दोन घरटय़ांचा मालक समुद्री गरुड

उमेश वाघेला - शनिवार , २३ जुलै २०११,लोकसत्ता
swastishreehobbies@gmail.com

काही समुद्री गरुडांच्या मालकीची दोन, तर काहींची चक्क तीन घरटीसुद्धा आहेत. निसर्गात गरजेपेक्षा जास्त घेण्याची सवय फक्त माणसांमध्येच दिसून येते. मग पक्ष्यांमध्येसुद्धा असे गुण दिसण्याचे काय कारण असावे?
कोकणात आंब्याच्या झाडांवर घरटे केल्यावर स्थानिक लोक ते घरटे पाडून मग त्यावर फवारणी करतात. त्यामुळे यांच्या विणीवर परिणाम होत आहे. काही ठिकाणी डीडीटीच्या वापरामुळे, मेलेले प्राणी खाल्ल्यामुळे समुद्री गरु डाच्या अंडय़ांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन अंडी जास्त पातळ होऊन नष्ट होतात. समुद्री गरुडाला घरटय़ासाठी मोठी झाडं लागतात आणि घरटे बनवायलासुद्धा बरेच दिवस लागतात. झाडंसुद्धा मोठय़ा प्रमाणात कापली जात आहेत. ऐन विणीच्या हंगामात घरटे नसल्यास काय करावे?
म्हणूनच बहुतेक एक जादा घरटे बनवून भविष्याची तरतूद करून ठेवण्याकडे यांचा कल दिसतोय!
मे महिना होता. सकाळची सातची वेळ. गुहागरचा मातकट रंगाचा वालुकामय समुद्रकिनारा. किनाऱ्यावर आहे १० ते १५ फूट उंचीपर्यंत वाढलेले एक भलेमोठे सदाहरित केवडय़ाचे वन! केवडा फक्त गणेश चतुर्थीला गणपतीला वाहतात इतकेच माहीत असते. तो कोठे उगवतो, किती उंच असतो याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते! किनाऱ्यावरची मातकट पांढरी रंगाची वाळू. त्यावर जसजसा मी चालायला लागलो तसतसे काहीतरी तुरु तुरु  पळायला लागले. एका जागी थांबून नीट लक्षपूर्वक बघितले. हे तर छोटे-छोटे खेकडे होते. अगदी समुद्री वाळूच्या रंगाचेच! आसपासच्या वातावरणात अगदी मिसळून जात होते. जवळ गेल्यावर तुरु तुरु  पळत जाऊन जवळच्याच वाळूतल्या बिळात लपत होते. पुढे निघालो तर एक मोठा मेलेला डॉल्फिन किनाऱ्यावर पडलेला होता. असंख्य कीटक त्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाला लागले होते. असाच चालत चालत पुढे निघालो आणि किनाऱ्यालगतचे सुरु चे वन सुरू झाले. इतक्यात बरोबर असलेला चिमुकला सौरव पंडित ओरडला ‘ए गरु ड’! आकाशात पाहिले तर समुद्रावरून येत असलेला एक पांढऱ्या रंगाचा सहा ते सात फुटांचा, पंख पसरलेला भलामोठा सुंदर पक्षी सुरु च्या वनात गायब झाला. समुद्री गरुड हा घारीपेक्षा थोडा मोठा पक्षी असतो. याचे डोके, मान, पोट आणि शेपटीच्या टोकाचा भाग पांढराशुभ्र असतो. उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीच्या आकाराच्या शेपटीमुळे हा पक्षी समुद्री गरु ड असल्याची ओळख पटते. आकाशात उडताना, घिरटय़ा घालताना दुसऱ्या शिकारी पक्ष्यांचे पंख सरळ रेषेत असतात, पण याच्या पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी व्ही अक्षरासारखा दिसतो. याच्या पाठीवरचा रंग करडा, तर पोटाचा भाग पांढराशुभ्र असतो. म्हणून इंग्रजीत याला व्हाईट बेलीड सी ईगल किंवा व्हाईट-ब्रेस्टेड सी इगलही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव हॅलीआईटस ल्युकोगॅस्टर आहे. ग्रीक भाषेत