‘आजोबा’चा धडा अन् चटका लावणारा मृत्यू !

विनायक परब , लोकरंग ,लोकसत्ता
vinayak.parab@expressindia.com 

altखरेतर ‘ती’ रात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपस्थित असलेल्या सगळ्यांसाठी लक्षात राहणारी होती. तो ‘आजोबा’ नसावा, अशी मनोमन प्रार्थना सर्वजण करत होते. तो वाचण्याची शक्यता तर नव्हती. दुसरीकडे त्याच्या शरीरात बसवलेली इलेक्ट्रॉनिक चिप(Electronic Chip) ताडून पाहण्याचे काम सुरू होते. सर्वाच्याच मनातली इच्छा अशी होती की, ‘तो’ ‘आजोबा’ नसावा.. पण फोन आला ‘ती’ चिप त्याचीच होती.. मृत्यू झाला तो ‘आजोबा’च होता. त्याचा तो अपघाती मृत्यू साऱ्यांनाच चटका लावून गेला. कारण या आजोबाने गेल्या दोन वर्षांत अनेकांना जीव लावला होता. एवढेच नव्हे तर त्याची कथा ऐकल्यानंतर अनेकांनी बिबळ्याच्या संवर्धनाच्या कामी स्वतला झोकून दिले होते. म्हणून तर रात्री फोनाफोनी झाली. अनेकांना रडू कोसळले !
खरेतर आजोबाची ही कथाच विलक्षण होती. राज्यामध्ये बिबळ्यांच्या अभ्यासासाठी त्यांच्या शरीरामध्ये चिप बसवून, कॉलर आयडीमार्फत त्यांचे निरीक्षण  क रण्याच्या प्रकल्पाची सुरुवात झाली. विद्या अत्रेयी आणि तिचे सहकारी यांनी वाघोबा प्रकल्पाला सुरुवात केली. या अभ्यासादरम्यान अनेक महत्त्वाच्या बाबी उघडकीस आल्या. पूर्वी सर्वानाच असे वाटत होते की, बिबळे हे जंगलात असतात. पण याच अभ्यासात उघड झाले की, सर्वाधिक बिबळ्यांचे वास्तव्य जंगलात नव्हे तर शेतात, मानवी वस्तीच्या जवळ असते. आणि ते शक्यतो माणसांच्या जवळ येण्याचा प्रयत्न कधीच करत नाहीत. ते माणसांना टाळतात. हे सिद्ध करण्यासाठी ज्यांची मोलाची मदत झाली, त्यात ‘आजोबा’चा समावेश होता.
कल्याण नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ वर असलेल्या टाकळी ढोकेश्वर या गावातील विहिरीमध्ये तो सापडला. त्यानंतर त्याच्या शेपटामध्ये एक चिप ओळखीसाठी बसविण्यात आली तर गळ्यात कॉलर आयडी. त्याच्यामुळे उपग्रहाद्वारे तो कुठून कुठे आणि कसा जातो, ते कळणार होते. त्याला माळशेजजवळ सोडण्यात आले. मे २००९ मध्ये त्याला तिथे सोडल्यानंतर त्यानंतरच्या २५ दिवसांमध्ये तब्बल १२० कि.मी. चालून तो मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पोहोचला. आजोबाचा डोंगर, रतनगड, कसारा रेल्वे स्थानक, खर्डी त्यानंतर तानसा, गणेशपुरी, पेल्हार, तुंगारेश्वरचे अभयारण्य, वसई असे करत त्याने घोडबंदरचा परिसर गाठला. त्यापूर्वी विद्या अत्रेयींसारखे अभ्यासक सतत सांगत होते की, वन्य प्राण्यांचा अधिवास ठरलेला असतो. त्यांच्या घरापासून कितीही दूर नेऊन त्यांना सोडले की, ते घरी परत येतात. आजोबाच्या बाबतीत घोडबंदरचा परिसर हेच त्याचा अधिवास असलेले ठिकाण मूळ घर असावे, असा कयास अभ्यासकांनी काढला होता.
