जंगलातून जाणारे महामार्ग बनले वन्यजीवांच्या मृत्यूचे सापळे

दूरदृष्टी नसलेल्या विकासकामांनी वन्यजीव व्यवस्थापनाला हादरा
विक्रम हरकरे, मुंबई, 3 ऑगस्ट,दै.लोकसत्ता

altवाघांच्या नष्टचर्यासाठी शिकारी टोळ्यांबरोबरच अनियोजित विकासाचा हव्यासही कारणीभूत ठरू लागला आहे. नागरी विकासासाठी जंगले तोडून विणले जाणारे रेल्वेमार्गाचे जाळे आणि रस्त्यांचा विस्तार हे घटक वाघ आणि अन्य वन्यजीवांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत. रेल्वेमार्ग आणि महामार्गावर भरधाव वाहनांची धडक बसून  वाघ, बिबट, हत्ती, अस्वली मृत्युमुखी पडल्याने  पर्यावरणवाद्यांची चिंता वाढली आहे. परिणामी भविष्यात वाघांचे संरक्षण कवच टिकवून ठेवण्यासाठी विशिष्ट लक्ष्य निर्धारित करून त्यादृष्टीने पावले उचलणे निकडीचे आहे, असे वन्यजीव आणि पर्यावरणवाद्यांनी म्हटले आहे.
२०१० वर्षांतील व्याघ्रगणनेत वाघांची संख्या १४११ वरून १७०६ पर्यंत पोहोचल्याचे जाहीर करण्यात आले होते. ही वाढ २० टक्के आहे. परंतु, निव्वळ संख्यात्मक वाढीवर समाधान मानून स्वस्थ बसणे घातक ठरू शकते, असा इशारा वन्यजीवज्ज्ञांनी दिला आहे. जंगले हीच वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र असल्याने अधिवास संरक्षणाचा आणि पर्यावरण संतुलनाचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असेही तज्ज्ञांनी सुचवले आहे.
वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे (मध्य भारत) संचालक नितीन देसाई यांच्या मते अनियोजित विकासकामांमुळे वनक्षेत्र आणि वन्यजीवांना मोठय़ा प्रमाणात झळ पोहोचत असून वन्यजीव व्यवस्थापनाची दूरदृष्टी नसल्याने अशा दुर्घटना वाढीस लागल्या आहेत. जंगलांचे विभाजन, त्यातून जाणारे रस्ते आणि रेल्वे मार्ग यामुळे वन्यजीव सैरभर होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कालव्यांमुळे वन्यजीवांचे स्थलांतरण थांबले आहे कारण, कालवे ओलांडून पलीकडे जाणे त्या जीवांना शक्य नसते. प्राण्याला जर पलीकडचे जंगल दिसत नसेल तर तो त्यापलीकडे जातच नाही. रस्त्यांचे ठेके दिले जातात आणि जंगलापर्यंत रस्ते पोहोचतात तेव्हा स्वयंसेवी संघटनांना प्राण्यांची आठवण होते. त्यानंतर प्राण्यांना पलीकडे जाता यावे म्हणून छोटे बोगदे काढून दिले जातात. उलट असे बोगदे फासेपारधी आणि शिकाऱ्यांसाठी मुक्त शिकारीचे ठिकाण होऊ लागले आहेत. असे नुसते थातूरमातूर उपाय करून काहीही होणार नाही.
विकासाशी संबंधित प्रकल्पांमुळे वाघांचे अस्तित्वच सातत्याने धोक्यात आले आहे. रेल्वे मार्ग, रस्त्यांच्या विस्ताराची कामे करण्यासाठी जंगलतोड केली जात असल्याने वन्यजीवांच्या अधिवासांना सर्वात मोठा धोका निर्माण होत आहे, असे स्पष्ट मत विदर्भातील वन्यजीव अभ्यासक कुंदन हाते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. गेल्या २० वर्षांपासून कुंदन हाते वन्यजीव संवर्धनाचे काम करत असून वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या शिकारी टोळ्यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. त्यांच्या मते मानवाचा जंगलातील हस्तक्षेप वाढत असल्याने याचा नकारात्मक परिणाम वन्यजीवांच्या स्वातंत्र्यावर झाला आहे. आकडेवारीत फक्त वाघांची संख्या फुगलेली दिसते. परंतु, अधिवास, जंगलांचे विभाजन आणि संपत चाललेले कॉरिडॉर याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यकाळात वाघांचे अस्तित्व टिकवण्यासाठी या घटकांकडे लक्ष देणे भाग आहे. विस्तारीकरणाच्या योजनांमध्ये ही बाजू कुणीच विचारात घेत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्य़ात दुधवा व्याघ्र प्रकल्पात एक वाघीण गेल्या ३० जुलैला वाहनाच्या धडकेने मृत्युमुखी पडली. ही वाघीण रस्त्यावर आली असताना भरधाव वाहनाने तिला मृत्यूच्या खाईत लोटले. दुधवा व्याघ्र प्रकल्पातून जाणारा हा महामार्ग वन्यजीवांसाठी प्रचंड धोक्याचा ठरत आहे. भीरा-मैलाने मार्गालगतच जंगल असल्याने वन्यजीव भक्ष्यांच्या आणि पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना मोठय़ा वाहनांच्या धडकेला बळी पडतात. डेहराडून वनक्षेत्रातील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पा तीन महिन्यांचा वाघाचा बछडा वाहनाची धडक बसून ठार झाला. ही वाघीण होती. ढेला वनक्षेत्रातील रामनगर मार्गावर २९ जुलैला ही घटना घडली.
बहरिच येथे कटर्नियाघाट अभयारण्यात एक बिबट २७ जुलैला मृतावस्थेत आढळला. त्याची शिकार झाली असावी वा वाहनाच्या धडकेने तो मृत्युमुख पडला असावा, अस विभागीय वनक्षेत्र अधिकाऱ्याने सांगितले. जंगलांचे विभाजन करून रस्ते बांधले जात असल्याने मानव-वन्यजीव संघर्षांलाही तोंड फुटले आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील अनुपपूरच्या धांगवान खेडय़ात अस्वलांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या २९ जुलैला अस्वलाने गुराख्यांवर हल्ला करून दोघांना गंभीर केले. जितेहारी तहसीलमध्ये बांधवगडच्या जंगलाला खेटून असलेल्या महामार्गावर ही घटना घडली. आसाम, कर्नाटक आणि ओरिसात रेल्वेमार्गावर आलेले हत्ती ठार होण्याच्या घटना वरचेवर घडतच आहेत.
महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तराखंड आणि कर्नाटकातील जंगलांमध्ये वाघांच्या संख्येची घनता दाट आहे. व्याघ्र नकाशात सत्यमंगलम आणि सेगूरचे नीलगिरीचे जंगल दर दहा किलोमीटरच्या क्षेत्रात वाघांचे अस्तित्व दाखवते. घनत्वाचे प्रमाण जंगलाची समृद्धी दर्शवणारे आहे. साधारणत: एक वाघाचे जंगलक्षेत्र सरासरी ३० ते ४० किलोमीटरचे समजले जाते. तब्बल २० वर्षांनंतर कोईम्बतूरच्या जंगलात दोन वाघ दिसून आले असून त्यांच्या हालचाली कॅमेऱ्याने टिपल्या, ही अत्यंत सकारात्मक घडामोड असली तरी रस्ते आणि रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण त्यांच्या वावरासाठी सर्वात मोठा अडथळा झाला आहे.   

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...