हिमालयातील पुष्पोत्सव

प्रा. प्र. के. घाणेकर - बुधवार, १० ऑगस्ट २०११,लोकसत्ता
altदरवर्षी ऑगस्टच्या मध्यावर गढवाल, हिमालयात खूप उंचावर एक निसर्गनवल अवतरतं!  ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ या नावानं त्या ठिकाणाची जगभर ओळख आहे. इथं आढळणारी रानफुलांची अफाट संख्या आणि पुष्पवैविध्य अफलातून आहे. याची भूल पडत दरवर्षी या काळात जगभरातील निसर्गप्रेमी, वनस्पती अभ्यासक, प्रकाशचित्रकार आणि हौशी, साहसी पर्यटक या पुष्पदरीची वाट चालू पडतात.
इथं जायचं तर दिल्लीमार्गे हरिद्वार-हृषीकेश-देवप्रयाग-रुद्रप्रयाग असा प्रवास करत जोशीमठ इथं दाखल व्हावं लागतं. जोशीमठचा मुक्काम आटोपून बद्रिनाथच्या दिशेनं जाऊ लागलं की येतो लक्ष्मणप्रयाग! आता हीच जागा गोविंदघाट या नावानं ओळखली जाते. जोशीमठ ते गोविंदघाट हा अवघा २० किलोमीटरचा प्रवास. गोविंदघाटची उंची आहे १८२८ मीटर! नदीवरचा  पूल ओलांडून ५-७ तासांच्या डोंगरचढणीच्या वाटेत ३ किलोमीटरवर पुलना (१९२० मी.), पुढे ७ किलोमीटरवर भ्युंडर (२२३९ मी.) आणि त्यापुढे ५ किलोमीटरवर घांगरिया (३०४८ मी.) अशी ठिकाणं लागतात.
altइको डेव्हलपमेंट कमिटीनं केलेलं पर्यावरण सुधारणा आणि निसर्गरक्षणाचं कार्य वाटेत सर्वत्र नजरेस पडत असतं. घांगरिया इथल्या मुक्कामानंतर एक दिवस पुष्पदरी आणि एक दिवस हेमकुंड म्हणजे लोकपाल किंवा लक्ष्मणतलाव, असे प्रत्येकी ५ किलोमीटरचे पण खडय़ा चढणीच्या रस्त्याचे पदभ्रमण करायचे. असा किमान कार्यक्रम करायलाच हवा. हिमधवल डोंगरशिखरं, अती उंचीवरची बुग्याल म्हणजे कुरणं, मुलायम उन्हात दिसणारी फुलांची दुनिया, यात आपण हरवून  जातो. पांढरी- गुलाबी-पिवळी-निळी-जांभळी अशी विविधरंगी फुलांची दुनिया भान हरपायला लावते. या साऱ्या फुलांची शास्त्रीय नावं लक्षात ठेवायलाच  हवी, असं मात्र नाही. पण या स्वर्गोद्यानातील  हे फुलांचे ताटवे म्हणजे विधात्याची स्वच्छंद लीलाच आहे.
पुराणकथांमध्ये वर्णिलेली ही जागा, तिचा फ्रँक स्माईद यानं जगाला करून  दिलेला परिचय, जोन मार्गारेट लेग्गीचं पुष्पसंशोधनासाठी आगमन अन् दुर्दैवी अपघाती निधन, इथलं नाजूक पर्यावरण अशा यासाऱ्याबद्दल आपल्याबरोबर येणारे मार्गदर्शक वाटाडे समरसून बोलत असतात. हे ऐकत ही अतीउंचीवरची रानफुलांची अद्भुत पुष्पदरी पाहून घांगरियात परत यायचं. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून नागमोडी खडय़ा चढणीवरून चढत गेलं की अतीउंचीवरचा लक्ष्मण तलाव लागतो. सध्या यालाच हेमकुंड म्हणतात. इथला गुरुद्वारा, तिथली अप्रतिम चवीची गरमागरम मुगाची खिचडी अन् वाफाळता चहा घेऊन मग इथली नीलम म्हणजे ब्ल्यू पॉपी, ब्रह्मकमळ, बिस्टोर्टाचे गुलाबी-लाल तुऱ्यांचे गालिचे, फताडय़ा पानांमधून बाहेर उंचावलेले ऱ्हीयमचे तुरे याबरोबरच फारच क्वचित दिसणारी फेनकमळं आणि हेमकमळं पाहताना जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. इथं येणाऱ्या लक्षावधी  शीख भाविकांबरोबरच  सर्वाची सोय करणारे गुरुद्वारा- तिथला सेवाभाव नि विनम्रपणा यांचीही भूल पडते.
ज्योत्स्ना सितलिंग या आय.ए.एस. अधिकारी महिलेनं या निसर्गनवलाची जपणूक आदर्शवत केली आहे. इथले स्थानिक तज्ज्ञ वाटाडे प्रत्येक वनस्पतीची साद्यंत माहिती सांगण्यास उत्सुक असतात.
आता  परतीच्या मार्गावर बद्रिनाथ- माना अस्म एक दिवस आणि जोशीमठ ते औली ही कित्येक किलोमीटरची दोरवाट (रोप-वे) अशी आकर्षणंवाट पाहात असतात. अधिक दिवस हाताशी असेल तर वसुधाराचा धबधबाही पाहता येतो. औलीला आणखी काही वेगळी फुलं पाहायला मिळतात.
परतीच्या वाटेवर खळाळत येणारी पांढऱ्या रंगाच्या जलप्रवाहाची अलकनंदा आणि संथ निळसर प्रवाहाची मंदाकिनी यांचा रुद्रप्रयागचा संगम अद्वितीय आहे. तिथं मिळणारं लाल बुरांस म्हणजे- होडोडेंड्रॉनच्या पाकळ्यांचं चविष्ट सरबत चाखायलाच हवं. हा साराच प्रदेश सुरंगी- सुपुष्पी वनस्पतींनी सुदर्शन  झालेला असतो. आयुष्यात एकदा तरी या भूतलावरील अलौकिक स्वर्गोत्सवाचं डोळे भरून दर्शन घ्यायलाच हवं. आकार- रंग- ठेवण यातील फुलांची विविधता डोळ्यांचं पारणं फेडते. वाटेत दिसणारी नेची, भांगेची झाडं, बिचूका पौधा आणि त्यावरचा उतारा  ठरणारी रुमेक्स, सूचिपर्णी वृक्ष यांची आठवण  मनात राहते.
ठिसूळ हिमालयात ठिकठिकाणी होणारी भूस्खलनं म्हणजे लँडस्लाईड्स, अधूनमधून संगतसोबत करणारा पाऊस यांचाही अनुभव कायम मनात ठसतो. सर्वानी हा निसर्गानुभव घ्यायलाच हवा. निघा मग, उंच उंच हिमालयातील पुष्पप्रदेशाच्या भेटीला. त्यासाठी तुम्हाला लक्ष लक्ष  शुभेच्छा!

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...