हद्दपार पाखरं

- डॉ. श्रीश क्षीरसागर,लोकमत मंथन


Photo: Dr. Shreesh Kshirsagar,Nasik

साधारण वर्षभरापूर्वीचा रविवार होता तो. ‘संडे विथ नेचर’च्या शिरस्त्यानुसार रानात फुलणार्‍या सुवासिक ‘रानजाई’च्या देखण्या फुलांबरोबर सकाळ घालवून घरी परतत होतो. येताना नेहमीपेक्षा वेगळी वाट निवडली. आधीचा कच्चा रस्ता आता डांबरी झाला होता. रस्त्याकडेला दिव्याचे खांब आले होते. दोहोबाजूला लांबवर पसरलेल्या मोकळ्या जमिनींवर शेकडो प्लॉटस् पडून तुरळक बांधकामंही सुरू झाली होती. नव्या वाटेवरून जाताना आपसूक वेग मंदावतो. रमतगमत आजूबाजूला बघत बघत जाताना दूरवर डाव्या हाताला पडीक जमिनीवर काही हालचाल दिसली. वेग वाढवून तिथे जाऊ लागलो तर तिथून एक करडा पक्षी पंजात काहीतरी घेऊन उडताना दिसला. झपाझप पंख मारत काही अंतरावरच्या दिव्याच्या खांबावर जाऊन बसला. आता वेग कमी करून मी हळूहळू त्याच्या जवळ पोहोचलो. तो एक ‘शिक्रा’ पक्षी आणि त्याच्या पायात होता तीक्ष्ण नख्यांनी धरून ठेवलेला नुकताच जमिनीवरून उचललेला जिवंत उंदीर! दोन क्षण मी ते दृश्य बघतच राहिलो. तो सुप्रसिद्ध शिकारी पक्षी म्हणून ओळखला जाणारा शिक्रा विजयी मुद्रेने चौफेर नजर फिरवत होता आणि त्याच्या भक्कम पंजात सापडलेला उंदीर सुटण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. भानावर येऊन मी पुन्हा कॅमेर्‍याची जोडणी केली आणि त्याचे जमतील तसे धडाधड फोटो घेतले. एवढय़ात समोरून वाळूने भरलेला एक ट्रक रोरावत आला आणि त्याच्या आवाजामुळे शिक्रा शिकारीसह लांब उडून गेला.या सगळ्या अनुभवाच्या गारुडामधून बाहेर येताना एकदम लक्षात आले की, जवळपास कुठेही मोठे झाडच दिसत नाहीये. आसपास तोडलेल्या वृक्षांचे बुंधे मात्र दिसत होते. म्हणूनच नेहमी शिकार करून भक्ष्याला गर्द झाडात घेऊन जाणारा शिक्रा पक्षी इथे चक्क रस्त्याकडेच्या दिव्याच्या खांबावर येऊन विसावला. नव्या पाडलेल्या प्लॉटस्च्या, रस्त्यांच्या मध्ये येणारी सारी झाडं सफाईने साफ केलेली दिसत होती. अफाट वेगाने पसरणार्‍या शहराच्या अक्राळविक्राळ भुजांनी त्या एकेकाळच्या हिरव्यागार, पशुपक्ष्यांनी नांदत्या परिसराचा घास घेतला होता. तिथल्या मृतप्राय होऊ घातलेल्या प्राणिजीवनाचा तो शिक्रा एक प्रतिनिधी होता. त्याच्या आधीच तिथले माळटिटवी, पिपीट, चंडोल, मुरारी, धाविक, ससाणे, तीतर, लावा, भारीट असे पाचपन्नास प्रकारचे पक्षी नाहीसे झाले होते. आज त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटची काहीशे घरं झाली आहेत. उंच इमारती, पक्के रस्ते, तारांची जाळी, मोबाईलचे टॉवर्स, दुकानांच्या ओळी, फलक अन् पुतळे असा ‘विकसित’ होणार्‍या दरेक शहरात असतो, तस्साच सेट उभा राहिलाय. जगातल्या सर्वाधिक वेगाने विकास पावणार्‍या शहरांच्या यादीत खूपच वरचा क्रमांक असणार्‍या या शहराला आणखी एका गचाळ नगराचं ठिगळ जोडलं गेलंय. काही हजार माणसं तिथं रहायला आलीत. मात्र या माणसांच्या घरांच्या, बंगल्यांच्या इमारतींच्या खालच्या जमिनीवर कितीतरी निष्पाप पाखरं वर्षानुवर्षे राहत होती, घरटी बांधून संसार थाटत होती याची पुसटशी जाणीवही कुणाला नाहीये. उपर्‍या माणसाचा पाय या भूमीवर पडताच ते मुके जीव कुणालाही अवाक्षरही न सांगता तिथून निघून गेले; अन् दुर्दैवाने याला आम्ही व आमचे सुबुद्ध नेते ‘विकास’ म्हणतोय.


