पोपट हरवले " नांही , ही तर पोपटांची हत्याच आहे !

पोपट हरवले या लेखावर आलेली एक उल्लेखनीय प्रतिक्रिया:
" पोपट हरवले " मधून शिवाजी अभिमान शेळके, बार्शी (सोलापूर) यांनी " पोपट " या पक्ष्याच्या नष्ट होण्याच्या कारणांकडे - त्यांना वाचवण्याच्या उपायांकडे आणि पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या गरजेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर माणूस सुसंस्कृत - प्रगत होऊ लागला-झाला आहे म्हणजे काय ? आपल्या बुद्धिचा - डोक्याचा वापर ( गैर वापर) करून आपल्या सोईचे - तात्पुरत्या फायद्याचे - प्राणी -पशु-पक्षी - पर्यावरणाच्या मुळावर येणारे आणि शेवटी विनाशाकडे नेणारेच प्रयत्न मानव करत आहे , हे शंभर टक्के सत्य आहे. डोंगर-टेकड्या भुईसपाट करणे , शेत जमिनीवर बांधकाम - कारखाने , पिण्याच्या पाण्यात - नदी - समुद्रात - हवेत रासायनिक पदार्थ-वायू - घाण सोडणे , कीटक नाशकं वापरून जमीन-धान्य विषारी बनवणे , बेडुक-पक्षी - साप - मुंगूस - मोर - कावळे - गिधाडे - चिमण्या-कबुतर -वानर - माकड अशा अनेक पशु-पक्ष्यांना जगणं हराम करण्यास मोबाईल टॉवर्ससहित मानवाचे अनेक उद्योग-हव्यास कारणीभूत ठरत आहेत. गावोगावी वर्षानुवर्षांपासून हजारो लाखोंच्या संखेत बेडूक ( खाण्यासाठी - प्रयोग शाळांसाठी ) मुंगूस ( खाण्यासाठी - त्याचे केस ब्रश बनविण्यासाठी ) , मोर-हरीण-कबुतर-ससे -सरडे - साप-नाग आणि अनेक प्राणी -पक्षी बिनबोभाट - सर्रास मारले जात होते - मारले जात असतील . बार्शी जवळील सोनारी येथे भैरवनाथाच्या मंदिरात - गांवात पूर्वी खूप माकडं असायची. विजांच्या तारांमुळे शॉक लागून किंवा अन्य कारणांमुळे आता माकडांची संख्या खूपच कमी झाली आहे. एखादी " स्पेसिज " गळे कापून - मारून दुर्मिळ करायची अन मग " वाघ बचाव - मोर बचाव- पोपट बचाव " असा गळा काढत त्या प्रोजेक्टवर करोडो खर्चायचे - देखावा करायचा हा मानवाचा नंबरी स्वभावच झाला आहे. गांवांतून - शहरांतून नष्ट होत चाललेले कावळे- चिमण्या-गिधाडे हाही मोठा चिंतेचा विषय आहे. पण समाजातच - राजकारणातच अन स्वार्थाच्या बाजारातच जेव्हा माणूसच लांडगा-कोल्हा-नाग-गिधाड - बेडूक -गाढव - बैल - कावळा - घुबड अश्या सगळ्याच पशु-पक्ष्यांची भूमिका वठवत आहे , तेव्हा " केवळ स्वत:च्या शौकासाठी पिंजर्‍यात बंद करून टाकलेले पोपट हरवले काय अन नष्ट झाले काय सारखेच , ही बेफिकिरी अन " भूतदया - मानवता - पर्यावरण " यावर उठ सूट " पोपटपंची " करणार्‍यांनी निसर्गाचे वाट्टोळेच करायचे ठरवले तर निसर्गही असा झटका देईल की मानवाचाच " पोपट " होऊन बोलती बंद होईल . " मानव " " स्पेसिज " बचाव प्रकल्प हाती घ्यायला मग साक्षात भगवंतही " मत्स्य-वराह " अवतार घ्यायला धजावणार नाही . हे मानवाने ध्यानी घ्यायला हवं. 

-शरयुसुत “ निर्भय ’’ 9822927618 - नागपूर ( मूळ गांव – परंडा – जि.उस्मानाबाद – बार्शीजवळ)

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...