आकाशातला ‘राजा’ संकटात!

अमोल महिपती लाटे, औरंगाबाद - (लोकसत्ता साठी )
amolmlate@gmail.com
 

ज्याप्रमाणे सिंह या वन्यप्राण्यास ‘जंगलचा राजा’ असे संबोधिले जाते, त्याप्रमाणे ‘गिधाड’ या पक्ष्यास ‘आकाशाचा राजा’ या नावाने ओळखले जाते. गिधाड या पक्ष्यास पर्यावरणामधील ‘स्कॅव्हनेंजर’ (घाण साफ करणारा) म्हणून संबोधले जाते. कारण बैल, गाय, म्हशी यांसारख्या पाळीव गुरांची प्रेते नष्ट करण्यामध्ये गिधाड महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पृथ्वीतलावरील प्राणी व त्यांची सडणारी प्रेते यांच्या आहार शृंखलेमधली महत्त्वपूर्ण कडी अथवा घटक म्हणून गिधाड काम करतात.
इतर देशांच्या तुलनेत सन १९८०च्या दशकामध्ये भारतामध्ये गिधाडांची संख्या सर्वात जास्त होती. कारण गिधाडांचे मुख्य अन्न म्हणून काम करणारी पाळीव गाई-गुरांची संख्या ही भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात आढळते व तसेच भारतामध्ये गोमास (गाईचे मांस) खाल्ले जात नाही, यामुळे ही पाळीव गुरे मृत झाल्यानंतर उघडय़ा जागेत टाकून दिली जातात. परिणामी, सडणाऱ्या प्रेतांपासून रोगराईचा धोका संभवतो.
भारतामध्ये मुख्यत्वे करून गिधाडाच्या नऊ प्रजाती आढळतात. यामध्ये क्रमश: बियर्डेड वल्चर, इजिप्शियन वल्चर, स्लेंडर वल्चर, सिनेरियन वल्चर, किंग वल्चर, युरेशिअन वल्चर, लाँग बिल्ड वल्चर, हिमालयन ग्रिफीन वल्चर आणि व्हाईट बॅक वल्चर यांचा समावेश होतो. गिधाडांची प्रजननक्षमता कमी असल्यामुळे म्हणजेच एक गिधाड एका वर्षांसाठी फक्त एका पिलाला जन्म देते, यामुळे गिधाडांची संख्या ही सद्य:स्थितीमुळे खूपच कमी असल्याचे पाहावयास मिळते.
आजमितीला पृथ्वीवरील सर्वात रुबाबदार व निपुण ‘स्कॅव्हनेंजर’ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, आहार शृंखलेमधील एक कडी नकळतपणे निसटत असल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे. किंबहुना या आकाशातील राजाला जिवंत राहण्यासाठी एक कठीण युद्ध करावे लागत आहे. कारण १९८०च्या दशकापर्यंत गिधाडांची संख्या ही ८.५ कोटी इतकी होती. पण आज ती केवळ तीन ते चार हजारांपुरतीच मर्यादित असल्याचे समजते. भारतीय उपखंडातील तर ९९ टक्केपेक्षासुद्धा जास्त प्रमाणात गिधाडांची संख्या कमी झाली आहे. यामुळे गिधाडांऐवजी सडणाऱ्या प्रेतांवर कुत्रे, उंदीर, कावळे मोठय़ा प्रमाणात आपली उपजीविका भागवत आहेत. त्यामुळे सध्या कुत्रा हा प्राणी अधिक हिंसक होत असल्याचे व शहरामध्ये कुत्र्याने चावा घेतल्याच्या अनेक बातम्या विविध वृत्तपत्रांतून माहिती होतात. परिणामी, रेबिजचा मोठय़ा प्रमाणावर प्रसार होण्यास हातभार लागत आहे.
सन १९९० मध्ये पहिल्यांदा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेने गिधाडांच्या नष्ट होत चाललेल्या संख्येसंदर्भात धोक्याची घंटा दिली होती. गिधाडाचे प्रमाण कमी होण्यामागचे कारण शोधण्यासाठी जवळपास दहा वर्षांचा कालावधी लागला. यामध्ये पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या ‘पॅराग्रीन फंड’ या गटाला या समस्येचे मूळ शोधण्यामध्ये यश आले. या गटाच्या संशोधनानुसार गिधाडांची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे जनावरांच्या आजारपणामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यासाठी इंजेक्शनद्वारे दिले जाणारे डायक्लोफिनेक औषध हे होय. कारण हे औषध जनावरांना सूज आल्यानंतर ती कमी करण्यासाठी व वेदना कमी करण्यासाठी ‘नॉन स्टरायडल’ म्हणून वापरले जाते. या औषधाची किंमत कमी असल्यामुळे व बाजारात सहज उपलब्ध होत असल्यामुळे यांचा वापर खूप मोठय़ा प्रमाणात होत असे.
