नॅशनल पार्कमध्ये १८0 प्रजातींचा संसार तसेच शिवडी माहूलला १३0 प्रजाती


मुंबई शहर आणि उपनगरांत सिमेंट काँक्रीटचे जंगल वाढत असतानाच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पक्ष्यांच्या तब्बल १८0 प्रजातींचा संसार फुलला आहे.
शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे शहरातील पक्ष्यांच्या प्रजाती स्थलांतरित होत असल्याची ओरड होत असतानाच नॅशनल पार्कमध्ये मात्र जंगलातील आणि पाणपक्ष्यांचे अस्तित्व कायम आहे. पॅराडाईज फ्लाय कॅचर, टिपिकल ब्ल्यू फ्लाय कॅचर, आयरो, मलबार व्हिस्टिलिंग थ्रश आणि इंडियन कुकू (जंगलातील) पक्षी प्रामुख्याने आढळतात, अशी माहिती पक्षीमित्र आदेश शिवकर यांनी दिली. हळद्या, तुरेवाला सर्पगरुड, करकोचा, हिरवे कबुतर, धनेश, करडा धनेश, कवडा, तांबट, मोर, रानकोंबडा, शिक्रा, वेडा राघू, पानकावळा आणि रात्र वंचक..अशा विविध प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. पावसाची चाहूल लागताच आपल्या अंगावरील नऊ रंगांचे दर्शन घडविणारा नवरंग नावाचा पक्षी दक्षिण भारतातून महाराष्ट्रात दाखल होतो. पावसाळ्यात सक्रिय असणारा मलबार व्हिस्टिलिंग थ्रश नॅशनल पार्कचे आकर्षण आहे.
-नॅशनल पार्कचा काही भाग हा वसईच्या खाडीलगत येत असून, या परिसरात ब्राम्हणी घार अनेक वेळा आढळते.
-गवताळ प्रदेश, जंगल, मोठे तलाव, धरणाचे बॅक वॉटर येथे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येत असून, यामधील काही लोकप्रिय ठिकाणांत ‘एसजीएनपी’चा समावेश होतो.
-तांबट - गुलमोहराच्या झाडावर अनेकदा तांबट पक्ष्याचे वास्तव्य आढळून येते. झाडाच्या मृत खोडावर तांबट पक्षी पोकळी करून राहतात. हा पक्षी आपल्या शरीराच्या दीड ते तीनपट फलहार घेतो. वड आणि पिंपळाची फळे तो आवडीने खातो.
-तांबट, हळद्या आणि धनेश या पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत फळांच्या बिया पसरविल्या जात असल्याने जंगलाचे संरक्षण करण्यात या पक्ष्यांचा मोठा वाटा आहे.
-जगात केवळ केनिया येथील नैरोबी आणि भारतातील मुंबई या शहरांच्या हद्दीमध्ये वनक्षेत्र अधिक आहे.


बातमी स्रोत: लोकमत, सचिन लुंगसे(मुंबई) दि.२० जाने.२०१२
---------------------------------------------------------------------------------------------------------
 मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात ठाण्याच्या खाडीचा भाग असलेला शिवडी ते माहुलचा परिसर पाणथळ भाग म्हणून ओळखला जातो. हिवाळ्यात तब्बल १३0 प्रजातींच्या देशीविदेशी स्थलांतरित पक्ष्यांनी फुलून जाणारा हा भाग पक्षीनिरिक्षकांसाठी नंदनवन ठरत आहे.
मुंबईच्या पूर्वेला खारफुटीचा सलग पट्टा असून पश्‍चिमेकडे माहिम, चारकोप,मनोरी, मार्वे, मढ या भागात तुरळक प्रमाणात खारफुटी आढळते. शिवडी ते माहुल दरम्यान ४0 हेक्टर खारफुटीचे जंगल असून हिवाळ्यात हा भाग स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजून जातो, अशी माहिती सृष्टीज्ञान संस्थेच्या प्रशांत शिंदे यांनी दिली. शेकाट्या म्हणजेच ब्लॅक विंगड स्टील्ट पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाल्याची वर्दी घेउन येतो. त्यानंतर ब्राउन हेडेड गर्ल, प्लोबर, सँडपायपर, टर्नस्टोन, कल्यरु गॉडबीट, रेडशँक, ग्रिनशँक, व्हाईट आयविस, डक्लिन, लहानमोठे बगळे, करकोचे, समुद्र गरूड अशा १३0 प्रजातींच्या पक्ष्यांनी जत्राच येथे भरत असते.
ल्ल फ्लेमिंगो-शिवडी ही लेसर फ्लेमिंगोंची आशियातील सर्वात मोठी वसाहत. शिवडी-माहुलच्या गाळाच्या परिसरात वाढणारे नीलहरित शेवाळ,सागरी शंख शिंपले व अन्य मृदूकाय प्राणी हे फ्लेमिंगांचे मुख्य अन्न आहे.
  सागरी पाणथळ प्रदेशात भरती ओहोटीचे क्षेत्र, खाडी, दलदल, सेंद्रीय गाळाचे पट्टे, खडकाळ भाग आणि खारफुटीची जंगले यांचा समावेश होतो.
  जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल सुंदरबन येथे आहे. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर ११८ चौकिमी क्षेत्रात खारफुटीचे आच्छादन आहे.


बातमी स्रोत: लोकमत, श्रीशा वागळे (मुंबई) दि.२० जाने.२०१२

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...