वन्यजीव संवर्धन अन् कृतिशीलता!

धर्मराज पाटील ,गुरुवार, ४ ऑगस्ट २०११, लोकसत्ता dharmarajraptor@gmail.com  
altताडोबा-कान्हासारख्या जंगलांमध्येच वन्यजीवन आढळते हा सर्वसामान्य गैरसमज. छोटय़ा किडय़ापासून ते वाघापर्यंत, गवताच्या पात्यापासून ते अजस्त्र वड-पिंपळापर्यंत सर्वच वन्यजीवनाचा अविभाज्य घटक आहेत. छोटे किडे-फुलपाखरं, पक्षी, साप, खारीसारखे छोटे सस्तन प्राणी आपल्या आसपासही आहेतच की ! त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी कोणाची?
वन्यजीव छायाचित्रणाच्या हव्यासापायी पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाल्याची बातमी नुकतीच सर्वत्र झळकली. ती वाचून कोणाही संवेदनक्षम व्यक्तीचं मन विषण्ण होणं स्वाभाविक आहे. वन्यजीवांना इतर निर्जीव वस्तूंप्रमाणेच छायाचित्रणाचा एक ‘ऑब्जेक्ट’ समजणं हे सर्वथा चुकीचे आहे. किंबहुना तो एक गुन्हाच ठरतो. त्यानिमित्ताने निराळ्याच विषयाला तोंड फुटले. इथे, पक्ष्यांच्या घरटय़ांना हानी पोहोचवणारी कृती निषेधार्ह आहे. पण त्या व इतर पक्ष्या-प्राण्यांची एकंदरच स्थिती काय आहे आणि याबाबत संवेदनक्षम नागरिक आपण कृतिशील पाऊल कधी उचलणार, हा मुद्दा महत्त्वाचा आहे.
नवरंग (Indian Pitta), स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher), सारस (Sarm Crane) याबाबत घडलेल्या घटना पहिल्यांदाच झाल्या आहेत का? किंवा पुढे घडणार नाहीत का? इथे संवेदनक्षम आणि कृतिशील नागरिकांचे भविष्यातील पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे, वन-वन्यजीवन-पर्यावरण ही कोणा एका गटाची मक्तेदारी अथवा जबाबदारीही नाही. मानवी अस्तित्व टिकवण्याची जबाबदारीही सर्वावर समान येते. विशेषत: जागतिक व देशस्तरावरही विकासाची दिशा अशाश्वततेकडे झुकणारी आहे, त्या वेळी सामान्य माणसाचीच जबाबदारी वाढते. इतिहास साक्षी आहे, अशा अंध विकासाची दिशा बदलण्याची ताकद ही सामान्यजनांतून निर्माण होते. वन्यजीवन संरक्षण संवर्धनासंदर्भातही ते तंतोतंत लागू पडते.
वन्यजीवनाच्या व्याख्येमध्येच बऱ्याचदा गल्लत दिसून येते. ताडोबा-कान्हासारख्या जंगलांमध्येच वन्यजीवन आढळते हा एक सर्वसामान्य गैरसमज. छोटय़ा किडय़ापासून ते वाघापर्यंत, एका गवताच्या पात्यापासून ते अजस्त्र अशा वड-पिंपळापर्यंत सर्वच वन्यजीवनाचा अविभाज्य घटक आहेत. छोटे किडे-फुलपाखरं, पक्षी, साप, खारीसारखे छोटे सस्तन प्राणी आपल्या आसपासही आहेतच की! त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी कोणाची? आपल्या अंगणा-परसात वन्यजीवनाची ही साखळी कार्यरत आहे. पण त्याची अवस्था ‘घर की मुर्गी दाल बराबर’ अशीच म्हणावी लागेल! अशा वन्यजीवनाचा अधिवास(
habitat) टिकवून त्याचे संवर्धन करणे हे जंगलात वाघ-हरिण वाचवण्याइतकंच महत्त्वाचं आणि गरजेचंही आहे. दुर्दैवाने आपण अशा वन्यजीवनाकडे दुर्लक्ष करून हिमालय, अ‍ॅमेझॉन, सव्हाना अशा प्रदेशातील वन्यजीवनाच्या दूरावस्थेवर चर्चा करण्यात जास्त रस घेतो. ज्यांना या आसपासच्या वन्यजीवनाबद्दल जाणीव आहे, त्यातील बव्हंशी त्याच्या संवर्धनासाठी पाऊल न उचलता एखाद्याच्या कृष्णकृत्यावर बोट ठेवून स्वत:च्या अकर्तृत्वावर पडदा टाकतात. हे जाणूनबुजून होते असे नाही तर तो आजच्या आधुनिक युगाचा स्वाभाविक भाग बनला आहे. पण हे आता बदलावेच लागेल नाही तर आपण सर्वच पुढील पिढय़ांचे गुन्हेगार ठरू.
