चिऊ ये, दाणा खा...

-डॉ.श्रीश क्षीरसागर

अजूनही काही ठिकाणी सकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने जाग येते. घराभोवतीच्या बागेतल्या झाडाच्या शेंड्यावर बसून लालबुड्या बुलबुल ताना घेतो. विणीच्या हंगामात काळे-पांढरे दयाळ सुरेल गाणी गात राहतात. दिवसभरात तीन-चार वेळा तपकिरी पंखांच्या भारद्वाजाच्या धीरगंभीर हुंकारांनी आसमंत भरून जातो. छतावर, गॅलरीमध्ये, खिडक्यांत बसून होले-पारवे घुमत राहतात. तुतारीच्या पिवळ्या, पावडर पफच्या लाल फुलांतला मधुरस चुखता चुखता मध्येच मान वर करून इवलासा गर्दजांभळा शिंजीर (सनबर्ड) मंजूळ आवाजात किणकिणतो. लगोलग साळुंक्या, ब्राह्मणी मैना थव्याने येऊन नळावरच्या बायकांप्रमाणे कलकलाट करतात. झाडांच्या फांद्यांमधून राखी टीट अळ्या शोधत असतो. त्याच्या मागोमाग तपकिरी डोक्याचा ऑलिव्ह ग्रीन रंगाचा शिंपी पक्षी शेपटी नाचवीत ठुमकत असतो. मध्येच केव्हातरी दुभंगलेल्या शेपटीचा काळा कोतवाल येऊन वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची ‘मिमिक्री’ करत निघून जातो. दुपारच्या टळटळीत उन्हाच्या शांत-निवांत वेळी हिरव्या पानांत दडून लाल टिळा कपाळी लावलेला तांबट पुकपुकत राहतो. पानं उलटीसुलटी करून तपासणारा राखी वटवट्या कावळ्याची काव काव ऐकू येताच स्तब्ध बसतो. सतत शेपटी वरखाली करणारा थिरथिर्‍या जमिनीवर उतरून किडे टिपू लागतो. एवढय़ात कुठूनसा उगवलेला इवलासा लेमन यलो रंगाचा ‘चष्मेवाला’ (व्हाईट आय) नळातून ठिबकणारं पाणी तब्येतीत पिऊन जातो.
बागेत जर फळझाडं असतील, तर या सार्‍यांबरोबर आणखीही काही अनवट पाखरं हजेरी लावून जातात. लालभडक चोचीचा सोनपिवळा हळद्या पिकल्या फळांसाठी दिवसभरात हमखास एखादी चक्कर मारून जातो. दोन-तीन प्रकारचे पोपट कर्कश ओरडत येऊन लगबगीने बागेतल्या फळांचा फडशा पाडून जातात. पावसाळ्याच्या सुरुवातीला ‘पेर्ते व्हा’च्या खणखणीत हाका देणारा लाजरा पावशा फळबागांमध्ये रमतो. कोकणातल्या शहरात काळ्या-पांढर्‍या रंगाचा, तर देशावर राखी रंगाचा धनेश पपईसारखी फळं पिकू लागली की, त्यांवर ताव मारण्यासाठी कलकलत येतो. आंब्याच्या झाडावर कोकीळ-कोकिळा अवतरली नाही, असं सहसा कधी घडत नाही. तांबूस बुडाचा रॉबिन अन् बोटाएवढा फुलचुख्या तर सारी बाग आंदण मिळाल्यासारखे बागडत असतात.
शहरातून एखादी नदी वा ओढा वाहत असेल, वा शहरात एखादा तलाव असेल, तर त्यासारखं भाग्य नाही. बहुतेक शहरांत यापैकी एखादा जलस्त्रोत असतोच आणि त्याच्या आधाराने, त्याच्या परिसरात हजारो वर्षांपासून मोठा पक्षीवर्ग टिकून राहिलेला दिसतो. पाण्याचा प्रवाह, त्याच्या काठापासचे उथळ पाणी, त्यातल्या पाणवनस्पती, त्यांचे कंद-फुले- बिया, जमिनीजवळची दलदल, त्यामध्ये राहणारे बेडूक, खेकडे, मासे, गोगलगायी व तत्सम जलचर, काठावरच्या चिखलातले सूक्ष्म जीव, गवत, खास पाण्यात येणारी वाळुंजसारखी व पाण्याकाठी वाढणारी करंजासारखी झाडे, मध्यम आकाराची झुडपे, नदीकाठी क्वचित दिसणारे वाळवंट या सार्‍यांमुळे निर्माण होणार्‍या खास परिसंस्थेत किमान तीस-चाळीस जातींचे तरी पक्षी सहजी दिसतात. सहा-सात प्रकारची बदके, पाच-सहा प्रकारचे बगळे-करकोचे, पाणकावळे, खाली वळलेल्या चोचींचे कुदळे, स्पूनबिल, टिटवी, तुतवार, धोबी, करवानक, शेकाट्या, पाणलावी, गल्स, नदीसुरळ, पाणडुब्या, पाणकोंबड्या, खंड्या, पाणभिंगर्‍या, कमलपक्षी, कुरल, सापमान्या, गॉडविट असे एक ना अनेक रंगाकारांचे पक्षी शहरांतल्या जलस्त्रोतांच्या कुशीत सुखाने जगत असतात. या पक्ष्यांच्या मागावर दलदल ससाणा, कुकरी (ड२स्र१ी८) ब्राह्मणी घार असे शिकारी पक्षीदेखील पाणवठय़ांजवळ घिरट्या घालताना दिसतात. हिवाळ्याच्या स्थलांतराच्या मोसमात तर बहुतेक सारे पाणवठे बदकांनी, इतरही शेकडो पक्ष्यांनी फुलून गेलेले दिसतात.
