प्राचीन सागवानाने साकारला दुष्काळाचा ५०० वर्षांचा इतिहास!

एल-निनोशी दुष्काळाचा जुना संबंध असल्याचे स्पष्ट
अभिजित घोरपडे , लोकसत्ता


altएल-निनो आणि भारतात पडणारे दुष्काळ यांच्यातील दृढ नाते आताप्रमाणेच गेल्या ५०० वर्षांपासून कायम होते, असे पुरावे मिळाले आहेत. विशेष म्हणजे हे पुरावे सांगितले आहेत- केरळमधील सागवानाच्या प्राचीन वृक्षांनी! पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) पथकाने सागवानाच्या वृक्षवलयांचे ७० हून अधिक नमुने तपासून ही बाब उघडकीस आणली आहे, त्याबाबतचे निष्कर्ष विज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्धही झाले आहेत.कोणत्याही झाडाची वाढ होताना त्याच्या खोडावर वर्तुळे निर्माण होतात आणि खोडाची जाडी वाढत राहते. काही विशिष्ट झाडांमध्ये ही वर्तुळे दरवर्षी निर्माण होत असल्याने त्यांचा अभ्यास करून प्राचीन हवामानाची माहिती मिळविली जाते. पुरेसा पाऊस व अनुकूल हवामान असेल तर त्यांची वाढ चांगली होते आणि तशी परिस्थिती नसेल तर खोडाची पुरेशी वाढ होत नाही. हे बदल मुख्यत: थंड हवामानाच्या प्रदेशातील झाडांमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात. त्यामुळेच युरोपात प्राचीन हवामानाच्या चांगल्या नोंदी मिळतात. पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात मोजक्याच झाडांमध्ये हवामानातील बदल पाहायला मिळतो. त्यापैकी एक म्हणजे सागवान! दक्षिण भारतात, विशेषत: केरळमध्ये सागवानाची खूप प्राचीन झाडे अस्तित्वात आहेत. काहींचे वय पाचशे वर्षांपेक्षाही जास्त आहे. त्यांच्यामध्ये या सर्व काळातील हवामानाचा इतिहास नोंदवला गेला आहे. त्याचा अभ्यास करून विशेषत: मोसमी पावसाची माहिती चांगल्याप्रकारे मिळते. हेच आयआयटीएमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बोरगावकर यांच्या पथकाने केले. याबाबतचे निष्कर्ष ‘पॅलिओ-थ्री’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.‘एल-निनो’ या हवामानाच्या घटकाचा मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम होतो आणि तो सक्रिय असल्याच्या वर्षी दुष्काळाची शक्यता वाढते, ही बाब आता माहिती झालेली आहे. पण एल-निनो व दुष्काळ यांच्यातील नाते कायमस्वरूपी घट्ट असेलच असे नाही. त्यात काळानुसार बदलण्याची शक्यता असते. काही हवामानतज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, अलीकडच्या काळात हे नाते तितके घट्ट राहिलेले नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच ५०० वर्षांच्या काळात याबाबत नेमकी काय स्थिती होती, याचा अभ्यास आयआयटीएमकडून करण्यात आला. त्यांनी केरळच्या पर्वतीय प्रदेशातील सागवानाच्या प्राचीन झाडांचे ७० नमुने गोळा केले. त्याचा काळ तब्बल सव्वापाचशे वर्षांइतका मागे जातो. त्याचा अभ्यास केल्यावर, गेल्या ५०० वर्षांमध्ये कोणत्या कालखंडात पावसाचे प्रमाण कमी होते व कोणती वर्षे दुष्काळी होती, याचा तपशीलवार इतिहास माहीत झाला. त्याचप्रमाणे गेल्या साडेपाचशे-सहाशे वर्षांपासूनचा ‘एल-निनो’ सक्रिय असलेल्या वर्षांचा इतिहास उपलब्ध आहे. या दोन्ही गोष्टी ताडून पाहिल्यावर असे लक्षात आले आहे की, गेल्या पाचशे वर्षांपासून दुष्काळ आणि ‘एल-निनो’ यांचा अगदी जवळचा संबंध होता. अशा प्रकारे प्राचीन सागवान हवामानाचा इतिहास उलगडण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...