भारताला चित्ता नकोच! (India don't need Chittah)


भारतातील चित्त्याला पुनर्उद्धारासाठी वने आणि पर्यावरण मंत्रालयाने आफ्रिकन चित्ते भारतात आणून वाढवण्याची योजना आखली आहे. सध्या भारतातून नष्ट झालेला आशियाई चित्ता फक्त इराण येथे केवळ ७० ते १०० च्या संख्येनी आढळतो. भारताला इराणमधील अतिदुर्मिळ चित्ता मिळणार नसल्यामुळे आफ्रिकेतून १८ चित्ते आणले जाणार आहेत. त्यासाठी तब्बल ४० ते ५० कोटी रुपये इतका प्राथमिक खर्च अपेक्षित आहे. भारतीय वन्यजीव संस्था व वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया या दोन प्रमुख संस्थांच्या प्राथमिक सर्वेक्षणात मध्य प्रदेशामधील कुनो-पालपूर व नोरादेही अभयारण्य तसेच राजस्थानातील जैसलमेरनजीकची शाहगड या जागा चित्ता सोडण्यासाठी सोयिस्कर असल्याचे म्हटले आहे. चित्ता परत आणून माळरान परिसंस्थेचे संवर्धन करता येईल, असे या योजनेमागचे तर्कशास्त्र असले, तरी अशा योजनेतून माळरानांचे संवर्धन किती साध्य होईल, याबाबत बऱ्याच शंका उपस्थित होतात.
चित्ता परत आणण्याची योजना आखली, तेव्हा आफ्रिकन चित्ता(African Chittah) व भारतातून नामशेष झालेला आशियाई चित्ता(Asian Chittah) हे जनुकीयदृष्टय़ा जवळजवळ सारखेच असल्याचे मानले जायचे. पण याचवर्षी समोर आलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे, की हे दोन्ही चित्ते खूपच भिन्न असून, यांच्यातील जनुकीय आराखडय़ात बरीच मोठी तफावत आहे. म्हणजेच भारतात आणला जाणारा चित्ता हा आफ्रिकन चित्ता असेल व इथून नष्ट झालेला आशियाई चित्ता नसेल तर मग आफ्रिकन चित्ता भारतात आणून चित्ता संवर्धन कसे साध्य होणार? या उलट इराणमधून आशियाई चित्ता मिळवता आला तर अतिदुर्मिळ आशियाई चित्त्याच्या संवर्धनात आपला हातभार लागेल. पण सध्या केवळ ७०-१०० आशियाई चित्ते इराणमध्ये आढळतात व इराणने यातील चित्ते देण्यास यापूर्वीच स्पष्ट नकार दिला आहे. त्यातच समजा इराणी चित्ते आणून भारतात त्यांचे काही बरेवाईट झाले तर आंतरराष्ट्रीय समाजात आपली फजिती होईल.
भारतात आफ्रिकेतील बंदिस्त प्रजनन करून वाढलेले चित्ते आणण्यात येणार आहेत. आफ्रिकन चित्ता जनुकीयदृष्टय़ा मुळातच दुर्बल आहे. त्यातच बंदिस्त प्रजनन केलेल्या चित्त्यामधील जनुकीय विविधता वन्य अवस्थेतील चित्यापेक्षा भारतातील चित्त्याच्या लांब पल्ल्याच्या संवर्धनाचा पाया कसा काय रचू शकतात? चित्त्याचे बंदिस्त प्रजनन फारच थोडय़ा ठिकाणी यशस्वी झाले आहे. त्यामुळे भारतात सुरुवातीला आणल्या जाणाऱ्या चित्त्यांचे प्रजनन होण्याची शक्यता धूसरच आहे आणि जरी या पाचसहा चित्त्यांचे बंदिस्त प्रजनन यशस्वी झाले, तरी एकमेकात प्रजनन होऊन, पुढेच चित्ते दुर्बलच तयार होतील.
सध्याच्या भारतीय माळरानांचा विचार केला, तर सर्वच माळरानावर गुरेचराईचा प्रचंड ताण आहे. माळरानांच्या क्षमतेच्या कितीतरी पट प्रमाणात ही चराई चालते. चित्त्याने यापूर्वी शेळ्या, मेंढय़ा व अन्य पाळीव प्राणी मारल्याच्या नोंदी सापडतात. अशा परिस्थितीत माळरानांवर माणसे व गाईगुरांची प्रचंड वर्दळ असणाऱ्या देशात चित्त्यासारख्या प्राण्याला खुल्या अवस्थेत माळरानावर सोडणे चित्ता आणि माणूस दोघांसाठी धोक्याचे ठरू शकेल.
