शेकाटय़ाचे काठावरचे घरटे

Image credit: Loksatta daily
शेकाटे आपले घरटे नेहमी नदीतल्या छोटय़ाश्या बेटांवर, तलावांच्या किंवा झिलाणींच्या सुकलेल्या काठांवर बनवतात. यांचे घरटे म्हणजे उघडय़ा जमिनीवर एक खोलगट खड्डा किंवा उथळ मीठागरांमध्ये खडय़ांचा एक ढीग असतो. जमिनीवरच्या शेकाटय़ांच्या शत्रूंचे लक्ष जाऊ नये म्हणून अशा जमिनीत थोडा खोलगट खड्डा तयार करण्यात येतो. शेकाटे त्या जागेवर आधी सफाई करतात. काडय़ांचा कचरा चोचीने उचलून इकडे तिकडे फेकून देतात. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला अशा त्यातल्या काडय़ा व तत्सम कचरा फेकून देतात. घरटे बांधायच्या आधीचे सफाई काम बघण्यासारखे असते. माती उकरून छोटा खड्डा तयार झाला की घरटय़ाला आतून पाण्यातली वनस्पती, गवत व तत्सम साहित्य खुडून त्याचे अस्तर दिले जाते. बऱ्याच वेळा परिसरातल्या कित्येक जोडय़ांची समूहात घरटी बनवली जातात.
मागच्याच महिन्यात सोलापूर जवळच्या नान्नज येथील माळढोक अभयारण्याला चाललो होतो. पुणे-सोलापूर रस्ता बाकी सगळ्या रस्त्यांपेक्षा अतिशय कंटाळजनक वाटतो. काही करा रस्ता संपता संपत नाही. सरळसोट आणि नेहमी मोठमोठाल्या ट्रकच्या ट्रॅफिकमुळे अगदी जिवावर येते. असे असूनही या रस्त्यावरून वर्षांतून अनेक वेळा आम्ही जात असतो. ते का? ते इथल्या वन्यजीवनामुळे.  खास करून या रस्त्याला लागूनच मुबलक प्रमाणात असलेली पक्षीनिरीक्षणाची अनेक ठिकाणे. पाटस मागे गेले आणि रस्त्याच्या एका बाजूला एक छोटा बांध दिसला. भिगवण किंवा नान्नजला जाताना प्रत्येक वेळी आपण हिवाळ्यात कधीतरी इथे निरीक्षणासाठी यायचे असे नेहमी म्हणत असू, आणि ते राहून जायचे, पण त्या दिवशी काही राहवले नाही. अचानक विचार बदलला आणि थोडे पुढे गेलो होतो ते परत मागे फिरलो. माझे मित्र विश्वनाथ भागवत यांनी चांगला रस्ता सोडून खडबडीत जमिनीवर कार खाली उतरवली. हा छोटेखानी बांध घडीव दगडांची भिंत बांधून बनवलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पाणीसाठा त्याखालच्या शेतांना उपयोगी पडतो. आटत आलेल्या या तळ्यात या वर्षी जून महिन्यातच altलवकर सुरू झालेल्या पावसामुळे चांगलेच पाणी साचले होते. या पाण्यात वारकरी,नदी सुरय, टिबुकली व इतर पाणपक्षी मस्त बागडत होते. समोरच काळा-पांढरा पक्षी त्याच्या लांब पायांमुळे लक्ष वेधून घेत होता आकाराने अंदाजे तित्तिराएवढा होता म्हणजे २५ से.मी.