माळढोक प्रकाशझोतात मात्र, देखणा तणमोर दुर्लक्षितच!

अभिजित घोरपडे ,पुणे, 30 जुलै,दै. लोकसत्ता
 माळढोक पक्षी गेले काही दिवस प्रकाशझोतात आला असतानाच, त्याच्याचप्रमाणे गवताळ माळरानांवर राहणाऱ्या अनेक वैशिष्टय़पूर्ण पक्ष्यांकडे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. अतिशय देखणा आणि विणीच्या हंगामात नराच्या अनोख्या उडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला तणमोर अतिदुर्मिळ होण्याच्या वाटेवर असूनही असाच दुर्लक्षाचा बळी ठरला आहे.
तणमोर किंवा तृणमोर मोठय़ा प्रमाणात शिकार व वसतिस्थाने नष्ट झाल्यामुळे त्याची संख्या खूपच घटली आहे. पूर्वी सर्रास कुठल्याही माळरानांवर दिसणाऱ्या या पक्ष्याची संख्या आता जगात केवळ अडीच हजार इतकीच उरली आहे. तरीसुद्धा त्याच्या संवर्धनाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही.
तणमोर हा केवळ भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमधील गवताळ माळराने व नेपाळच्या तराईच्या क्षेत्रात आढळतो. एरवी नर व मादी तपकिरी-करडय़ा रंगाचे असतात. मात्र, पावसाळ्यात विणीच्या हंगामात नर आकर्षक काळा-पांढरा रंग घेतो. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला सुंदर तुरा उगवतो. तो मादीला आकर्षित करण्यासाठी गवतात सहा ते दहा फूट उंच उडय़ा मारतो आणि दातेरे असलेली पिसे एकमेकांवर घासून ‘कर्र्र’ असा आवाज काढतो. त्याच्या या वैशिष्टय़ामुळे तो ब्रिटिशांच्या काळापासून शिकारीच्या खेळाचा पक्षी म्हणून प्रसिद्ध होता. भारतात पारध्यांकडूनही त्याची शिकार केली जायची. त्यातच गवताळ माळरानांकडे मोठे दुर्लक्ष होत असल्याने १९७० पासून त्याची संख्या घटू लागली. १९८० च्या दशकात तर तो खूपच कमी झाला. आता विदर्भात मोजके २५-३० पक्षी व कोल्हापूर, नाशिक येथेही तुरळक पक्षी आढळले आहेत.

मध्य प्रदेशमध्ये त्याच्या संवर्धनासाठी काही प्रयत्न झाले आहेत. मात्र, महाराष्ट्राने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याबाबत माळढोक व तणमोर यांचा अभ्यास केलेले वन्यजीव अभ्यासक डॉ. प्रमोद पाटील यांनी सांगितले, की या पक्ष्यासाठी अभयारण्य करणे शक्य नाही, कारण तो मुख्यत: पर्जन्यछायेच्या प्रदेशात राहतो आणि प्रजननासाठी तेथील पावसाच्या जागा शोधतो. पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचा भरवसा नसतो. त्यामुळे कुठे अभयारण्य केले तर हा पक्षी त्याच भागात राहील, याची खात्री नसते. त्यामुळेच स्थानिक लोकांच्या मदतीनेच त्याचे संवर्धन शक्य आहे. मात्र, सध्याच्या काळात त्याच्याकडे खूपच दुर्लक्ष झालेले आहे.  

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...