱ्याच गोष्टींची नोंद जमेच्या खात्यात करावी लागेल. पक्षी अभ्यासकांच्या नोंदी, निरीक्षणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता थेट कृतीसाठी शेतात उतरण्याचा पक्षिमित्रांनी घेतलेला निर्णय यांची नोंद घ्यावीच लागेल.. पण ‘खऱ्या अर्थाने संमेलन यशस्वी झाले’ हे म्हणण्यासाठी मात्र काही काळ वाट पाहावी लागेल पक्षिमित्र गिर्यारोहक होण्याची.. तेच तर संमेलनाध्यक्ष सांगून गेले!
पक्षी घेतात जंतुसंसर्गाची काळजी !
संपूर्ण संमेलनात सर्वाना आ वासायला लावणारे सादरीकरण होते ते बीएनएचएसमधील अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांचे. त्यांनी इंडियन ग्रे हॉर्नबिलबद्दल केलेला अभ्यास सादर केला. यातील अनेक निष्कर्ष हे आश्चर्यकारक आणि तोंडात बोट घालायला लावणारे होते. हे पक्षी त्यांच्या घरटय़ाची निगा कशी राखतात आणि तिथे जंतुसंसर्ग कसा होऊ देत नाहीत, याचा हा अभ्यास होता. यात असे लक्षात आले की, नर झाडाची साल आणतो आणि ती घरटय़ामध्ये देतो. त्यानंतर ती साल खाली टाकीत जाते. त्याचा अभ्यास केल्यावर डॉ. कसंबे यांच्या लक्षात आले की, ती साल मादी पिल्ल्यांच्या पाश्र्वभागाखाली ठेवते. त्यावरची त्यांची विष्ठा सालीसकट बाहेर फेकली जाते. पक्ष्यांचे हे वर्तन आश्चर्यकारक तर आहेच, पण आजवर प्रथमच हे संशोधकांना लक्षात आले आहे. मात्र एवढा विचार करणारे हे प्राणी काही विचार मात्र करत नाहीत किंवा त्यांना त्याचे आकलन होत नाही. अनेकदा तो नर मोठी साल आणतो जी घरटय़ाच्या तोंडातून आत जात नाही. तरीही परत परत तो मोठीच साल आणताना आणि ती आत ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कसंबे यांची ही निरीक्षणे महत्त्वाची तर होतीच, पण सादरीकरण संपल्यानंतर बराच काळ त्याची चर्चा होत राहिली.[This Article about birds is written by vinayak.parab@expressindia.com for Loksatta daily]

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...