भारतामध्ये डायक्लोफिनॅक या औषधाचा जवळपास २० कोटी रुपये इतका बाजार होतो. यामध्ये भारतामधील ११० औषधनिर्मितीच्या कंपन्या या औषधाची निर्मिती करतात. आपल्या देशातील जवळपास २५ कंपन्या जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या डायक्लोफिनॅकच्या औषधाचे २५ फाम्र्युलेशन तयार करतात.
गिधाडांची संख्या कमी होण्यामागे डायक्लोफिनॅक या औषधाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. म्हणजे एखाद्या जनावरास त्याच्या उपचारासाठी डायक्लोफिनॅकचे इंजेक्शन दिले गेल्यास व ते जनावर मेल्यानंतर गिधाडाने त्याचे प्रेत खाल्यानंतर जनावरांच्या शरीरामधील औषधाचे प्रमाण हे गिधाडाच्या शरीरामध्ये मासांमार्फत जाते व परिणामी, कालांतराने त्या गिधाडाच्या शरीरामध्ये युरीक अ‍ॅसिडचे कण जमा होऊन त्यास विसरल गाऊट हा रोग होतो. यामध्ये प्रामुख्याने शरीरातील क्षाराचे प्रमाण कमी झाल्यामुळे किडनी निकामी होते व गिधाड मरण पावते.
भारतामधील जवळपास १० टक्केहून अधिक जनावरांच्या हाडामध्ये डायक्लोफिनॅकच्या औषधाचा अंश आढळून आल्याची नोंद आहे. पर्यावरणामधील एका महत्त्वपूर्ण स्कॅव्हनेंजर आज विनाशाच्या वाटेवर आहे व याच्या नष्ट होण्याची गती तर डोडो या पक्षाच्या नष्ट होण्याच्या गतीपेक्षासुद्धा जास्त आहे, जो की पुढे चालून नष्टच झाल्याचे आपण पाहिले आहे. भारतामधील गिधाडाच्या नऊपैकी तीन जाती यामध्ये लाँग बिल्ड वल्चर, स्लेंडर वल्चर व व्हाईट बॅक वल्चर याचे नष्ट होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
सदरील पक्ष्याचे पर्यावरण सुस्थितीत ठेवण्यामध्ये असलेली महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता सन २००० मध्ये आययूसीएनने गिधाड या पक्ष्याचा ‘क्रिटिकली इनडेंजरड स्पेसीज’ या वर्गात समावेश केला आहे. तर भारत सरकारने सन २००२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा (१९७२) नुसार शेडय़ूल्ड (१) मध्ये गिधाड या पक्ष्याचा समावेश केला आहे. यामुळे गिधाड या पक्ष्यास वाघ आणि गेंडा या प्राण्यांचा दर्जा मिळाला आहे.
तसेच १७ मार्च २००५ रोजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एका विशेष सूचनेद्वारे डायक्लोफिनॅक(Diclophenac) या औषधावर पाच महिन्यांमध्ये बंदी आणण्याचे निर्देश दिले. यानुसार डायक्लोफिनॅकला पर्याय औषध म्हणून मेलॅक्सीकॅम हे औषध वापरावे असे सुचविण्यात आले. पण या औषधाची किंमत जास्त असल्यामुळे याच्या वापरावर मर्यादा आहेत.
गिधाडाचे संरक्षण या कार्यक्रमांतर्गत गिधाडांचे संरक्षित प्रजनन कार्यक्रम आखला गेला आहे. त्यानुसार हरयाणा सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या व बीएनएनएस(BNHS) आणि रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स (आरएसपीबी) (RSPB)यांच्या पुढाकाराने पिंजोर येथे पहिले गिधाडांचे संरक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
आपण जागतिक महासत्ता होण्याची व शाश्वत विकासाची स्वप्ने पाहात असताना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणातील स्कॅव्हेंनजर म्हणून काम करणाऱ्या आकाशातील राजाला त्याच्या नष्ट होण्याच्या प्रक्रियेपासून वाचविणे अत्यंत गरजेचे आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे. अन्यथा आपल्या निष्काळजी, उदासीन व आळसी प्रवृत्तीबद्दल भावी पिढी आपणास कधीच माफ करणार नाही. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वाघ, सिंह, हरिण यांसारख्या वन्यप्राण्यांप्रमाणेच नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या समस्येबाबत शास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, वन्यजीव प्रेमी, सामान्य नागरिक व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठीच हा लेखनप्रपंच!

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...