असून सडपातळ अंगकाठीचा आणि पाठ व पंख काळेभोर तर मान, पोटापासून ते शेपटीखालचा भाग पांढरा असतो. सरळ, बारीक, काळी निमुळती चोच आणि उडताना शेपटीजवळचा पांढरा भाग पाचरीसारखा पाठीपर्यंत दिसतो. याच्या शेपटीच्या सम पातळीस पाय ताणलेले असतात. लाल रंगाच्या आणि कांडय़ांसारख्या लांबलचक पायांवरून न चुकता ओळखू येतो. याला पक्ष्यांमधला लंबू ऊर्फ अमिताभ बच्चन म्हणायला हरकत नाही. शरीरापेक्षा याचे पाय ६० टक्के जास्त लांब असून, जगातील सर्व पक्ष्यांत शेकाटय़ाचे पाय सर्वाधिक लांब आहेत. मराठीत शेकाटय़ाला पाणटिलवा किंवा टिलवा या नावानेही ओळखतात. याच्या काळ्या टोकदार पंखांमुळे इंग्रजीत याला ‘ब्लॅक विंग्ड  स्टील्ट’ (Black Winged Stilt) म्हणतात. हा निवासी पक्षी असून पाणथळ जागेच्या शोधात बांगलादेश, पाकिस्तान, ब्रह्मदेश,नेपाळ,संपूर्ण भारतात स्थानिक स्थलांतर करतात. साधारण १५०० मीटर उंचीपर्यंत काश्मीर खिंडीतही  सापडतात पण तिथे इतके सामान्य नाहीत. एकदा तर समुद्रसपाटीपासून ३६०० मीटर उंचीवर विशान सार येथे जुलै महिन्यात शेकाटय़ा दिसल्याची नोंद आहे. आपल्या भरतपूर येथे पानझडीत रिन्गिंग   केलेला शेकाटय़ा हिवाळ्यात पाकिस्तानच्या वायव्य प्रांत आणि वसंत ऋतूमध्ये उत्तर अफगाणिस्तान येथे सापडला होता.
शेकाटय़ाला कॉमन, इंडियन किंवा सिलोन स्टील्ट या नावानेसुद्धा ओळखतात. याचे शास्त्रीय नाव ‘हिमँटोपस हिमँटोपस’ (Himantopus himantopus) आहे. ग्रीक भाषेत ‘हिमॅस’ किंवा ‘हिमॅन्टोस’ म्हणजे पट्टा आणि ‘पाऊस’ म्हणजे पाय. रोमन निसर्गतज्ञ आणि लेखक प्लाईनी याच्या लिखाणातून हे नाव घेण्यात आले आहे. या दोन्ही शब्दांचा मेळ घालून तयार करण्यात आलेला ‘हिमॅन्टोपस' म्हणजे लांब, पातळ आणि तांबडय़ा रंगाचे पाय असलेला असा होतो. या लांब पायांमुळेच शेकाटय़ालाहिंदीत ‘गज पांव’ असे नाव आहे. गज म्हणजे मीटर आणि पांव म्हणजे पाय. संस्कृतमध्ये याला ‘कालपक्ष प्रवालपाद’ असे नाव आहे. दलदली, चिखलाणी, गावातळी, मिठागरे आणि खाडीतल्या चिखलमय जागा, नद्या, बंधाऱ्यांच्या मागच्या भागातल्या काठय़ांवर, क्वचित पूरग्रस्त क्षेत्रात आणि अगदी क्वचितच समुद्रकिनाऱ्यालगत शेकाटे दिसतात. काही शहरांमध्ये गटाराचं मलापाणी नदीत ज्या ठिकाणी सोडलं जातं अशा जागा शेकाटे विशेष पसंत करतात. अशा ठिकाणी त्यांचे खाद्य मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतं. लांब पायांमुळे हे खोल पोटापर्यंतच्या पाण्यातही आरामात चालतात. अगदी पाण्याच्या सपाटीपर्यंत पाय उचलून मोठय़ा ढांगा टाकत हे चालत असतात. या लांब पायांमुळे जिथे इतर पक्षी पोचू शकत नाही तिथे शेकाटे पाय आपटून खाद्य मिळवतात. उथळ पाण्यात चालणारे शेकाटे गरज वाटल्यास पोहूसुद्धा शकतात. अशा पाणथळ  जागी  हे गोगलगाय, कालव यांच्यासारखे कठीण कवचाचे जलचर, अळ्या आणि पाणकीटक शोधून खात असतात. तसेच पाण्यातल्या आणि दलदलीतल्या वनस्पतींच्या बियांचासुद्धा शेकाटय़ांच्या मेनू कार्डात समावेश असतो. चरताना नेहमी शेकाटय़ाची मान पाण्यात बुडालेली असते.