त्याची परत येण्याच्या मार्गावरील परिपक्वता पाहून त्याचे नामकरण ‘आजोबा’ असे करण्यात आले होते. तो सकाळी कधीच फिरत नसे. तिन्हीसांजेनंतर तो बाहेर पडे आणि मग मार्गक्रमण करत असे. विद्या अत्रेयी म्हणाली की, मानवी वस्तीजवळ तो आला की, काळजाचा ठोका चुकत असे. काही विपरीत तर घडणार नाही ना, अशी शंका येई. पण त्याने कधीच माणसांवर हल्ला केला नाही. अनेकदा तो मानवी वस्तीच्या अतिशय जवळ झाडीत लपून असायचा. तो बिल्कुल हालचाल करत नसे. एकाच जागी बसून असायचा. हे सारे उपग्रहाद्वारे कळत होते. रात्र झाली की, मग तो बाहेर पडायचा. बहुधा त्याला कळत होते, त्याचे घर कुठे आहे ते.. प्राण्यांना ही घराची अंतप्रेरणा कुठून येते, याविषयी जगभरात अभ्यास सुरू आहे. २-३ जुलैच्या आसपास उल्हास खाडी पार करून तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात म्हणजेच त्याच्या घरी परतला. बहुधा त्याच वेळेस पाण्यात पोहून येताना त्याच्या कॉलर आयडीमध्ये पाणी शिरल्याने त्यात बिघाड झाला असावा, कारण त्यानंतर उपग्रहाचे संकेत पूर्णपणे थांबले होते. शेवटचा उपग्रह संदेश १७ जुलैला मिळाला होता.
alt‘आजोबा’च्या या अभ्यासामध्ये अनेकजण सहभागी झाले होते. त्यात विद्यासारखे जीवशास्त्रज्ञ होते आणि अनेक तरुण मंडळी होती ज्यांना वन्यजीवांच्या अभ्यासामध्ये खूप स्वारस्य होते. अनेक पत्रकारही आजोबाच्या या अभ्यासानंतर वन्यजीव वार्ताकनाकडे वळले. दरम्यान आणखी एक उदाहरण महाराष्ट्रात घडले. नाशिक- गुजरात सीमेवर ‘सीता’ या मादी बिबळ्याला पकडले होते. तिला जव्हारमध्ये आणून सोडले, तेव्हा ती गाभण होती. त्यानंतर तिला पिल्लेही झाली. तिचेही उपग्रहाद्वारे ट्रॅकिंग (Teacking)सुरू होते. चार महिन्यांनंतर बिबळ्याची पिल्ले आईसोबत फिरतात. ती चार महिने जव्हार परिसरात होती त्यानंतर तिनेही प्रवासाला सुरुवात केली आणि ज्या ठिकाणाहून तिला पकडले होते तिथे ती रस्ता माहीत नसतानाही व्यवस्थित पोहोचली.
आता देशभरात बिबळ्यांचे अभ्यासक आजोबा आणि सीता या दोघांचीही उदाहरणे ‘सिद्ध झालेली उदाहरणे’ म्हणून वापरतात. असा हा आजोबा कुठे असेल? काय करत असेल? परत जुन्नरला जाणार का? असे अनेक प्रश्न सर्वानाच पडत होते. आम्ही सारेजण एकमेकांना भेटलो की, आजोबाच्या चर्चेवर किमान १५ मिनिटे ते अर्धा तास कसा जात असे कळायचे नाही. त्याच्याबद्दलचे सर्वाचे आकर्षण कायम होते. अशातच गेल्या गुरुवारी अनपेक्षित घटना घडली. वसईला महामार्गावर एक बिबळ्या जखमी अवस्थेत आढळला. जोगेश्वरीचे निवासी असलेल्या हितेंद्र मोटा यांनी गाडी थांबवली, त्याला गाडीत ठेवले आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले. त्याच्यावर तातडीच्या उपचारांचे प्रयत्न झाले.. पण तोवर त्याने प्राण सोडला होता. मग त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. देवाचा धावाही झाला.. तो आजोबाच होता.. आजही अनेकजण त्या धक्क्यातून अद्याप बाहेर आलेले नाहीत. पण आजोबा जाता जाता आपल्या साऱ्यांना बिबळ्याच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचा धडा देऊन गेलाय.. प्राण्यांचा अधिवास(
habitat) बदलण्याचे मूर्खपणाचे प्रयत्न करू नका. हे आपण अमलात आणले तर ती आजोबासाठी चांगली श्रद्धांजली ठरेल !

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...