हरियल देतोय निसर्गरक्षणाचा संदेश

सौजन्य : डॉ. सतीश पांडे,दै.सकाळ
हरियलला राज्यपक्ष्याचा सन्मान देणे पुरेसे नाही. त्याचा आदर व आब राखून त्यास संरक्षण द्यायला हवे. त्याचा अधिवास संरक्षित करायला हवा. हरियलला अभय प्रदान केल्याने पर्यावरणाचेही संरक्षण आपोआपच होणार आहे.
महाराष्ट्राचा प्रतीकात्मक राज्यपक्षी हरियल किंवा "यलो फूटेड ग्रीन पिजन' नुकताच चर्चेत आला होता. प्रत्येक राज्याला एक "आपला' म्हणून राज्यपक्षी आहे. त्रिपुराचादेखील हरियलच आहे. अनेक पक्ष्यांना राज्यपक्षी होण्याचा बहुमान लाभलेला दिसतो. बुलबुल (गोवा), कोकीळ (झारखंड), निळकंठ (बिहार), खंड्या (पं. बंगाल), पहाडी मैना (मेघालय), मोठा धनेश (केरळ व अरुणाचल प्रदेश), माळढोक (राजस्थान), मोर (ओरिसा), स्वर्गीय नर्तक (मध्य प्रदेश) असे पक्षी निवडलेले दिसतात. ज्याप्रमाणे राज्यपक्षी आहेत, तद्वतच राष्ट्रपक्षीही आहेत. भारताचा मोर, पाकिस्तानचा तांबट, अमेरिकेचा बाल्ड ईगल वगैरे. अशा पक्ष्यांची चित्रे पोस्टाच्या तिकिटांवर, नाण्यांवर, नोटांवर, भेटवस्तूंवर, पुस्तकांवर वगैरे ठिकाणी विराजमान होतात. प्रतीकात्मक रीतीने निसर्गातील घटकांचा (प्राणी, वृक्ष, रत्ने) उपयोग करण्याची प्रथा भारतात पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. ताकद, प्रतिष्ठा व वेगळी ओळख सांकेतिक पद्धतीने दर्शविण्यासाठी प्राणी व पक्षी वापरले जातात. महाभारतातील उल्लेखांनुसार बलशक्ती योद्‌ध्यांच्या रथांवरील दंडांवरदेखील फडफडणाऱ्या पताकांवर प्राणी पाहायला मिळतात. सहदेवाच्या रथावर हंसध्वज होता; अभिमन्यूच्या रथावर हिरण्यमय, तर घटोत्कचाच्या रथावर गृध्र ध्वज असल्याचे उल्लेख आहेत. विविधरंगी ध्वजांवर शंख, चक्र, त्रिशूळ, अर्धचंद्र, सूर्य, तारका, मणी, रत्ने तर असतच; पण प्राणी व पक्षी व कमलादी पुष्पदेव वृक्ष ही चिन्हे असतात. कोणते प्राणी निवडायचे व का, हा प्रश्‍न सहजच मनात निर्माण होतो. माणूस हा निसर्गाचाच एक अविभाज्य घटक मानला आहे. कारण वैदिक व उपनिषदांतील विचारमंथन आहे. माणसाने आपल्या सहचर प्राणिमात्रांचे व वृक्षसंपत्तीचे नुसतेच भान ठेवणे गरजेचे नसून, त्यांचे संरक्षणदेखील करायला हवे, असा विचार भारतीय संस्कृतीत वारंवार आढळतो. ध्वजावर अंकित केलेला पक्षी जर शुक असेल तर त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याचा अधिवास, त्याच्या विणीच्या जागा- म्हणजे विवक्षित वृक्ष यांचेही संवर्धन करण्याची जबाबदारी राज्य शासनावर येते. म्हणजेच वरकरणी साधारण वाटणारी ध्वज व मानचिन्हाची कल्पना निसर्गासाठी उपयुक्त आहे. कालांतराने राजेरजवाडे गेले, बलशाली साम्राज्ये अस्त पावली, पण मानचिन्हे वापरण्याच्या संकल्पना मात्र जनमानसात रुजल्या त्या कायमच्या. सांस्कृतिक जीवनाशी निगडित असलेले पक्षी काही ठिकाणी राज्यपक्षी म्हणून निवडले गेलेले आहेत. सारस (रामायण), निळकंठ (विष्णुवाहन), बाज (शीख गुरूंशी निगडित), कोकीळ (काव्य) अशी काही उदाहरणे आहेत. अरुणाचलात काही जमाती ऐश्‍वर्याचे प्रतीक म्हणून धनेशाच्या चोचीचे शिरोभूषण करतात. हाच धनेश या कारणाने शिकारीस बळी पडून संख्येने घटू लागला आहे. काही ठिकाणी त्याच प्रदेशात दिसणारे पक्षी राज्यपक्षी म्हणून निवडले गेले. लक्षद्वीपचा काजळ सुरय, गोव्याचा लाल गळ्याचा बुलबुल, राजस्थानचा माळढोक ही या प्रकारातील उदाहरणे होत. थोडक्‍यात म्हणजे, कुठलाही एक नियम राज्यपक्षी निवडण्यात लागू झालेला दिसत नाही. संस्कृती, परंपरा, रूढी, साहित्य, रुची अशा अनेक गोष्टींचा विचार झालेला दिसतो.