    अशा ठिकाणी इतर चिखलपायटय़ा पक्ष्यांबरोबर सुमारे ५० ते १०० च्या लहान-मोठय़ा थव्यात शेकाटे दिसतात. ते रात्रीच्या वेळी स्थलांतर करतात. रात्रीच्या वेळी अंधारात शेकाटे पाहू शकत नाहीत. त्यामुळे थव्यातला प्रत्येक पक्षी पिपाणीसारखा ‘किप किप’ आवाज काढून आपापली जागा कुठे आहे हे एकमेकांना सांगतात. उडतानासुद्धा असाच आवाज काढतात.
आम्ही खाली उतरून हळूहळू जवळ जायला लागलो तोच शेकाटय़ाच्या जोडीचा कंठ फुटला. एरवी तर शांत राहणाऱ्या या पक्ष्याला अनेक वेळा पाहिले होते. नेहमी मान खाली टाकून आपले खाद्य शोधण्यात गुंग असतो. पण या वेळेस त्याचा आवाज वेगळाच वाटत होता. अजून थोडे जवळ आलो आणि याचा ‘चेक-चेक-चेक-चेक’ आवाज जोरात सुरू झाला. याचा आवाज टिटवीच्या आवाजाला मिळताजुळता होता. आमच्या अंगावरून संथ उडत जात ओरडायला लागला. नक्की जवळपास शेकाटय़ाचे घरटे असावे. हा शेकाटय़ांच्या विणीचाच काळ होता. पावसाच्या तोंडावर म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान शेकाटय़ांची वीण असते. शेकाटे नेहमी आपले घरटे नदीतल्या छोटय़ाश्या बेटांवर, तलावांच्या किंवा झिलाणींच्या सुकलेल्या काठांवर बनवतात. यांचे घरटे म्हणजे उघडय़ा जमिनीवर एक खोलगट खड्डा किंवा उथळ मीठागरांमध्ये खडय़ांचा एक ढीग असतो. जमिनीवरच्या शेकाटय़ांच्या शत्रूंचे लक्ष जाऊ नये म्हणून अशा जमिनीत थोडा खोलगट खड्डा तयार करण्यात येतो. शेकाटे त्या जागेवर आधी सफाई करतात. काडय़ांचा कचरा चोचीने उचलून इकडे तिकडे फेकून देतात. एकदा उजव्या बाजूला आणि एकदा डाव्या बाजूला अशा त्यातल्या काडय़ा व तत्सम कचरा फेकून देतात. घरटे बांधायच्या आधीचे सफाई काम बघण्यासारखे असते. माती उकरून छोटा खड्डा तयार झाला की घरटय़ाला आतून पाण्यातली वनस्पती, गवत व तत्सम साहित्य खुडून त्याचे अस्तर दिले जाते. बऱ्याच वेळा परिसरातल्या कित्येक जोडय़ांची समूहात घरटी बनवली जातात. त्यामुळे शत्रूंपासून रक्षण मिळते. घरटे बनवण्यात नराचे योगदान मोठे असते. घरटय़ात वापरण्यात आलेले साहित्य हे परिसरातलेच असल्याने घरटे सहज दिसत नाही आणि पाण्याच्या काठय़ावर असल्याने लक्षसुद्धा जात नाही. घरटय़ाचे साहित्य आणणे, खड्डा करणे, सफाई करणे असे सगळे काम नर करतात. घरटय़ाचे काम चालू असताना मादी चरण्यात मशगूल असते. अंडी घालतानासुद्धा मादीपेक्षा नरच अधिक वेळ घरटय़ात असतो. अंडी घालण्यासाठी अत्यधिक ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणूनच आवश्यक पोषक खाद्य मिळवण्यासाठी मादी नरापेक्षा जास्त वेळ चरण्यात घालवते. या वेळी मादीला दुसरे नर आकर्षित  करून जोडी जमवायचा प्रयत्न करतात. क्वचित प्रसंगीच अशी अधिक जोडी जमते. परंतु नेहमी मादी अशा नरांना आपल्या घरटय़ाच्या हद्दीतून हुसकावून लावते. त्यांच्यावर जोरदार आक्रमणसुद्धा करते आणि आपल्या खऱ्या जोडीदाराशी प्रामाणिक राहते.
