अजि म्या वाघ पाहिला!


मी जंगलसफारीला सुरुवात केली, तेव्हा भटकंतीसाठी म्हणून जंगलाकडे वळणाऱ्यांची संख्या खूपच कमी होती. कोणत्याही सीझनमध्ये गेले तरी कान्हासारख्या जंगलात बगीरा लॉगहटमध्ये बुकिंग न करता सहज रूम्स मिळायच्या. असेच एकदा मित्रांबरोबर ताडोबाला जायचे ठरले. जंगलाबद्दल माहिती जमवण्यासाठी म्हणून मी ‘डब्ल्यूडब्ल्यूएफ’च्या पुणे कार्यालयात गेलो.
त्या वेळेस संस्थेचे पुण्यातील कामकाज विजय परांजपे बघायचे. त्यांनी सल्ला दिला की, इतके लांब जाताय तर कान्हाला जा. तिथे नक्कीच तुम्हाला वाघ बघायला मिळतील. कान्हाबद्दलची सर्व माहिती गोळा करून १९८४ च्या मे महिन्यात आम्ही कान्हा गाठले. मनात कान्हाच्या जंगलात वाघ पाहायची उत्सुकता होतीच. तिथे पोहोचायला रात्र झाली. सकाळी पर्यटकांसाठीची महिंद्र जीप घेऊन जंगलाचा फेरफटका केला. त्यावेळी मोर, हरणे, सांबर, गवे, वानरे पाहायला मिळाली, पण वाघ दिसला नाही. तेव्हा दुपारी ताशी २० रू. या दराने फिरायला मिळणाऱ्या हत्तीवर बसून जंगलात गेलो.
आमच्या माहूताचे नाव होते अब्दुल सबीर आणि हत्तीचे नाव होते शिवाजी. तो एक मोठ्ठा नर हत्ती होता. साधारण अर्धा तासाच्या भटकंतीनंतर एका पाणवठय़ावर पाण्यातून नुकतेच कुठलेतरी जनावर उठून गेल्याच्या खुणा होत्या. ते पाहून सबीर आनंदला. आसपास वाघ असल्याचे लक्षात घेत सबीरने त्या वाघाचा माग काढण्यासाठीच्या हालचाली केल्या. हत्तीला इशारे केले आणि पंजांचा माग काढील एकाजागी हत्ती जागी उभा राहिला आणि सबीर उद्गारला- ‘साब वो देखो शेर!’ माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. समोर नाल्याजवळ उघडय़ावर वाघीण बसली होती. मी त्या काळच्या माझ्या व्हिडीओ कॅमेरातून शूटिंग करत होतो. मी पुरता घामेजलो, घाबरून नव्हे तर वाघाच्या दर्शनाच्या त्या विस्मयकारी अनुभवाने. त्यानंतर ती वाघीण येथून उठून नाल्यात गेली. तिथे एके ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या होत्या. त्यात तिने मान घातली आणि मानेला एक झटका दिला. धोबी जसे कपडे फिरवून आपटतो तसे एका मादी सांबराचे धड गोल फिरून उघडय़ावर येऊन पडले. वाघिणीने शिकार खायला सुरुवात केली. वाघिणीने दिसल्यानंतर लगेचच आपल्या अजस्र ताकदीचे दर्शन घडवले होते आणि तिथेच माझ्या जंगलवेडाला खरी सुरुवात झाली. आज मी तिला वाघीण म्हणून संबोधन वापरतोय, पण मला स्वत:ला मात्र तो वाघ दिसल्यावर वाघ आहे का की वाघीण, ते कळायला बरीच वर्षे गेली.
त्यानंतर शिकार थोडी खाल्ल्यावर वाघीण पुन्हा उघडय़ावर येऊन बसली आणि तिने मांजरासारखा आवाज काढला. आम्ही शांतपणे वाघीण न्याहाळत होतो. काही मिनिटांत डोंगराकडून शिंकल्याचा आवाज झाला, म्हणून तिकडे पाहिले. तिथे तीन-चार गवे लांब अंतरावर उभे होते. त्या पलीकडे मांजरापेक्षा थोडे मोठे वाघाचे तीन छावे उभे होते. वाघीण हलक्या आवाजात गुरगुरली तसे ते गवे पुढे सरकले आणि पिलांचा रस्ता मोकळा झाला. पिलं आईकडे सुसाट पळत सुटली व अक्षरश: आईला येऊन धडकली. मग दूध पिणे,आईबरोबर खेळणे, इतरांबरोबर मस्ती सुरू झाली. जंगलासाठी ती दररोजची गोष्ट होती. पण अनंत झांजलेचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याकरिता पुरेसं होतं. इतक्या वर्षांनंतरही तो प्रसंग अजूनही कालच घडल्यासारखा माझ्या डोळ्यांसमोर आहे. तोच फक्त नाही तर त्यानंतर पाहिलेला प्रत्येक वाघ मला कालच पाहिल्यासारखा वाटतो. त्यानंतर मी वाघ खूप जवळून पाहिले. अगदी सात दिवसांच्या लहान पिलापासून शेवटचे आचके देऊन मरणारा वाघही पाहिला. पण तरीही प्रत्येक वेळेस वाघ दिसला की, मी पहिल्यांदाच वाघ बघितल्यासारखा आनंदित होतो.
त्यानंतर माझ्या कान्हाच्या फे ऱ्या वाढायला लागल्या. जंगलात नवीन मित्र मिळायला लागले. कोणी इतर सहप्रवासी सांगायचे, म्हणून कान्हासोबत इतर जंगल बघायला सुरुवात केली. माहूत, गाइड, वाहनचालक, चारा कटर, वन्य अधिकारी व सहप्रवाशांबरोबर दररोज चर्चा करून ज्ञानात भर पडत होती. वाघांविषयी तिथल्या वन्य जीवनाविषयी माहिती वाढत होती.
