वन्यजीव, शिकार आणि माणूस..

डॉ. महेश गायकवाड -सौजन्य :लोकसत्ता संदर्भ सेवा

खरंतर शिकारी युगातील मानव निसर्गातील विविध प्राण्यांची शिकार करून पूर्णपणे निसर्गामध्येच राहत होता. गुहेत राहणारा मानव हळूहळू झाडावर आणि त्यानंतर घरामध्ये राहायला लागला. अर्थात याला काही लाख वषारंचा काळ गेला. शिकारीकाळानंतर मानव शेती करू लागला आणि मानवाचे जीवन समृद्ध झाले. पण त्यानंतर मात्र जगाचा प्रवास औद्योगिकीकरणाकडे गेला आणि मानव व वन्यप्राणी यांच्यामध्ये संघर्षांची ठिणगी पडली. अर्थात, मानवाची वाढती संख्या आणि जंगल परिसरात मानवाची वाढणारी वस्ती, शेती आणि औद्योगिकीकरण या प्रमुख गोष्टी त्या मागे प्रामुख्याने दिसतात. १६ व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना म्हणजेच औद्योगिकीकरणाची सुरुवात झाल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळते. मात्र १९ व्या शतकामध्ये मानवाने बरीच प्रगती केली. त्यामध्ये शेतीसाठी मोठमोठय़ा धरणांची बांधणी, जंगलतोड, व्यापार, शिकार, औद्योगिकीकरण इ. गोष्टी आढळतात. यामध्ये वन्यप्राणी व मानव यांच्यामध्ये सगळीकडेच संघर्षांची ठिणगी पडली आणि मानवाने केलेल्या जंगलातील अतिक्रमणामुळे वाघ, हत्ती, सिंह यांसारखे हिस्त्र पशू आणि मानव यांच्यातील संघर्ष सुरू झाला. त्याकाळात तर ‘वाघासारख्या’ वन्य प्राण्याला मारण्यासाठी ‘जिम कॉर्बेटसारख्या शिकाऱ्याला आणून भारतातील ३०० पेक्षाही जास्त वाघ मारल्याची नोंद सापडते. खरंतर त्या वेळी ती गरजही असेल, पण तो उपाय मात्र नक्कीच न पटणारा होता. पण काही काळानंतर त्याच शिकाऱ्याने वाघ वाचविण्यासाठी  प्रयत्न केले आणि त्यांच्याच नावावर एक राष्ट्रीय उद्यानही स्थापन केले.
सन १९३८ च्या कालावधीमध्ये संघर्ष वाढले. त्यावर उपाययोजना म्हणून वन्यजीव सप्ताहासारखे कार्यक्रम राबविणे म्हणजे कौतुकाचाच विषय आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण यासारख्या समस्या तेव्हापासून सुरू झाल्याची कल्पनाच, त्या वेळी हा वन्यजीव सप्ताह सुरू करणाऱ्या संशोधकांना नक्कीच वाटली असावी आणि त्यामुळेच हा सप्ताह संपूर्ण जगात साजरा केला जातो.
त्यानंतरच्या काळात माहितीचे जग सुरू झाले आणि मानवाने मात्र वन आणि त्यातील वन्यजीव याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
हा कालावधी म्हणजे १९८० नंतर ते अगदी २००८ पर्यंत कालावधी मानला असता, आता तर ३३ टक्के जंगलदेखील राहिले नसल्याची नोंद कित्येक देशांमध्ये आढळत आहे. वन्यप्राणी शिकार, तस्करी, चोरटी देवाणघेवाण, हौसेसाठी शिकार, खाण्यासाठी शिकार, पाळण्यासाठी वन्यप्राणी अशा अनेक प्रकारे त्यांचा विनाशच होत आहे. शोभेच्या वस्तू, पर्स, औषधे इ. प्रकारे वन्यप्राण्यांची शिकार भरमसाठ केल्याचे चित्र दिसून येत आहे.
अगदी गवताळ प्रदेशामध्ये बारामती, इंदापूर, सासवड या भागात आढळणारा ‘माळढोक’ पक्षीसुद्धा याच काळात नष्ट होतअसल्याचे चित्र आपण पाहत आहोत. ‘माळढोक’ पक्षी आता तर फक्त नान्नज अभयारण्यात सापडतोय आणि जून - जुलै २०११ दरम्यान मी १५ दिवस त्या गवताळ भागात त्याचा अभ्यास करण्यासाठी गेलो असता, सोलापूर ते उस्मानाबाद भागात मला एकदाही तो पक्षी दिसला नाही. १५-२० पक्षी या भागात असल्याची नोंद वनविभाग करतेय, पण प्रत्यक्षात मात्र काय निसर्गालाच माहिती!
 भारतातील चित्ता १९५३ साली नष्ट झाल्याची नोंद सापडते. खरंतर त्यांची शिकार करून आणि त्यांचा उपयोग करूनच त्यांचे प्रमाण आपण संपविले. आता आपण चित्ते तयार तर करू शकत नाहीच, पण त्यापासून होणारे फायदे व निसर्गसाखळीतील अतिशय महत्त्वाचा प्राणी भारतातूनच संपविला आहे. आणि आता चिंकारा व काळवीट यांचे प्रमाण वाढल्याची बोंबाबोंब करतोय, आता तरी सावधान. त्यानंतर आता आपण लांडगा व कोल्हा यांना संपविण्यासाठी त्याने चुकून आपल्या बकरी अथवा शेळीची शिकार केल्यास त्यामध्ये विष टाकून आपण ती शेळी त्याला खायला देतोय आणि त्यांची संख्याही संपवतोय. खरंतर हे कुठेतरी थांबलेच पाहिजे, अन्यथा पुढील समस्यांना तोंड देण्यासाठी आपणाला तयार व्हावे लागेल.