सध्याचा शेतीचा विस्तार पाहता माळरानाचे सलग मोठे भूखंड पाहायला मिळत नाहीत. चित्त्यासारख्या प्राण्याला वारंवार शिकार करण्यासाठी व प्रजननासाठी लागणारा सुरक्षित अधिवास फारच कमी ठिकाणी उपलब्ध होईल. अशा खंडित अधिवासात आपापसात प्रजनन होऊन वन्य अवस्थेतही जनुकीय दुर्बलता येण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे, की शेतीच्या विस्ताराबरोबरच शेतातील पाणी व खाद्याच्या उपलब्धतेनुसार काळवीट मोठय़ा भूभागावर भटकंती करतात, अशा परिस्थितीत जर चित्ता खुला सोडला, तर चित्ता व स्थानिक लोकांचा आपापसात संबंध येणे अटळ आहे. यातूनच पुढे चित्ता संवर्धनाची बरीच मोठी गुंतागुंत निर्माण होईल व चित्त्याचे संरक्षण करणेही अवघड जाईल.
चित्ता, माळढोक व माळरानांचे कायमस्वरूपी संवर्धन करायचे असेल, तर दोन महत्त्वाच्या गोष्टीची आवश्यकता आहे. एक म्हणजे प्रजननयोग्य सुरक्षित स्थळांसाठी माळरानांचे संरक्षित क्षेत्र तयार करणे, ज्यासाठी जमिनी अधिग्रहण करण्याची गरज आहे. यासाठी बराच मोठय़ा प्रमाणावर पैसा लागेल. चित्त्याला आणण्यासाठी घाई करणाऱ्या वन मंत्रालयाने या बाबींकडे आजतागायत पूर्णपणे डोळेझाक केली आहे. दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे माळरानांच्या संवर्धनात स्थानिकांचा प्रत्यक्ष सहभाग, सध्याच्या परिस्थितीत स्थानिक लोक माळढोक व माळरानांच्या संवर्धनाविरोधात असण्याचे कारण म्हणजे काळविटामुळे शेतीचे होणारे नुकसान, चित्त्याच्या संवर्धनासाठी अगोदर काळविटांचे संवर्धन लागेल. पण काळविटांचे संवर्धन करण्याआधी स्थानिक शेतक ऱ्याच्या नुकसान भरपाईची व कायद्यातील बदलाची गरज आहे. असे न केल्यास चित्ता व एकूणच माळरान संवर्धनात स्थानिक लोकांचा सहभाग व पाठिंबा नसेल. यामुळेच चित्ता यायच्या आधीच मध्य प्रदेशातील स्थानिक लोकांनी विरोध करायला सुरुवात केली आहे.
सध्या चित्त्याचा नैसर्गिक स्पर्धक म्हणजे लांडगा, चित्त्याला जर नैसर्गिक अवस्थेत मुक्त सोडता आले तर लांडगा व चित्ता यांच्यातील परस्पर स्पर्धेतून नेमके काय घडेल हे आताच सांगणे कठीण आहे.
भारतातील माळरानांची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. शेतीचा विस्तार, प्रचंड गुरेचराई, जमीन वापराच्या पद्धतीतील आमूलाग्र बदल व आणि वन्यजिवांची आजही सुरू असलेली शिकार यामुळे माळरानांचे स्वास्थ्य बिघडले आहे.  माळढोक, तणमोर, काळवीट, चिंकारा, लांडगा यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. स्थानिक लोकांना माळढोक व माळरान संवर्धनात काहीच रस नाही. उलट अभयारण्य कायदे, विकासाचा अभाव, पाण्याची कमतरता, सामान्य सोयीसुविधांचा अभाव तसेच लांडगे व काळविटामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे स्थानिक लोक संवर्धनाच्या पूर्णपणे विरोधात आहेत.
माळरानांच्या संवर्धनासाठी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. भारतात आजही गुरेचराईची योजना नाही, स्थानिक लोक सहभागातून वन्यजीव संवर्धनासाठी सरकारी पातळीवरून काहीच प्रयत्न होत नाही, वनखात्याच्या समस्यांना नेहमीच दुर्लक्षित केले गेले आहे. माळढोकसारख्या, अतिदुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी कुठलीच ठोस पावले उचलली जात नाहीत. चित्त्याला आणून भारतीय माळरानांचे संवर्धन होईल हे पूर्णपणे न पटणारे आहे. त्याआधी बऱ्याच मोठय़ा समस्यांवर उपाय शोधणे ही आपली प्राथमिकता असायला पाहिजे. चित्ता आणण्यात वेळ, पैसा व तज्ज्ञ मनुष्यबळ वाया घालवण्यापेक्षा सर्वच पातळीवर माळरान संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. नाहीतर एकीकडे माळराने व त्यावरील दुर्मिळ वन्यजीव नष्ट होतील आणि दुसरीकडे आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्याला प्राणिसंग्रहालयात बघावे लागेल.

डॉ. प्रमोद पाटील - लोकसत्ता संदर्भ सेवा
gibpramod@gmail.com 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...