बगळ्यांचा मूक कल्लोळ

प्रेमसागर मेस्त्री - रविवार, २६ जून २०११,लोकसत्ता 

बगळे ज्या झाडांवर आपली घरटी बांधतात, आपल्या वसाहती स्थापन करतात. अशा वसतिस्थानाला ‘सारंगागार’ असे म्हणतात. अशी सारंगागारे असणारी झाडे रायगड जिल्ह्य़ात  बऱ्याच ठिकाणी आढळतात. यात विस्तीर्ण चिंच, डेरेदार आंबा, उंबर, बांबू असे वृक्ष असतात. पण आजकाल ही झाडे  तोडली गेली आहेत. सारंगागारे कमी होत आहेत. त्यामुळे बगळ्यांची संख्या रोडावत चालली आहे. बगळे आपल्या अन्नसाखळीतले रखवालदार आहेत. त्यांची वसतिस्थाने शाबूत ठेवण्याचे प्रयत्न तातडीने झाले पाहिजेत..
संध्याकाळच्या आभाळातून पांढऱ्याशुभ्र रंगाच्या पक्ष्यांची रांग संथपणे थोडी तिरकी जाताना आपण नेहमी बघतो. हा पक्ष्यांचा थवा पुढच्या बाजूला निमुळता बाणाच्या टोकाप्रमाणे झालेला असतो. गावा-शहरांमधल्या भर वस्तीतल्या डेरेदार आंबा-चिंचेच्या झाडांवर ही पक्ष्यांची रांग रांगोळी काढत घिरटय़ा घालत आकाशातून मग झाडावर विसावते, तेव्हा या पक्ष्यांचे थवे संपूर्ण झाड श्वेत रंगांनी उधळून टाकतात. लहानपणापासून तीन रंगांचे पक्षी आपल्याला चांगलेच शिकविले जातात. एक म्हणजे हिरवा राघू, काळा कावळा आणि पांढरा स्वच्छ बगळा. उंच-लांब मान, टोकदार चोच आणि पांढराशुभ्र रंग यामुळे बगळ्याकडे सहज लक्ष आकर्षित होते. बगळ्यांचे त्याच्या आकारावरून छोटा बगळा, मध्यम बगळा आणि मोठा बगळा असे प्रकार पडतात. त्याच्या सवयींवरूनही काही प्रकार पडले आहेत. म्हणजे काही ठरावीक प्रकारचे बगळे शेतकरी जमीन नांगरत असला की त्याच्या मागे हिंडतात, तर कधी गायीगुरांवर पाठीवर बसून त्यांना सोबत करतात. अशा बगळ्यांना ‘गाय बगळा’ म्हणतात; तर कधी एकाग्र होऊन गवतामध्ये कीटक खाण्यात मग्न असलेले ‘भुरावंचक’ आणि ‘रात्रींचर’ हे दोन प्रकारचे बगळेदेखील नजरेस पडतात. शिवाय आकाराने भरपूर मोठा व स्थलांतर करून येणारा राखी रंगाचा ‘राखी बगळा’ इत्यादी अनेक प्रकार या पक्ष्यांच्या प्रजातीत आहेत.
बगळे समूहाने राहणे, वसाहती करणे, समूहाने उडणे पसंत करतात. त्यामुळे चटकन शेतात व नदीकाठी किंवा झाडांवर त्यांची उपस्थिती आपले लक्ष वेधून घेते. समूहाने राहणारा हा पक्षी तसा लाजाळू आहे. कबूतर- मैनेप्रमाणे गहू वा चणे टाकले तर बगळा लगेच पुढे येत नाही. मानवी वस्तीमध्ये आपली वसाहत स्थापन करूनही तो माणसांपासून घाबरतच जगतो. बगळ्याचे सारे आयुष्य पाणी आणि पाणथळीच्या जागा, पाणथळ मैदाने या परिसंस्थेशी निगडित आहे. संध्याकाळी पाणवठय़ावर शांतपणे आपल्या शिकारीत मग्न असलेल्या थव्यांतून कोणतरी एक बगळा मोठ्ठय़ाने क्ववऽऽक् क्वाऽऽक् करीत ओरडत उडतो आणि काही क्षणांतच सगळे बगळे आसमंतात झेपावतात. एवढेच काय ते त्याचे ओरडणे. भांडणे नाही, आरडाओरडा नाही, शांतपणे मासे गिळंकृत केले तर शिकार करण्याचा रुबाब नाही. त्याच्या नजरेत तीक्ष्णपणा आहे, पण गरुड-ससाण्यासारखी भेदकता व दरारा निर्माण करणारा भाव त्यात नाहीत. लबाड लांडगेपणा करायचा आणि समूहाने गोंगाट करीत उंदीर मेला असेल तरी जणू काय वाघ आलाय असा आव आणत काव-काव करीत गाव गोळा करणारा गोंधळ आणि काळेपणा बगळ्यांच्या स्वभावात नाहीच नाही.