उदाहरणादाखल कोणतेही एक विकसनशील शहर घ्या. काही वर्षांपूर्वी जिथे सुंदर पानथळ जागा, खुरटी झुडपं असलेल्या मोकळ्या जागा, गवताळ व झुडपी टेकडय़ा होत्या, त्या विकासाच्या रेटय़ात नाहीशा होत आहेत. पक्ष्यांची घरटी ज्या खुरटय़ा झुडपांवर असायची, ती संपूर्णच नष्ट होत चालली. जेथे मोठय़ा झाडांची तोड झाल्यावर विरोध होतो तेथे अशा छोटय़ा झुडपांना मात्र दुर्लक्षित केले गेले. परिणाम असा झाला की, छोटे पक्षी जसे, राखी वटवटे, शिंपी, टिट, चिमण्या, चिरक, नाचण, शिंजीर अशांसाठीची घरटी व राहण्याच्या जागाच नष्ट होत गेल्या. पक्ष्या-प्राण्यांबद्दलची सहानुभूती त्याही वेळी होती, आजही आहे. पण त्याचा कृतिशील परिणाम कुठे आहे? पक्षिनिरीक्षकांचा भरणा असलेल्या शहरांमध्येही जर तो दिसत नसेल तर वन्यजीवनाचे भवितव्य अंधारमय न राहील तरच नवल! मग वन्यजीवांबद्दल सहानुभूतीपूर्ण चर्चाच नकोत का?.. त्या हव्यातच पण त्याचा आवाका आणि परिणाम ‘ई-ग्रुप’च्या बाहेरही दिसायला हवा. तशी क्षमता चर्चा करण्यांमध्ये नक्कीच आहे, फक्त तसा कृती उपक्रम राबविण्याची गरज आहे. असे उपक्रम नव्याने आखण्याचीही गरज नाही. तसे उपक्रम हाती घेतलेल्या व्यक्ती-गटांबरोबर स्वत:ला जोडून घेण्यातही बरेचसे साध्य होईल, पण त्यातही प्रत्यक्ष जागेवरील कृतीत सहभाग महत्त्वाचा! आपल्या अंगण-परसातील कोळी, किडे, फुलपाखरं, पक्षी, बेडूक, साप, खार यांना वाचवण्याची जबाबदारी मात्र वैयक्तिक आपणावरच आहे.
बेधुंद विकासाचे आराखडे शहरात फक्त माणूस राहतो हे गृहीत धरून चालत आहेत. मग स्वाभाविकपणे इतर वन्यजीवांचा अधिवास नष्ट केला जात आहे. मोकळ्या गवताळ-खुरटय़ा झुडपांच्या जागांवर इमारती उभ्या राहात आहेत आणि काही हिरव्या टेकडय़ा-पाणथळी ‘जैवविविधतेच्या जागां’च्या नावाखाली टिकवली जात आहेत. परंतु, अशा हिरव्या विविधतापूर्ण ठिकाणांना जोडणारे दुवे मोकळ्या जागा व अंगणा-परसातील झुडपं नष्ट केली जात आहेत. याने काय होईल? असलेल्या जिवांचा इतर ठिकाणच्या जिवांशी संपर्क येणार नाही आणि संपूर्ण शहरासाठीचा वन्यजीवांचा जनुकीय बांध कमजोर होत जाऊन काही दशकांनंतर आजच्या विविधतासंपन्न जागा एखाद्या प्राणिसंग्रहालयासारख्या बनून राहतील. हे टाळायचे असेल तर अधिवास आणि वन्यजीवन संवर्धनाची व्यक्तिगत जबाबदारी प्रत्येकाला उचलावीच लागेल. शहरविकासामध्ये इमारती उभारणे गरजेचे असले, तरी शहराची विविधता टिकून राहण्याइतपत हिरव्या जागा आणि हिरवे दुवे हे वन्यजीवनासाठी संरक्षित ठेवावेच लागतील.