पिल्ले जगावी आणि वाढावी यासाठी जोडीदाराचे योगदान महत्त्वाचे ठरते. असे हे शेकाटे एकसाथीव्रता आहेत. तरीसुद्धा घुसखोर नर मादीला आकर्षति करण्यासाठी हद्दीत येऊन प्रदर्शन करून जोडी जमवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडून पुरेसा विरोध होत नाही असे समजल्यास मादी आपल्या जोडीदाराला आवाज देते. घरटय़ात बसलेला नर लागलीच त्या घुसखोर नरावर चालून जातो आणि त्याला हद्दपार करतो.
घरटय़ात एक अंडे घातल्यानंतर काही कालावधीनंतर दुसरे असे करत शेकाटे मादी सामान्यत: ४ तर कधी ३ आणि प्रसंगी ५ अंडी घालते. अगदी टिटवीची अंडी असतात अशाच रंगाची अंडी शेकाटय़ांचीसुद्धा असतात. मातकट रंगाची आणि त्यावर गडद काळे ठिपके असतात. अंडी घरटय़ात तसेच परिसरात एकदम मिसळून जातात.
नर-मादी दोघंही मिळून अंडी उबवतात. आता मात्र नरापेक्षा मादी अंडी उबवण्यासाठी जास्त वेळ देते. असे दोघांचेही योगदान सारखेच असते. साधारण २५ ते २६ दिवसांच्या उबवणी काळानंतर अंडय़ातून पिल्ले बाहेर येतात. दरम्यान शेकाटय़ाचे शत्रू म्हणजे मुंगूस, भटकी कुत्री जवळ आल्यास हे घरटय़ातून गुपचूप उठून दूर चालायला लागतात. काही मीटर अंतरावर पोचल्यावर पंख तुटल्यासारखे चालत जातात. याला ‘ध्यानभंग प्रदर्शन’ म्हणतात. असे करून शिकारीचे लक्ष ते स्वतकडे वेधून घेतात. आपला एक पंख मोडला आहे असे दाखवत शिकारीला घरटय़ापासून दूर भटकवले की अचानक उडायला लागतात. दोघेही आई-बाबा शेकाटे उंच उडता उडता त्यांच्यावर हल्ला करतात. आकांत ओरडतात. शत्रूला सळो की पळो करून सोडतात. असे आपल्या घरटय़ाचे आणि पिल्लांचे रक्षण करतात.
आम्हीसुद्धा अजाणता त्याच्या घरटय़ाच्या परिसीमेत दाखल झालो होतो. एवढय़ात उजव्या बाजूला लक्ष गेले. एक छोटे मातकट रंगाचे लांब पाय असलेले पिल्लू डबक्याच्या दुसऱ्या काठय़ाला जाऊन चरायला लागले. वरून शेकाटे आई-बाबा त्यांना वेगवेगळे आवाजात सूचना देत होते. या आवाजांमधला फरक आपल्याला समजणे कठीणच! इतक्यात माझ्या डाव्या altबाजूला आणखी एक पिल्लू चरत आले. त्याला काही काळजी नाही की भय नाही. मस्त चरण्यात मग्न होते. खरी पिल्लेअगदी निष्पाप असतात. त्यांना शत्रुभय नसतेच!