हल्स म्हणजे समुद्र आणि ओएटस म्हणजे गरु ड, असा हॅलीआईटसचा अर्थ होतो. ग्रीकमध्ये पांढऱ्या रंगाला  ल्युकोस आणि पोटाला गॅस्टर म्हणतात. त्यामुळे ल्युकोगॅस्टर म्हणजेच पांढऱ्या पोटाचा. अशा प्रकारे समुद्री गरु डाचे आंतरराष्ट्रीय नाव ठेवले गेले आहे. अशा देखण्या गरु डाला संस्कृतमध्ये सुपर्ण  म्हटले आहे. आर्यशूरकृत जातकमालेतल्या राजकुमार अयोगृहच्या कथेत समुद्री गरु डाचा उल्लेख सापडतो तो असा-
पक्षानिर्लैडितमीनकुलं व्युदस्य
मेधौधभीमरसितं जलमर्णवेभ्य:।
सर्पान्हिरन्त विततग्रहणा: सुपर्णा
मृत्युं पुन: प्रमिथतुं न तथोत्सहन्ते॥
या सुपर्ण ऊर्फ समुद्री गरु डाला बघून लगेचच माझे पाय त्या सुरु च्या वनात वळाले. सुरु  हे खरंतर आपण दिलेले मराठी नाव असले तरी हे झाड मात्र आपल्या इथले नाही. सुरु  मूळ ऑस्ट्रेलियाचे आहे. सुरु च्या या वनात सुरु च्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही झाडाचे नामोनिशाणदेखील नाही. या झाडाखाली अगदी साधे गवतसुद्धा येत नाही. झाडाखाली फक्त सुरु च्या पानांचा फूटभर जाडीचा खच पडलेला होता. वर्षांनुवर्ष या पानांचा खच पडत राहतो. एरवी जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या आतच देशी झाडांचा पालापाचोळा कुजून त्याची परत माती तयार होते. पण सुरु चे वर्ष-दोन वर्ष होऊनही पानांचा खच कुजत नाही. कारण हे झाडच मूळ आपल्या इथले नाही. हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे असून, त्याला  ऑस्ट्रेलियन पाईन म्हणतात. त्याचे पानांचे मातीत रूपांतर करणारे जीव आपल्या इथे नाहीत. समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या परिसराला समुद्री वाऱ्यापासून थोपवण्यासाठी सुरु ची ही उंच झाडं लावली आहेत, असे कारण सांगितले जाते. पण समुद्री लाटांवरून येणारा वारा थोपवण्यासाठी उंच वाढणारी अनेक देशी झाडे आहेत. मग वनखात्याने देशीच्या ऐवजी विदेशी झाडांनाच का बरं प्राधान्य दिले, अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. असो.
समुद्री गरुड आपल्या येथील समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश, खाडी आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर, मुंबईपासून खाली पश्चिम किनारा आणि पूर्व किनाऱ्यावरील बांगला देश, श्रीलंका, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे येथे आढळतात. समुद्रात वाढत्या प्रदूषणामुळे त्याचे खाद्य असलेले जलचर दिसत नसल्यामुळे समुद्रकिनारी वसलेल्या मुंबईसारख्या शहरांजवळ आता मात्र समुद्री गरु ड दिसत नाहीत. हे थायलंड, म्यानमार, मलेशिया, इंडोनेशिया, इंडोचायना, फिलिपाईन्स, हाँगकाँगसहित दक्षिण चायना, न्यूगिनी आणि ऑस्ट्रेलिया येथेही आढळतात. समुद्री गरु ड क्वचित भरती येणाऱ्या नदी आणि गोड पाण्याच्या तलावावरही आढळतात. एकदा अहमदाबादजवळ समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर आत भटकलेला एक समुद्री गरु ड सापडला होता, तर एक समुद्री गरु ड सौराष्ट्रात शत्रुंजी नदीच्या मुखाजवळ सापडल्याचीही नोंद आहे.
