समुद्रातील तेलतवंगाचा मोठा परिणाम खारफुटी आणि माशांच्या प्रजोत्पादनावर

विकास महाडिक
नवी मुंबई, ८ ऑगस्ट,लोकसत्ता
मुंबईलगतच्या समुद्रात चार दिवसांपूर्वी बुडलेल्या एमव्ही रॅक या जहाजातून झालेल्या तेलगळतीचे परिणाम रविवारपासून मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर दिसू लागले असून यानंतर ही लाट ठाणे खाडीकिनाऱ्यालगत असणाऱ्या खारफुटी व तिच्या सान्निध्यात होणाऱ्या माशांच्या प्रजोत्पादनावर आदळणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या ‘दी एनर्जी रिसोर्स इन्स्टिटय़ूट (टेरी)’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी ही बाब अधिक गांभीर्याने स्पष्ट केली आहे. जहाजातील तेलगळती सुरूझाल्यानंतर ७२ तासाने तेलतवंग मुंबईच्या समुद्रावर येऊन ठेपला. त्यानंतर ७२ तासाने हा तरंग ठाणे खाडीकिनाऱ्यावरही येण्याची शक्यता आहे, असे प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबईपासून २० सागरी मैल अंतरावर चार ऑगस्टला ‘एमव्हीके आरएके’ हे २२५ मीटर लांबीचे जहाज बुडाले. त्यात इंडोनेशियामधून आयात केला जात असलेला ६० हजार टन कोळसा आणि २५० टन खनिज तेल व ५० टन डिझेल होते. या सर्व खनिज व इंधनाला जहाजाबरोबर जलसमाधी लाभली आहे. कोळसा समुद्राच्या तळाशी गेला असला तरी खनिज व तेल जहाज बुडाल्यानंतर किनाऱ्यावर जात आहे. हा तवंग अल्प असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र इतर वेळी झालेली तेळगळती आणि या वेळच्या तेळगळतीमध्ये फरक असल्याचे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे किनाऱ्यावर लाटा आदळण्याचे प्रमाण जास्त असल्याने तेलतवंग किनाऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहे. चार दिवसांपूर्वी बुडालेल्या जहाजावरील तेल जुहूच्या किनाऱ्यावर रविवारी आले. त्याला ७२ तास लागले. त्यानंतर हा तेलतवंग दिशा बदलून ठाण्यातील खाडीकिनाऱ्यावरही पोहोचू शकतो, अशी शक्यता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक विभागाचे अधिकारी व्ही. बी. क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
काही महिन्यांपूर्वी उरणच्या समुद्रात अशी तेळगळती झाली होती. त्या वेळी प्रदूषण मंडळाने पूर्णपणे काळजी घेतली होती. तेलतवंग झिरपण्यासाठी खाडीकिनाऱ्यावर हजारो गोणपाट टाकण्यात आले होते. हा तवंग खारफुटीच्या मुळाशी जाऊन बसू नये, अशी त्यामागे उपाययोजना होती, असे क्षीरसागर यांनी सांगितले. मुंबईतील तेलतवंग अद्याप ठाणे खाडीकिनाऱ्यावर आलेला नाही पण ७२ तासाने तो येऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आम्ही वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासत आहोत. या तेलतवंगाचा खरा त्रास हा खारफुटीच्या झाडांना होत असल्याचे ते म्हणाले.
समुद्रातील ही तेलगळती ऑगस्ट महिन्यात झाली आहे ही सर्वात वाईट घटना आहे. या काळात माशांचा प्रजोत्पादन काळ सुरू होता. खाडीकिनारी, खारफुटीच्या जंगलात ही नवीन पैदास सुरू असल्याने या तेलतवंगाचा मोठा धोका या माशांना आहे. ही उत्पत्ती खूप नाजूक असल्याने तेलतवंगाचा थोडाही अंश या निर्मितीच्या नाशास कारणीभूत ठरतो. आपल्या पूर्वजांनीही या काळात मासेमारी करू नये असे संकेत दिले आहेत. मासे या काळात मोठय़ा प्रमाणात प्रजोत्पादन करीत असल्याने तेलतवंग समुद्रात पसरल्याच्या दु:खापेक्षा मासे मरतील याचे दु:ख जास्त आहे. त्यांच्या या प्रजोत्पादनावर या तेलतवंगाचा मोठा परिणाम होणार आहे, असे मत टेरी या संस्थेच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख डॉ. अंजनी पारनीस यांनी व्यक्त केले. अशा घटनांनी समुद्रसंपत्तीचा मोठा नाश होत असून यात पक्षी, प्राणी यांचा नाहक जीव जात आहे, असे डॉ. पारसनीस यांनी सांगितले.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...