चित्त्याच्या सहवासात

सविता हरकारे,लोकमत (14/8/2011)

''नामिबियात पाऊल ठेवल्यापासूनच चित्त्याला भेटण्याची प्रचंड उत्सुकता होती. मन आतुर झालं होतं. जगभरात आकर्षण असलेल्या या देखण्या वन्यजिवाला केव्हा डोळे भरून बघतो, असं झालं होतं. तब्बल 12 दिवसांनी अखेर तो क्षण आलाच.. चित्ता माङया पुढय़ात होता.. मला ‘हॅलो’ करण्यासाठी, माङयाशी ओळख करून घेण्यासाठी. टाऊनी रंग, भरजरी साडीवरील बुट्टय़ांप्रमाणे अंगावर काळे ठिपके, लांब पाय, छोटासा चेहरा, स्प्रींगसारखा दिसणारा पाठीचा कणा. एखाद्या सौंदर्यवतीलाही लाजवेल असे ते सौंदर्य होते. नंतरच्या काही दिवसांत चित्त्याशी अनेक भेटी झाल्या आणि मग त्याच्याशी दोस्ती व्हायला वेळ लागला नाही.''

नागपूर जिल्ह्यातील उमरेडच्या वन्यजीव तज्ज्ञ आणि वन्यजीव संवर्धन व ग्रामीण विकास संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रज्ञा गिरडकर चित्त्याच्या सहवासातील त्यांचे एकेकअनुभव सांगत असताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. प्रज्ञाताईंसाठीही त्यांच्या आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव होता. यापूर्वी भारतातील विविध जंगलांमध्ये वन्यजिवांचा अभ्यास करीत असताना वाघ, बिबटय़ा आदि प्राण्यांचा सहवास त्यांना लाभला होता; परंतु चित्त्याला जाणून घेतानाचा हा अनुभव खऱ्या अर्थानं धाडसी होता. विशेष म्हणजे पुढील काही महिन्यांतच या देखण्या आणि डौलदार प्राण्याचे भारतात पुनरागमन होणार असल्याने त्याचा स्वभाव, आरोग्य, राहणीमान, अधिवास याबद्दल सखोल अभ्यास करण्याची त्यांची इच्छा होती. दक्षिण आफ्रिकेतील नामिबियाच्या एक महिन्याच्या दौ:यात ती पूर्ण झाली.
चित्ता संवर्धन फंडतर्फे आयोजित महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी डॉ. प्रज्ञा गिरडकर यांची निवड झाली होती. विविध देशांमधून आलेल्या 28 प्रतिनिधींमध्ये भारतातून सहभागी होणा:या त्या एकमेव होत्या. या प्रशिक्षणासाठी अमेरिकेच्या हॉवर्ड येथील अॅण्डोस्मिथसोनी इन्स्टिटय़ूशनची फेलोशिप त्यांना मिळाली होती. 
5 जून ते 3 जुलै या महिनाभराच्या कालावधीत चित्ता संवर्धन प्रशिक्षणासोबतच दक्षिण आफ्रिकेतील लोकजीवन आणि विशेषत: आदिवासींबद्दल प्रज्ञाताईंना खूप काही जाणून घेता आले. सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय वन्यजीव तज्ज्ञ आणि चित्ता संवर्धन फंडच्या संचालक लॉरी मार्कर यांच्याकडून शिकण्याची संधी त्यांना मिळाली. भारतात चित्त्याच्या 18 जोडय़ा येतील, तेव्हा लॉरी मार्करही त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यांचे रोमांचकारी अनुभव ऐकल्यानंतर कोणालाही चित्त्याच्या विश्वात जाण्याची इच्छा व्हावी. 
पहिले दोन दिवस नामिबियाची राजधानी विंडूक येथील परिषदेत अमेरिका, इराण आणि दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर ख:या अर्थाने प्रवेश झाला चित्त्यांच्या जगात. उजी व्ॉरंगोपासून 45 किलोमीटरवरील एका जंगलात 1700 चौरस किलोमीटर परिसरात 52 चित्ते वास्तव्याला आहेत. त्यांच्या जेवणासाठी ऑरिक्स, कुडूस्प्रिंग, बॉक, स्टीनवॉक आदि हरणाचे प्रकार, ङोब्रा, गाढवांसह बरेच काही.
स्मॉल कॅट फॅमिलीतील चित्ता हा वाघ-सिंहासारखा ‘रफ अॅण्ड टफ’ नाही. अत्यंत नजाकतदार आणि देखण्या असलेल्या चित्त्याचा स्वभावही वाघ-सिंहांसारखा तापट नाही. शांत आणि ‘सामाजिक’ स्वभाव हे त्याचं वैशिष्टय़. त्यामुळेच एकटं राहण्यापेक्षा गटात, मिळूनमिसळून राहणं तो अधिक पसंत करतो. 
‘चित्ता रन’ हा प्रकारही अत्यंत अनोखा. रॅम्पवर कॅटवॉक करणा:या सुंदर ललनांपेक्षाही चित्त्याचे ते धावणे अधिक डौलदार. जगातील सर्वात वेगवान प्राण्यासोबत धावणे तर अशक्यप्राय गोष्ट; पण हा अनुभवही प्रज्ञाताईंनी घेतला. धावत असताना थकल्यानंतर थांबताच चित्ताही मागे वळून त्यांच्यासाठी थांबला, तेव्हा त्याचा हा शिष्टाचार बघून प्रज्ञाताईंना फार गंमत वाटली. 
‘हवेत अक्षरश: तरंगत जाणा:या चित्त्याची आणि माझी पहिल्यांदा समोरासमोर नजरानजर झाल्यानंतर माङयाकडे बघून तो गुरगुरला. मी पण न घाबरता त्याला गोंजारलं, तेव्हा त्यानं टिपिकल पूरùùù असा आवाज काढून माङया प्रेमाचा स्वीकार केला.’ चित्त्याचे एकेक किस्से सांगताना प्रज्ञाताई स्वत:तच हरवून आणि हरखून जातात. त्यांची चित्त्याशी आता चांगलीच गट्टी झाली आहे. हे चित्ते भारतात घेतील तेव्हा त्यांच्या संवर्धनात आपलाही वाटा असावा, अशी त्यांची इच्छा आहे. 
भारतात चित्त्यांचे संवर्धन हे एक मोठे आव्हान असणार आहे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून येणा:या या देखण्या वन्यजिवासाठी 500,000 डॉलर्स एवढी तरतूद करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील कुणो-पालपूर आणि नौरादेही अभयारण्य, तसेच राजस्थानच्या जैसलमेरजवळील शाहगड वाळवंटात त्यांचा अधिवास असणार आहे. चित्त्याला भारत नवीन नसल्याने तो येथे चांगल्या प्रकारे रुळेल, वाढेल अशी आशा प्रज्ञाताईंना आहे. परंतु, त्याच्या संवर्धनासाठी चांगल्या दर्जाच्या उपाययोजना करण्याची गरजही त्या अधोरेखित करतात.

 savitaharkare@lokmat.com

1 Comment:

Anonymous said...

भारतात चित्त्याचे पुनर्वसन करण्यासाठी आशियाई चित्ता सोडून आफ्रिकी चित्त्याची निवड करण्याचे कारण काय?

Related Posts Plugin for WordPress, Blogger...