सुरुच्या झाडातून निघून तो समुद्री गरुड समुद्राच्या दिशेने गेला. थोडय़ा वेळातच परत सुरुच्या झाडांकडे यायला लागला. त्याच्या मागोमाग मी सुरुच्या बनात पोहचलो. समुद्री गरु ड एका सुरु च्या उंच शेंडय़ावर जाऊन बसला. सुरु च्या फांद्या एकमेकांत जवळजवळ असल्याने वरचे दृश्य बघणे जरा कठीण पडत होते. नीट पाहिले असता हा समुद्री गरु ड शेंडय़ावर नव्हे, तर घरटय़ात बसला होता. घरटय़ाचा आकार इतका अवाढव्य होता की, तो अधूनमधून खाली आमच्याकडे डोकावल्याशिवाय दिसतच नव्हता! समुद्री गरु डाचा विणीचा काळ प्रदेशानुसार बदलत जातो. भारतात ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान वीण असते. विणीच्या काळात हे उच्च पटीतल्या, कर्कश, खंगरी आवाजात शीळ घालतात. मादीने कान्क-कान्क-कान्क-कान्क वगैरे आवाज केल्यावर प्रत्युत्तरात लगेचच नर केन-केन-केन-केन वगैरे कमाल दहा वेळा आवाज करतो. हे सलग तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळपर्यंत अधेमधे विराम घेत शीळ घालत राहतात. मादीचा आवाज कोकीळच्या गाण्यातल्या शेवटच्या आवाजासारखा वाटतो. तसेच काळा शराटी किंवा कुदळ्या पक्ष्यासारखाच, पण उच्च पटीतला असतो. मादी विणीच्या काळात कान्क-कान्क असा आवाज करते. म्हणून कोकणात समुद्री गरुडाला काकणघार म्हणूनसुद्धा ओळखले जाते. नर ७० ते ८० सें.मी.चा आणि मादी मात्र नरापेक्षा थोडी मोठी ८० ते ९० सें.मी.ची असते. नर-मादी दोघेही दिसायला सारखेच असतात. विशेष म्हणजे समुद्री गरु ड एकसाथीव्रता असतात. म्हणूनच हे एकच घरटे वर्षांनुवर्ष वापरत असतात. दोघांपैकी एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्वरित नवा जोडीदार मिळवतात. घरटे बनवण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरच्या सर्वाधिक उंचीचे झाड पसंत केले जाते. तसेच हे झाडावर अशा ठिकाणी बसतात की, तिथून व्यापक परिसरात नजर ठेवता येते. समुद्री गरु डाची जोडी आपल्या हद्दीचे रक्षण करतात. यांची हद्द खूप मोठी असते. हे एकटे किंवा जोडीने दिसतात. क्वचित छोटय़ा कळपात दिसतात. यांची जोडी जमल्यावर घरटे बनवायला सुरू होते. आंबा, सुरा, वड, पिंपळ, नारळ, चिंच, जंगली बदाम, किंजल, सातवीण, फणस, बेहडा व इतर झाडांवर उंच ठिकाणच्या मजबूत फांद्यांच्या बेचक्यात घरटे बनवले जाते. घरटय़ाची उंची साधारण जमिनीपासून १० ते ५० मीटपर्यंतच्या उंचीवर असते. क्वचितच एखादे घरटे १० मीटरपेक्षा कमी उंचीवर बनवले जाते. नर आणि मादी दोघेही मिळून घरटे बनवतात. घरटय़ासाठी करवंद, गजकर्णी, वड, सागरताग, बांबू व इतर झाडांच्या फांद्या, काडय़ा-काटक्या आणून त्याचे मोठे प्लॅटफॉर्म बनवले जातात. यांचे घरटे साधारण १.२५ ते १.५ मीटर इतके रु ंद आणि ५० ते ७५ सें.मी. जाड असते. अंडी किंवा पिल्लं घरटय़ातून बाहेर पडून नष्ट होऊ नये म्हणून आतून खोलगट असतात. वापरण्यात येणाऱ्या काडय़ा ८६ सें.मी.पर्यंत लांब व सुमारे ३ सें.मी.पर्यंत जाड असू शकतात. आता तर समुद्री  गरुडाच्या काही घरटय़ांत जाळीचे तुकडे, प्लॅस्टिक कागद, दोरखंड, विणलेल्या थैल्यासुद्धा वापरात आणल्याचे दिसून आले आहे. घरटय़ाच्या आतल्या बाजूने पिलांना काडय़ा टोचू नये म्हणून हिरव्यागार पानांचा गालिचा तयार करण्यात येतो. यासाठी आंबा, सुरा, काटेसावर, वड, फालसा, घोटवेल, रिठा अशा झाडांच्या पानांचे अस्तर दिले जाते. आधीची पाने सुकली की, परत हिरवी पाने आणली जातात.
