विकासकार्य अन् वाघांचे अस्तित्व (tigers are in danger)

संजीव हरिदास हेडाऊ, नागपूर -लोकसत्ता, गुरुवार, १० नोव्हेंबर २०११
(अध्यक्ष- नेचर अँड वाइल्डलाइफ कन्झव्‍‌र्हेशन सोसायटी)

alt२४ सप्टेंबर रोजी छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेलगतच्या भाकअटोला या गावात पाच हजार लोकांच्या जमावाने एका वाघिणीला दगडांनी ठेचून ठार मारले. देशभरातील वन्यजीवप्रेमींना हादरवून सोडणारी ही घटना होती. ही घटना म्हणजे मानव-वन्यप्राणी संघर्षांचीच परिणती होय. वन्यजीवसंवर्धकांना खुले आव्हान देणारीच ही घटना आहे. यापूर्वी अशीच एक घटना एप्रिल महिन्यात चंद्रपूर येथे घडली होती. तीनशे ते चारशे लोकांच्या जमावाने एका बिबटय़ाच्या सहा महिन्यांच्या पिलाची अतिशय निर्दयतेने दगडांनी ठेचून हत्या केली होती. सध्या सगळीकडे वन्यप्राणी संवर्धनाचे प्रयत्न सुरू असताना अशा प्रकारच्या घटना या प्रयत्नांना तडा देणाऱ्याच आहेत. या दोन्ही घटनांमध्ये मात्र एक साम्य आहे. चंद्रपूरची घटना जिथे घडली तिथे परप्रांतीय मजुरांची वस्ती आहे. या बिबटय़ाच्या पिलाला मारणारे परप्रांतीय मजूरच होते. आता या वाघिणीला मारण्याच्या घटनेमध्येदेखील छत्तीसगडी लोक सामील आहेत, हेच ते साम्य! बालपणापासून मी चंद्रपूर, गडचिरोलीच्या जंगलांमध्ये फिरतो आहे. या भागात लोकांवर वाघांचे हल्ले अथवा गुराढोरांना मारण्याचे प्रकार नित्याचेच आहेत. परंतु तिकडे कधी वाघाला अशा प्रकारे मारल्याचे ऐकिवात नाही. या भागातले आदिवासी वाघांना सहसा मारत नाहीत, कारण त्यांची उपजीविका जंगलांवर अवलंबून असल्यामुळे जंगलांना ते ‘वनदेवता’ आणि वाघांना देव मानून त्यांची पूजा करतात. इकडच्या अनेक गावांमध्ये वाघांची मंदिरेसुद्धा पाहायला मिळतात. त्यांची कितीही गुरेढोरे मारली गेली तरीही ते वाघांना अशा प्रकारे मारण्याचा विचार सहसा करत नाहीत. याबद्दल त्यांना विचारले असता, त्यांचे उत्तर असते, ‘वाघदेवच तो, मारणारच! त्याला मारायचा हक्क आहे.’ हे आदिवासीच इकडच्या जंगल आणि वन्यप्राण्यांचे खरे रक्षक आहेत हे आपण मान्य करायलाच हवे. परंतु या परप्रांतीय लोकांच्या लेखी कोणताही वन्यप्राणी हा अतिशय खतरनाक असतो आणि त्याला मारलेच पाहिजे, जिवंत सोडता कामा नये अशी त्यांची विचारसरणी असते.
