लांडग्याला वाचविण्यासाठी.. (helping wolf existence)

डॉ. प्रमोद पाटील - लोकसत्ता
 ‘लबाड लांडगा सोंग करतो. लगीन करायचं सोंग करतो’, लहानपणी गावाकडे ऐकलेल्या या लोकगीतामुळे लांडग्याची धूर्त व लबाड अशी प्रतिमा मनात पक्की झालेली आहे. लांडगा धूर्त आणि हुशार आहे खरा; पण जगण्याच्या कठीण लढाईत महाधूर्त माणसानं लांडग्यावरही मात केली असून आज लांडगा वाघाएवढाच दुर्मिळ झाला आहे. जगात सध्या लांडग्याच्या तीन जाती व ३२ उपजाती आढळतात. यापैकी भारतात तिबेटी लांडगा व भारतीय करडा लांडगा या दोन प्रमुख उपजाती आढळतात. तिबेटी लांडगा भारतात (संख्या फक्त ३५०) केवळ हिमाचल प्रदेश व काश्मीरच्या बर्फाळ प्रदेशातच सापडतो. आपल्याकडे आढळतो तो करडा लांडगा जो संपूर्ण भारतातील शुष्क कोरडय़ा प्रदेशात आढळतो. जनुकीय अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की भारतीय लांडगा जगातील सर्वात प्राचीन लांडगा प्रजाती आहे.
लांडगा प्रामुख्याने गवताळ माळराने, झुडपी वने, जंगलालगतचे उघडे प्रदेश व शेतीच्या प्रदेशात आढळतो. तब्बल दीड ते दोन फूट उंचीचा लांडगा रंगाने फिक्कट तपकिरी- करडा असतो. खोकड व कोल्ह्य़ाप्रमाणेच लांडग्याच्या शेपटीचे टोक काळे असते; पण एकंदर उंची, रुंद जबडा व कळपांच्या रचनेमुळे लांडगा अन्य दोघांपासून वेगळा ओळखू येतो. हिवाळ्यात गुबगुबीत दिसणारा लांडगा उन्हाळ्यात केस झडल्यामुळे हडकुळा दिसतो. केस झडल्यामुळे ४५ ते ५० डिग्री सेंटीग्रेड तापमानात जगणे त्याला शक्य होते.
लांडगा कळपाने राहणारा प्राणी आहे. एका कळपात ४ ते १२ लांडगे असू शकतात. मानवी वस्ती शेजारी राहणाऱ्या कळपात ४-५ लांडगे असता, कारण फार मोठा कळप माणसाच्या पटकन लक्षात येऊन त्यापासून धोका उद्भवू शकतो. लांडग्यांचा कळप हा प्रमुख नर व मादीच्या नेतृत्वाखाली असतो. कळपातील अन्य लांडगे या जोडीची अपत्ये असतात किंवा बाहेरून आलेले व कळपात सामावून गेलेले असतात. कळपात राहिल्यामुळे लांडग्याला मोठय़ा आकाराच्या प्राण्याची देखील शिकार करता येते. शिकारीसाठी लांडगे वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात.
altबऱ्याचदा लांडगा झुडपाआड दबा धरून बसतो व अचानक हल्ला करतो. पाठलाग करून सावज पकडल्यावर लांडगा भक्ष्याच्या गळ्याचा चावा घेतो, ज्यामुळे रक्तस्राव होऊन प्राण्याचा जीव जातो. लांडगा प्रामुख्याने अशक्त, आजारी, म्हाताऱ्या किंवा खूप लहान प्राण्याची शिकार करतो. लांडग्याच्या खाद्यात काळवीट, चिंकारा, रानससे, रानउंदीर, टोळ, कीटक, सरडे, माळावरचे पक्षी व बोराची फळे इ. चा समावेश असतो. नैसर्गिक खाद्याची कमतरता असल्यावरच लांडगे पाळीव प्राण्याची शिकार साधतात. पाळीव प्राण्यांमध्ये शेळ्या, मेंढय़ा, वासरे व कोंबडय़ा लांडग्याकडून पळवल्या जातात. कळपातील प्रमुख नर व मादीच प्रजनन करतात. गरोदर असल्यापासूनच मादी प्रसूतीसाठी सुरक्षित ठिकाणी बीळ खोदू लागते. मादी एका वेळेस ४-५ पिल्लांना जन्म देते. प्रसूतीची जागा त्या प्रदेशातील पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. मोठी झाल्यावर पिल्ली एकतर आपल्याच कळपात राहतात व शिकारीत सहभागी होतात, किंवा कळपाला सोडून नव्या क्षेत्राच्या शोधात बाहेर पडतात व नवा कळप प्रस्थापित करतात. लांडग्याच्या एका कळपाचे क्षेत्र १०० ते ३०० चौ. कि.मी. एवढे असू शकते. या प्रदेशात कळप सतत भटकत खाद्य मिळवत असतो.