समुद्री गरु डाची जोडी एकसाथीव्रता असल्याने आणि त्यांना कोणताही त्रास न दिल्यास एकच घरटे वर्षांनुवर्ष वापरात आणले जाते. दरवर्षी त्याच घरटय़ात नवीन काडय़ांचा समावेश करून डागडुजी केली जाते. त्यामुळे घरटे अधिकच मोठे होत जाते. एक दहा वर्षांपासून वापरात असलेले घरटे १.७ मीटर लांब व १.२ मीटर    रु ंद झाले होते. त्याची जाडी तर तब्बल ७० सें.मी. झाली होती. अशी जुनी घरटी आजही वापरात आहेत. कोकणात गुहागर तालुक्यात १० ते २५ वर्षांपासून वापरात असलेली समुद्री गरुडाची अनेक घरटी आहेत. गुहागर येथे तर तब्बल ५० वर्षांपेक्षाही जास्त जुने घरटे एकाच जोडीद्वारा आजही वापरण्यात येत आहे. समुद्री गरु ड कडेकपारींवरसुद्धा घरटे बनवतात. जमिनीवरचे हे घरटे मात्र समुद्रातल्या एखाद्या टापूवरच बनवले जाते. घरटे बनवण्याचे किंवा त्याच्या रिपेअरिंगचे काम नर आणि मादी दोघं मिळून करतात आणि त्यालासुद्धा ३ ते ६ आठवडे लागतात. नर या कामात जास्त सक्रिय असतो. घरटय़ाचे काम पूर्ण झाल्यावर मादी त्यात साधारणत: दोन पांढरी अंडी घालते. अंडी उबवण्याचेही काम नर आणि मादी दोघंही मिळून करतात. सहा आठवडय़ांपेक्षा जास्त उबवणी काळानंतर अंडय़ातून पिल्लं बाहेत येतात. पिल्लांच्या अंगावर पांढरीशुभ्र जावळपिसं असतात. ते अगदी कापसाच्या पुंजक्यासारखे दिसतात.
 समुद्री गरु डाच्या मेन्युकार्डात मुख्यत्वे समुद्री साप, मासे आणि कासव आहेत. हुक नोझ्ड सी स्नेक, डॉग फेस्ड वॉटर स्नेक व इतर पाण्यातले साप हे यांचा नियमित आहार आहे. साप मारून खातात म्हणून हिंदीत याला सापमार किंवा सर्पान्तक म्हणतात, तर संस्कृतमध्ये याला पक्ष्यांच्या राजाची पदवी बहाल करण्यात आली आहे. जानकीहरणमध्ये याचा उल्लेख सापडतो, तो असा-
‘फणावतामुद्धरणेषु वारिधि-
प्रवाहिसक्तावुद्याचिलस्थत:।
वितत्य पक्षाविधप: पतित्रणां
व्यशोषयन्नप्रतिसूर्यमायतम’’
जानकीहरणमधल्या या श्लोकात अधिप: पतित्रणां म्हणजे गरुड होय. याचे मेन्युकार्ड इथे संपत नाही. खेकडे, उंदीर, ससे, फळवाघुळ; छोटय़ा पक्ष्यांमध्ये सीगल, वारकरी, पाणकावळेसुद्धा मारून खातात. खाऱ्या पाण्यातील मगरीची नुकतीच अंडय़ातून बाहेर आलेली पिल्लंसुद्धा उचलल्याची नोंद आहे. समुद्री  गरुड अत्यंत माहिर शिकारी असून, हंसासारख्या मोठय़ा पक्षी किंवा प्राण्यांची शिकार करतात. पाण्याच्या सपाटीपासून कमी उंचीवर उडत हे शिकार करतात. शिकार पकडायच्या आधी आपले दोन्ही पाय उडताना पुढच्या दिशेला आपल्या चोचीच्या बरोबर खाली ठेवतात. पायातल्या तीक्ष्ण नखांद्वारे मागे झडप घालत वरच्या दिशेने पंख फडफडवतात. साधारणत: शिकार करण्यासाठी फक्त एकच पाय उपयोगात आणला जातो. साधारण पाण्यात ४० सें.मी. खोलीपर्यंत माश्यांची शिकार साधण्यासाठी समुद्री गरु ड सूरसुद्धा मारतात. समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे एक कि.मी. अंतरापर्यंत यांचा अन्नासाठी शोध चाललेला असतो. कारण या भागात पाण्याच्या सपाटीवर गरम वारे नसतात. समुद्री गरु ड निसर्गाचे सफाई कर्मचारीसुद्धा आहेत. कारण मेलेली मेंढरं, मेलेले पक्षी आणि किनाऱ्यावर मरून पडलेले किंवा मासेमारी करणाऱ्या नावेतले मासेसुद्धा खातात. मासेमारी करण्यासाठी लावलेल्या जाळय़ांवरसुद्धा हल्लाबोल करतात. सीगल किंवा स्वॅम्प हेरियरसारख्या छोटय़ा शिकारी पक्ष्यांनी काही शिकार केली असल्यास किंवा मासा धरला असल्यास त्यांना बळेच सोडून देण्यास समुद्री गरु ड भाग पाडतात. असे दुसऱ्याचे खाद्य हिसकावूनसुद्धा घेतात. प्रसंगी पाळलेली बदकं आणि पट्टेरी डुकरसुद्धा पळवतात. घरटय़ात पिल्लं असल्यावर तर मासेमारांच्या गावातल्या पाळलेल्या कोंबडय़ा पिल्लांना भरवण्यासाठी सर्रासपणे पळविले जातात. समुद्री गरु ड एकटे, जोडीने किंवा सहपरिवार आणलेले खाद्य खातात.
