काश्मिरी गप्पीदास( Oenanthe isabelina ) पक्ष्याची विदर्भात प्रथमच नोंद पोहरा जंगलात दुर्लभ दर्शन

अमरावती, ४ नोव्हेंबर / प्रतिनिधी,लोकसत्ता 
altहिवाळ्यात राजस्थान आणि पाकिस्तानच्या वाळवंटात स्थलांतर करून येणारे गप्पीदास (व्हीटीएर) हे पक्षी भारतात इतरत्र दिसत नाहीत. परंतु, याच प्रजातीतील कश्मिरी गप्पीदास अमरावती जिल्ह्य़ात आढळून आला असून विदर्भातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. कश्मिरी गप्पीदास या पक्षाची नोंद अमरावतीजवळील पोहरा जंगलात झाली आहे. वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक लतीश डेकाडे आणि डॉ. जयंत वडतकर यांना हा पक्षी दिसून आला.
बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे पक्ष्यांच्या हजारो वर्षांच्या चाकोरीबद्ध जीवनपद्धतीत अलीकडच्या काळात बदल होताना दिसत आहेत. स्थलांतरादरम्यान बरेचदा नवनवीन पक्ष्यांची नोंद होत असते. येथील वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था गेल्या १३ वर्षांपासून पक्ष्यांचा अभ्यास आणि नोंदणीचे काम सातत्याने करीत असून विदर्भात स्थलांतरित होणाऱ्या अनेक नवीन पक्ष्यांची नोंद करण्यात संस्थेला यश मिळाले आहे, असे डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.
काश्मिरी गप्पीदास या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ओनांथी इसाबेलिना (
Oenanthe isabelina ) असे आहे. रॉबिनप्रमाणे दिसणारा आणि त्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला, रंगाने वाळूप्रमाणे फिक्कट करडा, पाय व चोचीचा रंग काळा, पंखावर काळ्या रंगाच्या विशिष्ट प्रकारच्या रेषा आणि आखूड शेपूट असे याचे रूप आहे. हा पक्षी भारतात निवडक ठिकाणी आणि राज्यात क्वचित वेळा पश्चिम घाटाच्या प्रदेशात आला आहे. दक्षिण भारतात या पक्ष्याची नोंद झालेली नसल्याने अमरावतीत झालेली नोंद ही मध्य भारतातील पहिलीच नोंद ठरावी, असे मत डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केले आहे.
पोहरा जंगलात या पक्ष्याचे छायाचित्र काढण्यात लतीश डेकाडे यांना यश मिळाले आहे. डेकाडे यांच्यासह डॉ. वडतकर, प्रा. डॉ. गजानन वाघ, प्रा. नंदकिशोर दुधे, अल्केश ठाकरे हे पक्षी अभ्यासक या पक्ष्याच्या सवयी आणि वास्तव्यावर लक्ष ठेवून आहेत. या पक्ष्याची नोंद ही अमरावती जिल्ह्य़ाच्या आणि विदर्भाच्या पक्षीसुचीमध्ये भर घालणारी असून विदर्भातील पक्षीसूचीमध्ये एकूण ४१२ पक्ष्यांच्या नोंदी आहेत. गेल्या वर्षी कॉमनशेल्डक  या स्थलांतरित पक्ष्याची नोंद विदर्भात आणि मध्य भारतात प्रथमच करण्यात आली होती, असे डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले.  
 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...