पाण्यात शिरलेल्या जमिनीच्या त्रिकोणाकार काठावर समोर आणखी एक पिल्लू चरत होते. थोडे लक्षपूर्वक बघितले तर एक नव्हे तर दोन पिल्ले होती समोर. त्यातले एक दबकून बसले होते. पिल्लाच्या अंगावर मातकट रंगाची पिसे आणि काही काळसर पिसेसुद्धा होती. शेपूट प्रमाणात थोडी लांब होती. इथेच शेकाटय़ाचे घरटे होते. मातकट रंगाची वाळू होती. हे पिल्लू बहुधा सगळ्यात शेवटी अंडय़ातून बाहेर आले होते. चारही पिल्ले इतकी गोंडस दिसत होती की, त्यांना हातावर घेऊन मस्त गोंजारावे असेच वाटत होते, पण तसे आम्ही काही केले नाही आणि करणारही नाही. निसर्गाचा नियम मोडायचा नाही. या पिल्लांपासूनसुद्धा आम्ही योग्य अंतर ठेवलेच होते. वरून आई-बाबा आमच्यावर ओरडत जात होते. मग पिल्लांना काही वेगळ्या आवाजात काय खुणावले काय माहीत? समोरच्या दोन मधले एक पिल्लू पाण्यात उतरले. चालत थोडे पुढे गेल्यावर खोल पाण्यात आई किंवा बाबा उतरले तिथपर्यंत मस्त पोहत गेले.
शेकाटय़ांच्या पिल्लांना भरवावे लागत नाही. अंडय़ातून बाहेर आल्या-आल्या स्वत चरायला लागतात. त्यांना चांगले पोहता येते. पण ते मोठे होईपर्यंत आई-बाबा शत्रूंपासून त्यांचे रक्षण करतात आणि खाद्य शोधण्यात मार्गदर्शन करतात. परत काही वेगळे निर्देश मिळाले म्हणून दबकून बसल्यामुळे परिसराशी एकरूप झालेले पिल्लू उठून  सरळ पाण्यात दूर निघून गेले. आत्ता माझ्याजवळचे पिल्लू राहिले होते.
 माझ्या कॅमेऱ्याची लांब लेन्स शेकाटय़ांना बहुतेक बंदूकच वाटत असावी. मी त्याचे फोटो काढायला लागलो तेव्हा वरून एक शेकाटय़ा खाली उतरला. त्याने आपले लांब पाय मुडपून जमिनीवर बसून पिल्लाला आपल्या पंखांखाली लपवून घेतले. अगदी आई आपल्या बाळाला पदरात किंवा कुशीत घेते तसेच!
मला पिल्लू दिसेनाच, फक्त लांब काटकुळे पाय दिसत होते! हे अजबच होते. मी प्रथमच पक्ष्यांमधले असे वात्सल्य बघितले होते. नक्की ही शेकाटे पिल्लांची आई असावी. माझ्या पिल्लांना कुणाची दृष्ट लागू नये असाच काही आविर्भाव होता त्या आईचा. ते पिल्लूसुद्धा आईच्या कुशीत असे काही निश्चित लपले की शब्दात वर्णन करणे शक्य नाही.  एकाच वेळी चारही पिल्लांचे संगोपन करणे इतके सोपे नाही. पिल्लेसुद्धा आई-बाबाच्या आज्ञांचे तंतोतंत पालन करतात. बसण्याचा सिग्नल दिला की बसणार आणि ‘सब ठीक’चा असा संकेत दिला की परत नििश्चत होऊन चरण्यात मग्न होणार. सर्व पिल्लांचे सुरक्षेसाठी सदैव तत्पर शेकाटे आई-बाबांचे कौतुक करावे तितके थोडेच. नव्या जीवनाला आणि नव्या पिढीला जन्म देणाऱ्या आईला महत्त्व अपरंपार आहे. उगाच नाही म्हणत, ‘तिन्ही जगांचा स्वामी आई विना भिकारी’!
उमेश वाघेला , शनिवार , १० सप्टेंबर २०११,लोकसत्ता
swastishreehobbies@gmail.com 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...