लांडग्याच्या संवर्धनातील समस्या व उपाय
भारतीय लांडग्यांची एकूण संख्या साधारण २००० ते २५०० एवढीच असल्याचे मानले जाते. भारतातील बहुतेक लांडगे संरक्षित क्षेत्राच्या बाहेर राहतात, ज्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी खास वेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल. लांडगे धनगरांच्या हालचालींप्रमाणे भटकतात. लांडग्यामुळे धनगरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. पाळीव जनावरे हीच धनगराची प्रमुख संपत्ती असल्यामुळे लांडग्याकडून होणारे नुकसान परवडण्य़ाजोगे नसते. चार लांडग्यांचा एक कळप वर्षांला ६०-६५ शेळ्या किंवा मेंढय़ा फस्त करतो असे प्रमाण जर गृहीत धरले तर हे नुकसान फारच मोठे आहे. लांडग्याकडून रक्षण करण्यासाठी धनगर रात्री जागून गस्त घालतात. शेळ्या, मेंढय़ांच्या कळपाभोवती कुंपण घालणे, कुत्री पाळणे असे उपायदेखील केले जातात. एवढे करूनही चलाख लांडगे गरज पडेल तशी जनावरे पळवतात व बरीच जनावरे धक्क्य़ाने मरतात. या नुकसानीमुळे धनगर लोक लांडग्यांना मारतात. मेलेल्या जनावरावर कीटकनाशक मारून ते लांडग्याच्या क्षेत्रात टाकतात. अशा प्रकारचे मांस खाऊन विषबाधा होऊन दरवर्षी बरेच लांडगे मरतात. काही वेळा लांडग्यांच्या पारंपरिक बिळांवर लक्ष ठेवून पिले जन्मल्यानंतर अशा बिळांना आग लावतात किंवा दगडांनी बिळाची तोंडे बंद केली जातात, ज्यामुळे उपासमार होऊन पिले मरतात. बऱ्याचदा स्थानिक फासेपारधी लोकांना अशा प्रजननस्थळाची माहिती दिली जाते व शिकार केली जाते. लांडग्याला या संकटातून वाचवायचे असेल तर लांडग्याकडून होणाऱ्या नुकसानीची त्वरित भरपाई देणे आवश्यक आहे, पण या नुकसान भरपाईची सध्याची प्रक्रिया फारच गुंतागुंतीची व वेळखाऊ आहे. ज्यामुळे बरेचजण याकडे वळत नाहीत. नुकसानभरपाई मिळण्यासाठी जनावरांचा अवयव अथवा मृत जनावर दाखवावे लागते जे बऱ्याचदा अशक्य असते. किचकट प्रक्रिया पार पाडल्यानंतर मिळणारी नुकसानभरपाई जनावरांच्या बाजारभावापेक्षा फारच थोडी असते. लांडग्याला वाचवायचे असेल तर नुकसान भरपाईसाठीची प्रक्रिया अधिक जलद करणे व अटी शिथिल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नुकसान भरपाईची सध्याची किंमत वाढवून बाजारभावापर्यंत नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे.
वन्यजीव कायद्यांतर्गत लांडगा सूची- १ मध्ये समाविष्ट असून पूर्णपणे संरक्षित आहे. याबाबत स्थानिक पातळीवर जनजागृती करणे, तसेच नियमित गस्त घालणे अशा गोष्टी केल्यास शिकारीवर आळा बसण्यास काही प्रमाणात का होईना पण मदत नक्की होईल. धनगरांच्या मदतीने लांडग्यांच्या हालचालींचा अभ्यास करता येईल.
गावठी कुत्र्यांचा लांडग्याबरोबर संबंध येत असतो. बऱ्याचदा लांडगा व गावठी कुत्र्याच्या मिलनातून लांडगा-कुत्रा संकर तयार होते. असे संकरित लांडगे माणूस तसेच पाळीव प्राण्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचे आढळले आहेत; ज्यामुळे रेबीजचा धोका उद्भवतो. यावर उपाय म्हणजे गावातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे निर्बीजीकरण करणे. अशा संकरामुळे जनुकीय दूषितीकरण होऊन लांडगा नष्ट होऊ शकतो. पाळीव कुत्र्याकडून लांडग्यांना घातक आजारांचा प्रादुर्भाव  होत असतो. अशा आजारामुळे लांडग्यांचा संपूर्ण कळप एकदम नष्ट होऊ शकतो.
लांडगा काळविटांच्या संख्येवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण ठेवतो. काळवीटांमुळे दरवर्षी स्थानिक शेतकऱ्यांचे बऱ्याच मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. लांडगा वाचला तर काळवीटांची संख्या नियंत्रणात राहते. अशा प्रकारे लांडगा शेतकऱ्यांची मदत करतो. लांडग्याची अशी प्रतिमा उभी करून जनजागृती केल्यास लांडग्याच्या संवर्धनात निश्चित मदत होईल.
भारतातून चित्ता बऱ्याच वर्षांपूर्वी नष्ट झाला. सध्या लांडगा भारतीय माळरानावरील अन्नसाखळीत सर्वात वरच्या पातळीवर आहे. गवताळ माळरानावरील नाजूक परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सर्वच वन्यजीवांच्या संवर्धनाची गरज आहे. व्याघ्र संवर्धनाच्या चळवळीच्या रेटय़ामध्ये लांडग्यासारख्या तितक्याच संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाले आहे व होत आहे. अशा सर्वच दुलíक्षत वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सामान्य जनतेतून पाठबळ उभे करणे महत्त्वाचे ठरेल.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...