सुमात्रन हत्तीची प्रजातीही नामशेषाच्या मार्गावर

पीटीआय , जकार्ता

आशियातील सर्वात लहान आकाराचा हत्ती आणि जगातील सजीव आश्चर्य म्हणून ओळखली जाणारी सुमात्रन (सुमात्रातील)हत्तींची प्रजाती वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात न आल्यास ही प्रजाती येत्या ३० वर्षांत संपूर्ण नामशेष होऊ शकते, असा इशारा पर्यावरणाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड या संघटनेने दिला आहे. जंगलातील अधिवास नष्ट होत असल्याने सुमात्रन हत्तींची संख्या झपाटय़ाने घटत चालली आहे. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील जंगलांमध्ये आजमितीस २४०० ते २८०० सुमात्रान हत्ती शिल्लक आहेत. साधारण १९८५ पासून ही प्रजाती नष्ट होण्यास सुरुवात झाली. आगामी तीन दशकात केव्हाही उर्वरित प्रजाती काळाच्या उदरात गडप होऊ शकते, असेही डब्लूडब्लूएफने म्हटले आहे. 
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेनेही सुमात्रन हत्तींची वर्गवारी बदलवली असून ‘दुर्मिळ’ प्रजातीऐवजी धोक्यात असलेली ‘अतिदुमिळ प्रजाती’ असे वर्गीकरण केले आहे. इंडोनेशियन बेटांवरील नामशेषाच्या वाटेवर असलेल्या वन्यजीव प्रजातींच्या यादीत आता सुमात्रन हत्तींच्या प्रजातीचाही समावेश करण्यात आल्याने पर्यावरणवाद्यांची चिंता वाढली आहे. सुमात्रन बेटांवरील ओरांगऊटान आणि सुमात्री गेंडेही नामशेषाच्या मार्गावर आहेत. या प्रजातींच्या जतनासाठी तातडीच्या हालचाली करण्यात न आल्यास भविष्यात त्यांचे नखही दिसणार नाही, असेही इशाऱ्यात म्हटले आहे. 
सुमात्रन हत्तींचे वास्तव असलेली जंगले तोडण्यात आली असून त्या जागेवर शेती केली जात आहे. जगातील सर्वात लहान आकाराचा हत्ती असलेल्या या हत्तींचे वास्तव्य असलेली ७० टक्के जंगले तोडण्यात आल्याने एका पिढीची संख्या ५० टक्क्य़ांनी कमी झाली आहे. या हत्तींच्या प्रजातींना इंडोनेशियन कायद्याचे संरक्षण देण्यात आले आहे. परंतु, ८५ टक्के जंगले संरक्षित वनक्षेत्राबाहेर असल्याने कायद्याच्या संरक्षणाचा फारसा लाभ  सुमात्रन हत्तींना झालेला नाही. इंडोनेशियातील जावा आणि सुमात्रन वाघांची प्रजातीहीधोक्यात आलेली आहे. 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...