चातुर्याय युग सुरू झालंय, अर्थात जो हुशार तोच या पृथ्वीवर टिकेल अन्यथा विनाश अटळ, अशीच सत्य आणि विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही व्यक्तीला कुठल्याही गोष्टीचे घेणेदेणे नाही. कुठला प्राणी आणि वन्यप्राणी याच्याशी त्याचं नातंच राहिलं नसल्यासारखे सगळे वागताहेत, पण यावर वेळीच आपण उपाय शोधले पाहिजेत. अन्यथा आता वेळ आहे ती  चिंकारा, घोरपड, तितर, मांडूळ, कासव, ससा, भुरळ्या, असे अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी नष्ट होण्याची आणि यासाठीच मी ‘वन्यप्राणी वाचवा- २०११’ ही मोहीम बारामती तालुक्यामध्ये काढली, आणि या मोहिमेतून एक वन्यप्राणी चित्र-रथ तयार केला आणि त्याबरोबर फक्त याच परिसरातील वन्यप्राण्यांची पोस्टर्स तयार केली आणि प्रत्येक गावातून व शाळेतून जनजागृतीचा प्रयत्न केला. खरंतर मुलांमध्ये वन्यप्राण्यांविषयी खूपच आवड व त्याविषयी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पाहिली. बऱ्याच मुलांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला, चालता-बोलता प्रश्नावलीत भाग घेतला आणि त्याआधारे मी त्यांना वन्यजीवांची माहितीही दिली. त्यामधून काही गोष्टी समाजापुढे आणाव्याशा वाटल्या; त्यामध्ये-
१) मुलांना वन्यप्राण्यांच्या शिकारीविषयी खूप माहिती असते आणि बऱ्याच गावांमध्ये शिकार ही होत आहे.
२) मुलांना वन्यजीवांविषयी जाणून घेण्याची खूप इच्छा आहे, पण ती सखोल माहिती असणारे खूपच कमी लोक आहेत.
३) मुलांचे प्रामाणिक मत म्हणजे शिकार करू नये व शिकार थांबविण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करतात. कारण त्यांच्यामध्ये प्राण्यांबद्दल ‘प्रेम’ आहे.
४) वन्यप्राण्यांना मारू नये ही प्रामाणिक भावना त्यांच्या मनामध्ये आहेच; शिवाय वृक्षतोडही होऊ  नये अशी त्यांची भावना आहे.
’  उपाय म्हणून शिकारीविषयक कायदे खूपच बळकट करण्याची
    खरी गरज आहे.
’  प्रत्येक गावामध्ये जगजागृतीचे कार्यक्रम होणेदेखील
   गरजेचे आहे.
’  प्रत्येक तालुक्यामध्ये अभयारण्य अथवा संरक्षित वने राखणे
   खूप गरजेचे आहे. कदाचित  तुकडय़ा तुकडय़ांची जंगलेदेखील
   आपणाला संरक्षित करावी लागतील.
’ प्रत्येक गावामध्ये ‘देवराई’ सारखा प्रकल्प राबवून त्या गावामध्ये किमान ५ ते १० एकराचे ‘देवराई वन’ स्थापन करण्याची गरज आहे. त्यास शासनाने ग्रामपंचायतींना खास निधी दिला पाहिजे आणि त्यावर सेवाभावी संस्थेचेही लक्ष पाहिजे.
आता मात्र शेवटची घंटा वाजली असून आपण वृक्षतोड, शिकार, जंगलातील अतिक्रमणे, तस्करी, प्रदूषण, औद्योगिकीकरण, शहरीकरण यासारखा गोष्टी थांबविल्या पाहिजेत.

अर्थात आपण आपल्या भविष्याची काळजी करीत नसून आपण निर्मिती करीत असलेल्या विनाशाची काळजी करतोय. या सगळ्या निसर्गविरोधी, वन्यजीवांची साखळी नष्ट करणाऱ्या कृती आपण थांबविल्याच पाहिजेत.
एखाद्या धरणासारखे जीवन आपण जगले पाहिजे, कारण प्रत्येक धरणाला सांडवा असतोच आणि तो असलाच पाहिजे, कारण सांडवा नसल्यास ते फुटेल. आपलीही अवस्था तशी तर होणार नाही ना?
मानव हा एकमेव प्राणी आहे की निसर्गाला सोडून राहतोय, निसर्गातील इतर  सर्व जीव निसर्गाबरोबर, निसर्गामध्येच राहतात, त्यामुळे पुढच्या काळामध्ये तापमानवाढीमुळे सर्वात प्रथम ‘मानव’ ही जमात नष्ट होणार हे मात्र नक्कीच!

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...