यावरून आपण एक धडा घ्यायला हवा, की ताडोबाच्या जवळपास जर खाणी किंवा प्रकल्प वगैरे झाले तर तिथे हजारोंच्या संख्येने परप्रांतीय मजूर येतील. तिथे त्यांच्या वस्त्या वसतील आणि या भागात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार असल्यामुळे मानव-वन्यप्राणी संघर्षांचे हे प्रकार भयंकर प्रमाणात वाढतील. कुठेही वन्यप्राणी दिसला, की मार त्याला, अशा घटना वाढतच जातील आणि वन्यप्राणी संवर्धनाचे सारे प्रयत्न फोल ठरून वन्यप्राण्यांनी समृद्ध असलेले हे जंगल वन्यप्राणीविरहित व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून अशा घटनांपासून बोध घेऊन ताडोबा, जुनोना किंवा लोहाराच्या जवळपास खाणी किंवा प्रकल्प अजिबात होऊ नयेत यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाने अंगदाच्या पायाप्रमाणे ठाम राहायला हवे. तरच आपले हे समृद्ध जंगल अबाधित राहील, अन्यथा काही खरे नाही.
छत्तीसगडमध्ये घडलेली ही घटना वेळीच जर योग्य पाऊल उचलले गेले असते तर नक्कीच रोखता आली असते. या घटनेमागील दुसरे एक तथ्य असे आहे, की चार महिन्यांपूर्वी चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रामधून पकडण्यात आलेल्या एका जखमी वाघिणीला उपचारानंतर १२ जून रोजी नवेगाव राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते. ही मारली गेलेली वाघीण तीच असावी अशी शक्यता वर्तवण्याला वाव आहे, कारण यापूर्वीच्या घटनाक्रमांचा विचार करता अशी शक्यता वर्तवता येते. नवेगावमध्ये सोडल्यानंतर ही वाघीण जंगलाच्या बाहेर पडली आणि आजूबाजूच्या गावातील गुराढोरांची शिकार करण्याचा सपाटा तिने लावला. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न मी त्या वेळी केला असता माझ्या असे लक्षात आले, की ही वाघीण मूलत: ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रामधली होती. या क्षेत्रात अनेक गावे आहेत आणि या क्षेत्रातील जंगलात जवळपास २० ते २५ वाघ असल्याचे सिद्ध झालेले आहे. या क्षेत्रात वाघांनी गुराढोरांची शिकार करण्याचे प्रमाणदेखील बरेच आहे. या ठिकाणी तृणभक्ष्यी प्राण्यांची संख्या अतिशय दुर्मिळ असल्यामुळे आपल्या उदरभरणासाठी ते गावातील गुराढोरांवरच अवलंबून असतात. या पाळीव जनावरांना मारण्यासाठी त्यांना विशेष मेहनत करावी लागत नसल्यामुळे त्यांच्यासाठी ही सोपी शिकार असते. या कारणास्तव त्यांना या सोप्या शिकारीची चटक लागून ते आळशी बनतात आणि नंतर त्यावरच अवलंबून राहतात.
 ही वाघीणदेखील ब्रह्मपुरीच्या जंगलातीलच असल्यामुळे तिला या सोप्या शिकारीची सवय असण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून तिला नवेगावच्या जंगलात जरी सोडण्यात आले होते तरी ती आपल्या सवयीनुसार सोप्या शिकारीच्या शोधात जंगलाबाहेर आली असल्याची शक्यता आहे.
दुसरे एक तथ्य असे आहे, की तिरोडय़ाला अदानी विद्युत प्रकल्प बनलेला आहे. ज्या जागी हा प्रकल्प बनला आहे. तो नवेगाव आणि नागझिऱ्याला जोडणारा कॉरिडॉरचा पट्टा आहे. या प्रकल्पामुळे हा कॉरिडॉर खंडित झालेला असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या आवागमनावर त्याचा परिणाम झालेला आहे म्हणून दुसरी शक्यता अशीही वर्तवता येते, की ही वाघीण बहुधा या कॉरिडॉरमधून प्रवास करत असावी आणि या प्रकल्पामुळे गोंधळून जाऊन ती गावांच्या दिशेने भरकटत गेली असावी, कारण हे क्षेत्र तिच्यासाठी नवीन असल्यामुळे हे जंगल तिला अनोळखी होते, म्हणूनच शेवटी काही न सुचल्यामुळे ती गावांकडे भरकटत गेली असावी अशीही एक शक्यता आहे. तिथे तिला काही खायला न मिळाल्यामुळे शेवटी भुकेने व्याकुळ होऊन तिने गुराढोरांना मारण्याचा सपाटा लावला असावा. त्यामुळे गावकरी त्रस्त झाले आणि शेवटी एका तरुण वाघिणीचा बळी गेला. यावरून आपणास एक धडा मिळतो, की विकासकार्य आणि औद्योगिक प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांचे जीवन अस्ताव्यस्त होऊन त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे.
