पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त करणाऱ्या ‘त्या’ वन्यजीव छायाचित्रकाराचा राज्यभर निषेध

नागपूर, ३१ जुलै/प्रतिनिधी,लोकसत्ता
छायाचित्रणासाठी पक्ष्यांची घरटी उध्वस्त करणाऱ्या ‘त्या’ कथित वन्यजीवतज्ज्ञ, छायाचित्रकार व लेखकाच्या कृत्याबद्दल अवघ्या महाराष्ट्रातून निषेधाचे सूर उमटले आहेत. वनमहर्षी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ गोपाळराव ठोसर, डॉ. अनिल पिंपळापुरे यांच्यासारख्या गेल्या चार दशकांपासून वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठांनी या कृत्याचा निषेध केला आहे. इतकेच नव्हे तर, गेल्या दहा वर्षांंपासून गिर्यारोहक, वन्यजीवतज्ज्ञ, छायाचित्रकारांचा सहभाग असलेल्या ‘गिरीमित्र’ संमेलनाच्या आयोजकांनीही अशा छायाचित्रणावर बंदी घातली आहे.
पावसाळा पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो आणि याच काळात त्यांची घरटी उध्वस्त करण्याचा प्रकार अतिशय घृणास्पद असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटत आहेत. केवळ वन्यजीवतज्ज्ञ, पक्षीतज्ज्ञच नाही, तर छायाचित्रकारांनीसुद्धा पक्ष्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या महाभागाच्या कृत्याला लगाम घालण्याची गरज ‘लोकसत्ता’जवळ बोलावून दाखवली. आंतरराष्ट्रीय छायाचित्रण नियमात घरटय़ांची आणि घरटय़ातील पिलांच्या, संकटात असलेल्या वन्यजीवांच्या आणि कैदेतील (कॅप्टिव्ह अ‍ॅनिमल) प्राण्यांच्या छायाचित्रणाला बंदी घातली आहे. महाराष्ट्रभर घेतल्या जाणाऱ्या ‘गिरीमित्र’ संमेलनात या नियमांचे तंतोतंत पालन केले जाते. गिर्यारोहक, वन्यजीवतज्ज्ञ, छायाचित्रकार यांचा सहभाग असलेल्या या संमेलनात गेल्या पाच वर्षांंपासून छायाचित्र स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पध्रेत सहभागी स्पर्धक हे नियम पाळत असताना स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवून घेणाऱ्या या कथित वन्यजीवतज्ज्ञाला या नियमांचा विसर पडावा, याचे आश्चर्य वाटते. अशा वृत्तीची माणसे जर पर्यावरणाची घडी विस्कटवत असतील, तर त्यांना नियम दाखवावेच लागतील, अशी प्रतिक्रिया गिरीमित्र संमेलनाचे आयोजक सुहास जोशी यांनी व्यक्त केली. या संमेलनात अनेक तरुण छायाचित्रकार सहभागी होतात आणि ही मंडळी जर आंतरराष्ट्रीय छायाचित्रण नियमांचे पालन करतात, तर अनुभवी व्यक्तींकडून हे कृत्य अपेक्षित नसल्याचे जोशी म्हणाले.
 लोक तुमच्याकडे ‘आयडियल’ म्हणून बघत असतांना निसर्गाची घडी विस्कटवत असाल तर ते चुकीचे आहे. लोकांना निसर्ग कळावा म्हणून त्यांना घेऊन जाणे चुकीचे नाही, पण हे करताना छायाचित्रण व इतर बाबींचा हव्यास बाळगत असाल, तर ते कुठेतरी थांबायला हवे. अशा वेळी तरुण पिढी आणि लोकांपुढे तुम्ही काय आदर्श ठेवणार, असा प्रश्न नेचर इंडियाचे आदेश शिवकर यांनी उपस्थित केला. हाताशी असलेली चांगली नोकरी सोडून केवळ निसर्गप्रेमापोटी छायाचित्रणाच्या क्षेत्रातील आदेश शिवकर यांनी आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पध्रेचे परीक्षक म्हणून भूमिका बजावलेली आहे. युवराज गुर्जरसारखे व्यक्तिमत्व गेल्या २५ वर्षांंपासून या क्षेत्रात आहेत, पण ‘नेस्टिंग फोटोग्राफी’ला त्यांनी कधीही हात लावला नाही. ‘वाईल्डलाईफ टुरिझम’ या क्षेत्रात गुर्जर वावरतात आणि या दरम्यान छायाचित्रणाचा छंदही जोपासतात, पण स्वत:ला पर्यावरणवादी व निसर्गप्रेमी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींकडून त्यांनासुद्धा अशा कृत्याची अपेक्षा नाही. छायाचित्रणासाठी घरटी उध्वस्त होत असतील, तर विणीच्या हंगामात या पक्ष्यांनी सुरक्षित स्थळ कुठे शोधायचे, हा त्यांचा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...