सुरु वातीला बाबा समुद्री गरुड शिकार करून आणतात आणि आई पिलांना भरवते. पिलं मोठी व्हायला लागल्यावर मात्र आई-बाबा दोघंही मिळून पिलांना आणून भरवायला लागतात. दोन अंडी जरी मादीने घातली असेल तरीसुद्धा एखादे अंड नष्टच होते किंवा दोन्ही अंडय़ातून पिल्लं बाहेर आल्यावर एक पिल्लू घरटय़ातच मरण पावते. साधारण ७० ते ८४ दिवसांचे पिलू घरटय़ातून बाहेर पडते. पुढील पाच ते सहा महिने किंवा दुसऱ्या विणीच्या काळापर्यंत आई-बाबाच्या हद्दीत राहते. पण यांच्या प्रजोत्पत्तीचे प्रमाण कमी आहे.
तरु ण समुद्री गरुड पहिल्या वर्षी जास्त करून तपकिरी रंगाचा असून, डोके, मान, पाठीवरच्या भागावर फिकट मातकट रंगाच्या रेघा असतात. सतत सुधारणा होत वयाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षी समुद्री गरु डाचे पांढरेशुभ्र देखणे रूप मिळते. याच्या देखण्या रूपामुळेच निस्सान टापूवर समुद्री गरुडाची शिकार करण्यावर बंदी आहे. या शिकारीला पर्यावरण संरक्षण व जैवविविधता संवर्धन कायदा १९९९ अंतर्गत विशेष संरक्षण देण्यात आले आहे. सिंगापूरच्या १०,००० डॉलर किमतीच्या चलनी नोटांवर समुद्री गरु डाचे चित्र छापून बहुमान करण्यात आला आहे. सेलन्गर राज्याचे हे राजमान्य चिन्ह आहे. पण आपल्या इथे काही ठिकाणी खेळ म्हणून याची शिकार केल्याचे उघडकीस आले होते.
गुहागरच्या किनाऱ्यावरच्या या घरटय़ातल्या समुद्री गरु डाने मला एका वेगळ्या प्रश्नातच टाकले. माझ्या समोरच्या सुरु च्या झाडावरून एक मोठी काडी घेऊन तो उडाला. सुमारे शंभर-दीडशे फुटांवर असलेल्या जवळच्याच आणखी एका  सुरुच्या झाडावर गेला. तिथेही एक भलेमोठे घरटे होते. त्या घरटय़ातून आणलेल्या काडय़ा या घरटय़ात रचायला लागला. मग हा काय दुसऱ्याच्या घरटय़ातून चोरी करत होता की काय? नाही. कारण याची हद्द खूप मोठी असते. त्यात दुसरे प्रतिस्पर्धी नसतात. खरंतर या दोन्ही घरटय़ांचे मालक समुद्र गरु डाची एकच जोडी होती. पण एका वेळेस एकच घरटे विणीसाठी वापरात आणले जाते.
कोकणात अशी अनेक घरटी आहेत. या वर्षी एक, तर दुसऱ्या वर्षी दुसरे असे आळीपाळीने दोन्ही घरटी वापरात आणली जातात. काही समुद्री गरुडाच्या  मालकीची दोन, तर काहींची चक्क तीन घरटीसुद्धा आहेत. निसर्गात गरजेपेक्षा जास्त घेण्याची सवय फक्त माणसांमध्येच दिसून येते. मग पक्ष्यांमध्येसुद्धा असे गुण दिसण्याचे काय कारण असावे? कोकणात आंब्याच्या झाडांवर घरटे केल्यावर स्थानिक लोक ते घरटे पाडून मग त्यावर फवारणी करतात. त्यामुळे यांच्या विणीवर परिणाम होत आहे. काही ठिकाणी डीडीटीच्या वापरामुळे, मेलेले प्राणी खाल्ल्यामुळे समुद्री गरु डाच्या अंडय़ांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन अंडी जास्त पातळ होऊन नष्ट होतात. समुद्री गरुडाला घरटय़ासाठी मोठी झाडं लागतात आणि घरटे बनवायलासुद्धा बरेच दिवस लागतात. झाडंसुद्धा मोठय़ा प्रमाणात कापली जात आहेत. ऐन विणीच्या हंगामात घरटे नसल्यास काय करावे? म्हणूनच बहुतेक एक जादा घरटे बनवून भविष्याची तरतूद करून ठेवण्याकडे यांचा कल दिसतोय!    

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...