मागील चार महिन्यांत या वाघिणीने महाराष्ट्रात २७ आणि छत्तीसगडमध्ये १७ अशा प्रकारे एकूण ४४ जनावरांची शिकार केली आहे आणि एका ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतला आहे. या भागातील गावकऱ्यांनी अनेकदा वनविभागाकडे तक्रारी केल्या, परंतु या तक्रारींना फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. त्या दिरंगाईचीच परिणती सदर घटनेमध्ये झाली, असे म्हणायला वाव आहे. वेळीच जर वनविभागाने या वाघिणीच्या बंदोबस्तासाठी पाऊल उचलले असते तर ही घटना नक्कीच रोखता आली असती.
अशा घटनांमधून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निष्कर्ष निघतो, की आपण आपल्या विकासकार्यासाठी जंगलांना खंडित करून वन्यप्राण्यांना वेठीस धरत आहोत. मागील काही वर्षांत राष्ट्रीय महामार्ग, खाणी, विद्युत प्रकल्प यामुळे सलग असलेले जंगल खंडित होत आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे वन्यप्राण्यांचे कॉरिडॉर धोक्यात आले आहेत. या विकासकार्यामुळे ताडोबा, पेंच, बोर, नवेगाव, नागझिरा, कान्हा या सगळय़ा अभयारण्यांना जोडणारे कॉरिडॉर खंडित होत आहेत, त्यामुळे वनप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. आपण आपल्या विकासासाठी वन्यप्राण्यांची कशी वाताहत करत आहोत, हेच यावरून दिसून येते.
यासाठी मला एक उपाय सुचवावासा वाटतो. चौपदरीकरणाच्या कामात ज्या ठिकाणी कॉरिडॉरचा पट्टा येतो, तेवढा भाग कच्चाच ठेवायला हवा. हा पट्टा फार लांबलचक नसतो. फक्त ५००, ३०० आणि ५० मीटरचे हे पट्टे वाहतुकीसाठी फार त्रासदायक ठरणार नाहीत. तेवढा पट्टा कच्चा ठेवून थोडय़ा थोडय़ा अंतरावर गतिरोधक बनवावे, जेणेकरून वाहनांचा वेग मर्यादित राहील. कारण वाहनांच्या धडकेनेसुद्धा अनेक प्राणी मृत्युमुखी पडलेले आहेत. कॉरिडॉरच्या सुरुवातीला ‘हे  वन्य  प्राण्यांचे कॉरिडॉर असून वाहनांची गती कमी ठेवून सावधगिरी बाळगावी’ अशी सूचना देणारे मोठे फलक लावावेत. तेवढा पट्टा पार करायला वाहनांना जास्तीत जास्त ५ ते १० मिनिटे जास्त लागतील, तेवढा त्रास भोगायची तयारी आपली असली पाहिजे किंवा हे जर शक्य वाटत नसेल तर आणखी थोडा जास्त पैसा खर्च करून कॉरिडॉरच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फ्लायओव्हर बनवावे आणि खालचा कॉरिडॉर अखंडित ठेवावा. पटल्यास हे उपाय नक्कीच करायला हवेत. वन्यप्राण्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एवढे तर आपल्याला करावेच लागेल, अन्यथा पृथ्वीवर माणसाव्यतिरिक्त दुसरा प्राणी दिसणार नाही.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...