साधारण १९९२ पर्यंत माझ्याबरोबर येणारे माझे मित्र कान्हाला सारखे सारखे जाऊन कंटाळून यायचे बंद झाले होते. पण माझे जंगलात जाणे कमी व्हायच्याऐवजी त्यात कान्हाबरोबर इतर जंगलांचीही भर पडत वाढत गेले. १९९६ साली मी स्टील कॅमेरे वापरायला सुरुवात केली. तो पर्यंत १०-१२ वर्षांपूर्वी दिसायचे, तेवढे वाघ आणि इतर प्राणी दिसत नव्हते. पण आतापेक्षा नक्कीच जास्त दिसायचे. कॅमेरा जरी माझ्याकडे होता तरी प्राण्यांचे फोटो काढणे ही वेगळीच कला होती. भारतीय जंगलात चांगले फोटो कसे काढायचे, यावर कुठेच माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्येक जंगलभेटीत कधी माहुताकडून तर कधी इतर सहप्रवाशांकडून काहीतरी नवीन शिकायला मिळायचे. नवीन जागा कळायच्या. त्यातून सुधारणा होत गेली. १९९७ साली नीहार इंडियन वन्य जीव छायाचित्रकार म्हणून निवड झाली. १९९८ साली पहिल्यांदा बी.बी.सी. मध्ये उपांत्य फेरीत व १९९९ मध्ये अंतिम फेरीत पोहोचलो. त्या नंतर दर वर्षी बीबीसी, जर्मनीच्या वन्य जीव छायाचित्रण स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत पोहोचत राहिलो.
मी माझ्या छंदावर खूश होतो. जंगलातून परत आल्यावर मित्रांना जवळच्या लोकांना मिळालेले फोटो दाखवून घडलेले प्रसंग सांगायचो. जंगलात जर कोणाला जायचे असेल, तर सर्व माहिती पुरवायचो. एकदा असंच डॉ. शिरोळेंना कान्हाला जायचे होते. म्हणून त्यांना माहिती देत होतो तेव्हा सहज सुचले,म्हणून त्यांना तिथल्या आदिवासींना आणि कर्मचाऱ्यांना तपासून औषध द्या, म्हणून सुचवले. त्यांनी ती कल्पना उचलून धरली व २००२ च्या ऑक्टोबर महिन्यात कान्हाला आठशे तर २००३ जानेवारीत बांधवगढला साडेपाचशे जणांना तपासून औषधे दिली. वयाच्या ७०व्या वर्षी एखाद्या युवकाच्या उत्साहाने डॉ. शिरोळे रुग्णांना तपासत होते. त्या भटकंतीत डॉक्टरांनी सुचवल्यानंतर प्रवासाचे अनुभव लिहिण्यास हळुहळू सुरुवात केली. लिखाणाचे पुस्तक करण्याचे ठरवले तेव्हा पुस्तकासाठी म्हणून छायाचित्रांची निवड करत होते. तेव्हा लक्षात आले की, माझ्याकडे सुमारे एक लाख छायाचित्रे जमा झाली होती. पुस्तकासाठी म्हणून सुमारे शंभर छायाचित्रे घ्यायची होती, मात्र प्रत्यक्षात ५०० छायाचित्रे शॉर्टलिस्ट झाली. पुढचे काही महिने ५०० छायाचित्रांमधून १०० छायाचित्रे निवडण्याचा प्रयत्न करीत होतो, मात्र जमेचना. काही छायाचित्रांचा त्यात नव्याने अंतर्भाव होत होता, तर काही छायाचित्रे वगळत होतो. एवढे करून शेवटी छायाचित्रांचा आकडा ५०० वरच स्थिरावला. सरतेशेवटी १२८ छायाचित्रे निवडली. प्रत्येक छायाचित्राची चार-पाच ओळींत माहिती लिहिली छायाचित्रे क्रमवारीनुसार लावली. पुस्तकासाठी माझे गुरु श्री शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी प्रस्तावना दिली. डॉ. हर्डीकर, मदन गोकुळे यांच्या मदतीने या पुस्तकाला अंतिम रूप दिले.  पुस्तकातून जंगल, भारतीय वन्य जीवन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे छपाई, बांधणी यात विशेष लक्ष देऊन हे पुस्तक जागतिक दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस पुस्तक छापून तयार झाले.
जंगल तसेच तिथले प्राणी मी जवळून पाहिले, अनुभवले. हा अनुभव सगळ्यांनाच मिळतो, असं नाही. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना मी पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या भारतीय वन्य जीवनाची झलक पुस्तकरूपाने अनुभवायला मिळावी व आपल्या पुढच्या पिढय़ांना आपला कमी होत जाणारा नैसर्गिक वारसा निदान चित्ररूपात तरी पाहायला मिळावा, हीच या पुस्तक लेखनामागची मूळ प्रेरणा होती.


-अनंत झांजले ,लोकरंग,लोकसत्ता
wildindiaz@rediffmail.com

1 Comment:

Anonymous said...

हे पुस्तक कसे मिळू शकेल?

Related Posts Plugin for WordPress, Blogger...