अन्वयार्थ : पक्ष्यांची घरटी होती..

सोमवार, १ ऑगस्ट  २०११,लोकसत्ता
अत्यल्प काळात प्रसिद्धी मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या अतिउत्साही आणि स्वयंघोषित पर्यावरणतज्ज्ञांनी वन्यपशू-पक्ष्यांचे जिणे अक्षरश: धोक्यात आणले आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे अग्रणी आपणच असल्याचा आव आणणारे हे कथित पर्यावरणतज्ज्ञ सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कोणत्या थराला जातील, याचा नेम राहिलेला नाही आणि त्यांच्या अघोरी कृत्यांकडे वन खात्याचे स्वत:ला जबाबदार म्हणवून घेणारे अधिकारी डोळेझाक करत आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्यभरात गेल्या दोन-तीन दिवसांत मानवी हौसेपायी नवरंग, स्वर्गीय नर्तक, बगळे आणि गायबगळ्यांच्या अकाली मृत्यूच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्याने या विषयावर सार्वत्रिक चर्चा घडवण्याची आणि वन कायद्यांचे फेरअवलोकन करून त्यात दुरुस्त्या करण्याची वेळ आली आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील जुनोनाच्या जंगलात पावसाच्या आगमनाची वर्दी देणाऱ्या आणि नवरंग (इंडियन पिट्टा) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देखण्या पक्ष्याच्या पिल्लांची छायाचित्रे घेण्याच्या अट्टहासाने त्याचे घरटे उद्ध्वस्त करून पिल्लांचा जीव घेण्यापर्यंत कथित तज्ज्ञांची मजल गेली आहे. जंगलातील वन्यपशू-पक्ष्यांची छायाचित्रे काढून ती फेसबुकवर टाकली आणि शहरी लोकांकडून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या की, ‘पर्यावरणतज्ज्ञ’ म्हणून मिरविण्यास आपण मोकळे झालो, असा समज या स्वयंघोषित तज्ज्ञांचा झाला आहे. या लोकांनी ‘तज्ज्ञ’ या शब्दालाच लाज आणली असून ‘वन्यजीवतज्ज्ञ’ म्हणून त्यांना कोणी मान्यता दिली, हे तपासले पाहिजे. जंगल फिरण्याची हौस भागवण्यासाठी आलेल्या बाहेरील पर्यटकांकडून पैसे घेऊन आणि वन खात्याचे सारे नियम पायदळी तुडवून त्यांना व्याघ्रदर्शन घडवणारे ‘धंदेवाईक’ आज ‘तज्ज्ञ’ म्हणून ताठ मानेने हिंडावेत, हा आपल्या देशात चाललेला अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि याला पायबंद घालण्याची गरज कुणालाही वाटत नाही, हे त्यापेक्षाही दुर्दैवी. त्यामुळेच अवघी हयात जंगलभ्रमंतीत आणि पशू-पक्ष्यांवरील संशोधनात घालवणाऱ्या जुन्या-जाणत्यांना आपण ‘करेक्ट’ करत आहोत, अशी दर्पोक्ती करण्यापर्यंत या स्वयंघोषित तज्ज्ञांची हिंमत वाढलेली आहे. चार-दोन पुस्तके लिहून आपणच वन्यजीवांचे एकमेव अभ्यासक असल्याचा देखावा निर्माण करताना आपण पर्यावरण संवर्धनाच्या मूळ उद्देशालाच नख लावत आहोत, याचेही या कथित तज्ज्ञांना भान राहिलेले नाही.  वास्तविक पक्षी निरीक्षण हे वैज्ञानिक शास्त्र आहे. निरीक्षण हे शांतपणेच होऊ शकते. त्यासाठी पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करून अंडी फोडण्याची आणि निरागस पिल्लांचा जीव घेण्याची आवश्यकता नाही. खरा पर्यावरणवादी असे कधीही करणार नाही. पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली अतिउत्साहात जे देखावे निर्माण केले जात आहेत त्यात सोशल कॉर्पोरेट क्लब्जही मागे नाहीत. त्यांचे वृक्षारोपणाचे कार्यक्रम म्हणजे फोटोग्राफीचा स्टंट झाला आहे. मुळात कोणत्या वृक्षांचे रोपण करण्याची गरज आहे, याचे गणित समजून घेण्याची गरज कुणालाही वाटत नाही. पक्ष्यांना जगण्यासाठी फळझाडे आणि फुलझाडांची आवश्यकता आहे, शोभिवंत झाडांची नाही, हे साधे तत्त्व लक्षात घेतले जात नाही. सार्वजनिक बगिच्यातील कचऱ्याच्या कुंडय़ांना प्राणी-पक्ष्यांचे आकार देऊन वनसंवर्धन कसे केले जाऊ शकते, हे न उलगडणारे कोडे आहे. भावी पिढीला यातून कोणता संदेश दिला जात आहे? सर्वात संतापजनक म्हणजे अशा ढोंगी पर्यावरणतज्ज्ञांची नावे माहीत असूनही त्यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई झाल्याची नोंद नाही. कुणाचाच धाक राहिला नसल्याने आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशा थाटात त्यांची विनापरवानगी जंगलभ्रमंती आणि जंगलातील पशू-पक्ष्यांची छेडछाड सुरू आहे. 


0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...