मग राज्यपक्षी निवडण्यामागे काही संकेत (प्रोटोकॉल) अथवा नियमावली आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. याबाबत कुठलीच मार्गदर्शक तत्त्वे उद्‌धृत केलेली आढळत नाहीत. त्या त्या राज्याच्या वन विभागाचे प्रमुख वाइल्ड लाइफ बोर्डाचे सदस्य व वनमंत्री व सचिव यांच्या संमतीने असे पक्षी, प्राणी, फूल व वनस्पती निश्‍चित केले जातात. सहसा या मानचिन्हांमध्ये महत्त्वपूर्ण बदल तसे कारण घडल्याशिवाय केला जात नाही. पूर्वीचे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांची विभागणी होऊन नवी राज्ये निर्माण करण्यात आली, तेव्हा असे सबळ कारण निर्माण झाले होते. पण काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा राज्यपक्षी बदलण्याचा प्रस्ताव काही संस्थांनी मांडला होता. हरियलऐवजी "फॉरेस्ट आऊलंट' किंवा वनपिंगळा या पक्ष्याचे नाव पुढे करण्यात आले, पण वाइल्ड लाइफ बोर्डाच्या सभेने तो आवाजी मतदानाने नामंजूर केला. यानिमित्ताने राज्यपक्षी या संकल्पनेकडे समाजाचे लक्ष वेधले गेले, ही एक चांगली गोष्ट झाली.

हरियल अत्यंत सुंदर "दिसणारा' पक्षी आहे. मी मुद्दामच दिसणारा हा शब्द वापरला. कारण मला अनेकांनी सांगितले आहे, की आपला राज्यपक्षी अत्यंत सुंदर व "रुचकर' लागतो. महाराष्ट्राची संत परंपरा आपल्याला "जे जे भेटे भूत, त्यास मानिजे भगवंत' असे शिकवते. मग राज्यपक्ष्याची शिकार करणाऱ्यांची गय आपण काय म्हणून करतो? आज आपण राज्यपक्षी बदलण्यापेक्षा आहे त्याच हरियल पक्ष्याला अभय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध होणे गरजेचे आहे. हरियल वाचवायचा असेल तर वड, पिंपळ, औदुंबर असे जुने वृक्षदेखील संरक्षित करावे लागतील. त्याच्यासोबत अनेक इतर प्राणी-पक्षी वाचतील. एक परिसंस्था सुरक्षित होईल. हरियलच्या विष्ठेतून दूरपर्यंत वृक्षांच्या बिया विखुरतील व रुजतील. "काक विष्ठा करिती, तेथे पिंपळ येती,' हे मोलाचे ज्ञान संत नामदेव महाराजांनी अभंगातून सांगितले. राज्यपक्षी बदलण्यासाठी जोडजमाव व खल करण्यापेक्षा अभंगवाणीचा लक्षपूर्वक अभ्यास केला तर सामाजिक बांधिलकी, सहिष्णुता व निसर्ग संरक्षण व संवर्धन होणार आहे.

(लेखक पक्षिनिरीक्षक आहेत.)


0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...