चतुर उभारती पंख आपुले गर्वाने वरती!

माधव गाडगीळ,सकाळ

मोसमी वाऱ्याचा फायदा घेत विश्‍वसंचारी चतुर दसऱ्याच्या मुहूर्तावर कोकणातून मालदीवमार्गे मादागास्कारला पोचतो आणि गुढीपाडव्याला परततो, अशी आश्‍चर्यजनक शक्‍यता नुकतीच पुढे आली आहे. आता याचा मागोवा घेणे सुरू आहे.
नेमेचि येणारा पावसाळा नुकताच नेटका बरसून गेला आहे. दसऱ्यानंतर समुद्रावरून वाहत येऊन सह्यकड्यावर आपटणारे वारे तोंड फिरवून दक्षिण भारताकडे, आफ्रिकेकडे आणि जरा मुरडून मादागास्करकडे वाहायला लागतील. तसे पाहिले तर आफ्रिका आपले बंधुखंड अन्‌ मादागास्कर आपले भगिनीद्वीप आहेत. पंधरा कोटी वर्षांपूर्वीपर्यंत आपण सारे एकत्र होतो. आधी आफ्रिका विभक्त झाली; मग नऊ कोटी वर्षांपूर्वी मादागास्कर आणि भारत तुटले. भारत मादागास्करला दक्षिणेत सोडून उत्तर गोलार्धात पोचला, म्हणून आपल्या पावसाळ्यात मादागास्करची हवा कोरडी राहते. आपल्या कोरड्या ऋतूत तिथे भरपूर पाऊस पडतो. भावंडांची ताटातूट होतानाची चीर म्हणजे भारताचा पश्‍चिम आणि मादागास्करचा पूर्व किनारा. त्या वेळच्या तणावातून आपला पश्‍चिम घाट आणि मादागास्करमधला पूर्व घाट ठाकला. मादागास्कर बेट दक्षिण भारताचे हुबेहूब प्रतिबिंब आहे. मादागास्करच्या पूर्व आणि आपल्या पश्‍चिम घाटांची उंची एकसारखी आहे. दोन्हीकडे मुसळधार पाऊस पडतो; दोन्ही सदाहरित वर्षावनांनी आच्छादित, जैववैविध्याने संपन्न आहेत.
भारतवासीयांना मादागास्करजवळच्या मॉरिशसचे खूप कौतुक आहे, तिथे मराठी संमेलनसुद्धा भरले होते; पण मादागास्करच्या अस्तित्वाची खास जाणीव नाही. मात्र आपल्याकडच्या एका अफलातून प्राण्याला मादागास्कर खास भावते असे दिसते. हा आहे उड्डाणकुशल विश्‍वसंचारी चतुर, पॅन्टाला फ्लाव्हेसेन्स. भूतलावर सर्वांच्या आधी हवेत भरारी मारली ती चतुरांनीच. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी जीवसृष्टी समुद्रात उपजली. खूप सावकाश, अवघ्या चाळीस कोटी वर्षांपूर्वी ती गोड्या पाण्यात पसरली. चतुर मूळचे गोड्या पाण्यातले कीटक. आजही ते शैशवावस्थेत इतर जलचरांची शिकार करत पाण्यात वावरतात. या शिशुचतुरांच्या प्रत्येक पायाला एक ढालीच्या आकाराचा जोड अवयव असतो. त्याचा श्‍वसनासाठी, तसेच वल्हवण्यासाठी उपयोग होतो. जेव्हा तीस कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर वनस्पती आणि त्यांच्यामागून कीटक पसरले, तेव्हा या चतुर शिशूंच्या पुढच्या चार वल्ह्यांचे रूपांतर प्रौढ चतुरांच्या पंखात झाले. हे आद्य गगनविहारी चतुर आज हवेत उडणाऱ्या कीटकांचे पट्टीचे शिकारी बनले आहेत.
चतुर पाण्यात अंडी घालतात, त्यांची पिल्ले पाण्यात वाढतात. तळ्या-झऱ्यांमध्ये माशांची भीती असते, म्हणून चतुर पावसाची थारोळी पसंत करतात. ढग बरसत राहतात, तोवर चतुरांची उपज होत राहते अन्‌ सप्टेंबरमध्ये तर त्यांचे पेवच फुटते. पावसाळ्यानंतर थारोळी सुकायला लागली की कठीण प्रसंग येतो. इतर अनेक प्राणी अशा संकटकाली जीवनज्योत अगदी मंद करून तगून राहतात; पण चतुरांना हे जमत नाही, तेव्हा ते माशांचा धोका पत्करत तळ्या-नद्यांचा आसरा तरी शोधतात, नाही तर दसऱ्यानंतर मुलुखगिरीला बाहेर पडतात. वाऱ्यांची दिशा बदलल्यावर दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडतो, म्हणून त्यांचा मोर्चा कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, केरळकडे वळतो. पण अलीकडेच समजले आहे, की एवढेच नाही, तर दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांवर आरूढ होऊन लाखो चतुर चक्क दर्यापार जातात. भारत- मादागास्करच्या वाटेवर मालदीवची बेटे आहेत. दर वर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये लक्षावधी चतुर इथे पोचतात. मालदीवमध्ये म्हण आहे की चतुरांबरोबर पाऊस उगवतो.

पण मालदीव बेटांवर गोडे पाणी मिळू शकते फक्त विहिरी खणून. अर्थात चतुरांची वीण शक्‍यच नाही. तेव्हा असे दिसते, की ते वाऱ्याबरोबर आणखी पुढे-आफ्रिकेत नाही तर मादागास्करला जात असावेत. मादागास्करमध्ये नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत चांगला पाऊस पडतो. तिथे पिल्ले मस्त वाढवता येतील. मग एप्रिलमध्ये वाऱ्याची दिशा पुन्हा एकदा बदलली की आफ्रिका-मादागास्करमध्ये जन्मलेले चतुर "ने मजसी ने, परत भारतभूमीला' असे म्हणू शकतील. आपल्याकडचे चातक पक्षी असे पावसाळ्यानंतर आफ्रिकेत जातात अन्‌ वसंतात भारतात परततात. पण आजपावेतो कोणतेच कीटक समुद्रोल्लंघन करत असल्याचे माहीत नव्हते; आता मात्र हे पूर्ण शक्‍य वाटते आहे, आणि शास्त्रज्ञांना एक चटकदार संशोधनविषय मिळाला आहे. आता बोटी-विमानांतून चतुरांचा पाठलाग केला जाईल अन्‌ लवकरच शहानिशा होईल. आशा आहे, की थोड्याच दिवसांत आपण कुसुमाग्रजांच्या कोलंबसाच्या गर्वगीतासारखे एक दर्यावर्दी चतुरांचे गीत अभिमानाने गाऊ शकू.

चतुर उभारती पंख आपुले गर्वाने वरती ।
सांगती खुळ्या सागराला ।
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा ।
निघालो बंधुखंडाला, चाललो भगिनीद्वीपाला!

(लेखक पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत.)

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...