संवर्धन हा तसा जड शब्द वाटला तरी तो अमलात आणणे फारसे कठीण नाही. परंपरेमध्येच त्याची बीजं आहेत. निरनिराळे सण आणि उत्सव संवर्धनाशीच निगडित आहेत. संवर्धन उपक्रमाची सुरुवात ही स्वत:पासून करावी लागेल. हे काहीसे संत गाडगेबाबांच्या स्वच्छताकार्यासारखे आहे. सुरुवात स्वत:पासून, मग समाजच अशा चांगल्या कृत्यांचे अनुकरण करतो. तसेच वाईट कृत्यांविरोधातही समाजात प्रतिक्रिया उमटणे ओघानेच आले. आज या प्रतिक्रियांपलीकडे जाऊन क्रियाशील होण्याची गरज आहे. ही जबाबदारी प्रत्येक नागरिकावर आहे. वन-वन्यजीवन नष्ट होण्याने, हवा, पाणी, जमीन दूषित होण्याने सर्वाना समान त्रास होणार असेल, तर मग ते रोखण्यासाठी सर्वानी मिळून पाऊल उचलणं तार्किक आणि सार्थ ठरेल. ‘विकसित’ मानव निसर्गाबद्दलची आस्था हरवून बसला आहे. तिचे पुनरुज्जीवन होणे जरुरीचे आहे. विकासाची हवा न लागलेल्या किती तरी आदिवासी बांधवांमध्ये आजही निसर्गपूरक शाश्वत जीवनशैली जागृत आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे.
संवर्धनाची संकल्पना महाराष्ट्रासाठी नवीन नक्कीच नाही. ज्ञानदेवांनी सांगितलेला ‘वसुधैव कुटुंबकम’चा वारसा तुकोबांच्या अभंगात न्हाऊन आणि शिवबाच्या तलवारीवर तोलून पुढच्या पिढय़ांना दिला गेला. आज तोच आपण पुढे चालवायचा आहे. गरज आहे ती संवेदनक्षम राहण्याची आणि द्रष्टेपणानं पावलं उचलण्याची. विंदांच्या बालगीतांमधील आणि अनिल अवचट यांच्या सृष्टीत गोष्टीत व ‘वनात जनात’च्या गोष्टींमधून पाझरणारे माणूसपण यासाठी मार्गदर्शक आहे. मराठी जनांसाठी सर्वात मोठा दीपस्तंभ- शिवरायांनी आज्ञापत्रात म्हटलेल्या पुढील ओळी पथदर्शी ठराव्यात. द्रष्टेपणा आणि संवेदनक्षमतेचा याउपर दाखला तो काय!
‘‘काये म्हणून की, ही झाडे वर्षां दोन वर्षांनी होतात यैसे नाही. रयतेनेही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काल जतन करून वाढविली; ती झाडे तोडिली यावरी त्याचे दु:खास पारावार काये? लेकास दु:ख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारास हीत स्वल्पकालेष बुडोन नाहीसेच होते.’’
आज ही जिम्मेदारी रयतेवर आहे.. दृष्कृत्यांवर बोट ठेवताना सत्कृत्यांचा आलेखही वाढला तर हे संवर्धन कार्य सुकर होईल.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...