हे काही फक्त माझ्याच शहराचे चित्र नाही, तर आज सारीच शहरे, गावे, कमी-अधिक प्रमाणात याच मार्गाने जात आहेत. वसाहतींसाठी, कारखान्यांसाठी, रस्त्यांसाठी माळरानं व्यापली जात आहेत. मोठमोठे पुराणवृक्ष रात्रीतून तुटताहेत, शेत संपताहेत. विहिरी-तलाव बुजताहेत. जंगलं आडवी होताहेत. खारफुटी-दलदलींत भराव पडताहेत. अगदी वाट्टेल ते चाललंय. त्या-त्या ठिकाणचे मूळचे रहिवासी प्राणी-पक्षी विस्थापित होताहेत. मग केव्हातरी कोणीतरी शहरातल्या कमी होत चाललेल्या चिमण्या-कावळ्यांच्या नावाने गळा काढतं आणि त्यातून गल्लाभरू संस्थांचं फावतं. अव्वाच्या सव्वा किमतीची लाकडी खुराडेवजा घरटी वाटपाचे तोकडे उपाय केले जातात. पेपरांमध्ये बातम्या, फेसबुकवर फोटो आणि चॅनल्सवर मुलाखती झळकतात. या सार्‍यात मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. आज शहरांमध्ये अजूनही तगून असणार्‍या चिमण्या या पूर्णत: जुन्या पद्धतीची घरे-वाडे-झोपड्या, बाभळी -बोरीसारखी देशी झाडे आणि शिल्लक असलेली थोडीफार शेती यामुळे आहेत, हे सत्य विसरले जाते.


नुकताच घडलेला हा प्रसंग पाहा- एका खूप मोठय़ा विस्ताराच्या नर्सरीत गेलो होतो. तिथल्या मालकांच्या टुमदार घराभोवती बरीच झाडंझुडपं होती. गंमत म्हणजे त्यांच्या व्हरांड्यात आणि आजूबाजूला दोन-तीन ‘बर्ड-फीडर्स’ हौसेने टांगलेले दिसले. ‘बर्ड-फीडर’ म्हणजे ज्वारी-बाजरी वा इतर धान्य भरलेली भोकं पाडलेली प्लास्टिकची उभी टांगलेली नळकांडी. चिमणीसारख्या छोट्या पक्ष्यांनी त्यावर येऊन त्या भोकांतून आतील धान्य खावे ही अपेक्षा. ते मालक बोलता-बोलता म्हणाले की, आमच्याकडे लावलेल्या या फीडर्सवर चिमण्या अजिबात येत नाहीत- का बरं? उत्तर अगदी साधं होतं. तिथल्या छानपैकी वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये, रोपट्यांमध्ये, गवतांमध्ये, पाण्याकडेला, लांबवर पसरलेल्या जमिनीमध्ये तिथल्या चिमण्यांना त्यांचं नैसर्गिक अन्न म्हणजे गवताच्या बिया, दाणे, कीटक, किडे, मुंग्या, अळ्या वगैरे मुबलक मिळत होते. मग का बरं त्या येतील कृत्रिम नळकांड्यात भरलेल्या एकाच एक प्रकारच्या धान्याकडे? आज शहरांमधल्या ज्या भागांत मोकळी जमीन, गवत, झाडंझुडपं औषधालाही दिसत नाही, तिथे अशा ‘बर्ड फीडर्स’चा पक्ष्यांना उपयोग होतो. मात्र, त्यांचं नैसर्गिक अन्न सहजी मिळत असेल, तर पक्ष्यांची पहिली पसंती त्यालाच असेल. बघा विचार करून.. मिळतंच का आपल्या शहरांत पक्ष्यांना त्यांचं नैसर्गिक अन्न मुबलक प्रमाणात?

Photo: Dr. Shreesh Kshirsagar,Nasik


याशिवाय पक्ष्यांचा सफाया करण्यास कारणीभूत ठरणार्‍या इतरही अनेक बाबी आहेत. रासायनिक साबण- डिटर्जंट व कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे होत असलेले नद्या-ओढे- तळीतलावांचे प्रदूषण, ध्वनी व प्रकाश प्रदूषण, शेतांमध्ये होणारा रासायनिक खतांचा- कीटकनाशकांचा बेसुमार वापर, गाड्यांचे धूर, प्लास्टिकचा कचरा वगैरे वगैरे. यातून काही बिचारी पाखरं वाचलीच तर गलोलीने, फासे लावून त्यांची शिकार करायला काही उनाड वांड मंडळी टपून बसलेलीच असतात.


असं विदारक चित्र असलं तरीही अजून शहरांत बर्‍यापैकी पक्षीगण टिकून आहेत. रस्त्यांकडेची उरलेली झाडं, घरांभोवतीच्या बागा, शहरातून वाहणारे ओढे-नद्या-नाले, वसाहतींमधील उद्याने, तलाव, जुन्या संस्थांच्या आवारातील वृक्षसंपदा, क्वचित दिसणार्‍या फळबागा, शेतं, विहिरी, रोपवाटिका अशा ओल्या-हिरव्या बेटांमुळे बरेच पक्षी तगून राहिले आहेत.

1 Comment:

अपर्णा said...

छान माहिती...तुम्ही घेतलेले शिक्राचे फोटो पण द्या इथे...पाह्यला आवडेल..

Related Posts Plugin for WordPress, Blogger...