शहरातली जुनी महाविद्यालयं, सरकारी कार्यालयं व वसाहती, संस्था, कारखाने, देवस्थानं, प्रकल्प, गोदामं, पडके वाडे, गढय़ा, किल्ले, इतकेच काय तर विविध धर्मीयांची स्मशानं ही सारी ठिकाणंही फारच महत्त्वाची! यांच्या परिसरात बर्‍यापैकी संख्येने जुने वृक्ष टिकून असतात. मोठमोठय़ा खोडांचे उंचच उंच वाढलेले हे पुराणवृक्ष काही खाशा पक्ष्यांचा शेवटचा आधार आहेत. धनेश, सुतार, पिंगळा, गव्हाणी घुबड, ससाणे, शिक्रा, काही जातींचे गरुड, रातबगळे, कुदळ्या, पावशा, हळद्या, सातभाई, नाचण, टकाचोर, स्वर्गीय नर्तक, नीलकंठ, हुदहुद, रातवा, नवरंग, हिरवं कबुतर, काही फ्लायकॅचर्स अशा शहरांत दुर्मिळ होत चाललेल्या पाखरांना ही शांत सुरक्षित ठिकाणची मोठाली झाडं घरटी करण्यासाठी योग्य जागा पुरवतात. या वृक्षांच्या अंगाखांद्यावर बागडत बर्‍याचशा पक्ष्यांच्या पिढय़ा मोठय़ा होत आलेल्या आहेत.
किडे-मुंग्या, अळ्या, पानांचे कोंब, फळं यांबरोबरच पक्ष्यांचा आवडता आहार म्हणजे फुलांमध्ये तयार होणारा मधुरस! ‘पक्षी फुलांमधला मध पितात’ हा आपला मोठ्ठा ‘गोड’ गैरसमज असतो. खरं तर फुलांत मध तयारच होत नाही. फुलांतला गोड रस-मधुरस-मकरंद पिऊन त्यापासून मधमाशा तयार करतात तो ‘मध’! आपण ऐतखाऊ त्यावर डल्ला मारतो. फुलांमध्ये कमी-अधिक प्रमाणात तयार होणारा गोडसर द्रव पिण्यासाठी बरेच पक्षी फुललेल्या झाडांवर तुटून पडतात. शहरांमध्ये आज तुरळक दिसणार्‍या काटेसावर, मोह, पळस, पांगारा, बॉटलब्रश, पावडर पफ, तुतारी, शेवगा, टेकोमा, शंकासूर, मणिमोहोर, कॉर्डिया अशी फुलणारी झाडं म्हणजे बहुसंख्य पक्ष्यांचे ‘फेव्हरिट हँग-आऊट’ असतं. फुललेली काटेसावर, बहरलेला पळस अशा झाडांपाशी तास-दीड तास जरी रेंगाळलं, तर सहजी वीसेक जातींचे पक्षी फुलांतला मधुरस चापताना, अन् फुलांवर गुणगुणारे कीटक मटकावताना सहज दृष्टीस पडतील! दुर्दैवाने काटेसावर-पांगार्‍यासारखे देशी वृक्ष मोठय़ा वेगाने कमी होऊ लागलेत आणि माझ्या नाशिकसारख्या शहरात हाताच्या बोटांवर मोजावेत इतकेच उरलेले पळस केव्हाच दुर्मिळ वृक्षांच्या यादीत जाऊन बसलेत. पक्ष्यांच्या उपयोगाची झाडं कमी होत जाऊन त्याजागी गुलमोहोर, नीलमोहोर, पेल्टोफोरम, ऑस्ट्रेलियन बाभूळ, निलगिरी, टॅबेबुया, सुरूसारखी दिखाऊ, निरुपयोगी, कमकुवत परदेशी झाडं लावली जात आहेत.
फळांच्या झाडांबाबतही तेच! शहरातली फळझाडं-फळबागा नाहीशा होऊन त्यांची जागा फूलझाडं-फूलबागा घेऊ लागल्यात. पक्ष्यांचं आवडतं नैसर्गिक खाद्य म्हणजे वड-पिंपळ, पिंपरणी, उंबर, चंदन चारोळी अशा देशी वृक्षांची गोलाकार फळं. अशा फळांनी लगडलेल्या झाडांवर कित्येक प्रकारचे पक्षी अक्षरश: भान हरपून फळं खाताना दिसतात. साधं उदाहरण देतो- माझ्या घराच्या परसात फक्त एकच मोठं झाड आहे. उंबराचं. त्या झाडावर मी तब्बल पंचवीस जातींचे पक्षी नोंदले आहेत. 
आपली पिढी खरोखरीचे काऊ-चिऊ-पोपट-मैना बघत, दूध-भात खात मोठी झाली. पुढच्या पिढीचं काय? त्यांना त्यांच्या बाळांना अक्राळविक्राळ पसरणार्‍या या कोरड्याशुष्क शहरांत पंखवाले सगेसोबती सांगाती म्हणून मिळणं सोडा, निदान बघायला तरी मिळायला हवेत ना?
manthan@lokmat.com

Related Posts Plugin for WordPress, Blogger...