अगदी झाडावरची सुकी काडी तोडून घरटे बांधण्यासाठी नेतानादेखील अपराधीपणाने मान मोडून घेणारा बगळा पावसाच्या तोंडावर आपले घरटे बांधायला सुरुवात करतो. मग एप्रिल-मेच्या कालावधीत मध्यम बगळा पिसांनी फुलन जातो. नर बगळ्याला  मोरासारखी, पिसारा फुलवून मादीला आकृष्ट करण्यासाठी पिसे येतात. मीलनाच्या काळात पक्ष्यांच्या पिसांमध्ये व रंगांमध्ये खूप बदल होतात. पक्ष्यांच्या प्रजोत्पादनाचा हा कालावधी ‘विणीचा हंगाम’ म्हणून ओळखला जातो. या विणीच्या काळात काही बगळ्यांना तुरा येतो, तर गायबगळ्याचे डोके आणि मान तसेच पाठीवरचा भाग नारिंगी रंगाचा होतो. काही बगळ्यांच्या चोच आणि डोळा यामधल्या कातडीचा रंग मोरपिशी-निळा किंवा सोनेरी-पिवळा होतो. ईस्टर्न ग्रे हेरॉन वा राखाडी समुद्री बगळा तर पूर्ण पांढरा स्वच्छ होतो. असे विविध रंग, तुरा, पिसे असा मेकअप करून नर बगळे मादीला आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतात. ते मोरासारखा थुई थुई नाच करीत नाहीत व कांडय़ा करकोच्याप्रमाणे मादीभोवती पिंगा घालीत नाहीत. राजहंसाप्रमाणे पाण्यावर नृत्याची आराधनाही करीत नाहीत. कारण स्वभावच तसा लाजाळू, चारचौघात कुणी बघितलं तर काय? मग जरा काळोख झाला की हळूच फांदीवरील टोकावर, पानांच्या पुंजक्यावर जाऊन पिसारा फुलविणे वा तलावाकाठी मादीपाठोपाठ धावणे.. तेही आपल्या आवाक्यात जितके असेल तेवढेच!
बगळ्यांचे हे थवे एप्रिलमध्ये रंग बदलताना दिसतात. बराच वेळा ते तलावाकाठी एकत्र थांबलेले दिसतात. त्यातले जुने बगळे किंवा बाबा, आजोबा असलेले बगळे एक पारंपरिक झाड निवडायचा प्रस्ताव समूहासमोर ठेवतात. पारंपरिक जुने झाड, ज्याच्यावर गेली अनेक वर्षे त्यांच्या पूर्वजांपासून आतापर्यंत पिढय़ान् पिढय़ा यशस्वी जन्माला आल्या, मोठय़ा झाल्या, असे डेरेदार वृक्ष ते निवडतात.
बगळे ज्या झाडांवर आपली घरटी करतात, आपल्या वसाहती स्थापन करून पुढच्या पिढीला जन्म देतात, त्यांचे संगोपन करतात, अशा वसतिस्थानाला ‘सारंगागार’ असे म्हणतात, (इंग्रजीत Heronories). अशी सारंगागारे असणारी झाडे रायगड जिल्ह्य़ात बऱ्याच ठिकाणी आढळतात. यात विस्तीर्ण चिंच, डेरेदार आंबा, उंबर, बांबू हे वृक्ष असतात. पण आजकाल ही झाडे ज्या ठिकाणी तोडली गेली आहेत, त्या ठिकाणी शेजारीच जर रेन ट्री, वड, फणस वा इतर मोठे वृक्ष असतील तर त्यावर या वसाहती नव्याने करण्याचे प्रयत्नही बगळे करत आहेत.
या वर्षी पाऊस जरा उशिराच आला, पण असे आपण म्हणतो. बगळ्यांना मात्र अगोदरच ठाऊक असावे, म्हणून त्यांनी मे महिन्याच्या मध्याला घरटी बांधायला सुरुवात केली. महाडमध्ये १९९८ मध्ये   भाऊ काटदरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोकण पक्षी मित्र संमेलन’ घेण्यात आले. त्या वेळी पक्षीसूची आणि पक्षीगणना करताना
बगळ्यांची १३८३ घरटी मोजण्यात आली. यावरून नुसत्या महाडमध्ये अडीच हजारांवर बगळ्यांची गणना केली गेली. मात्र गेल्या २००५ ते २००६ च्या वर्षांत बगळ्यांची गणना फक्त ३०० च्या घरात आल्याचे जाणवले आणि ही धक्कादायक नोंदणी बघितल्यावर बगळ्यांचा अभ्यास व संवर्धनाचे प्रयत्न चालू झाले.
यावेळी बगळ्यांची सारंगागार म्हणजे घरटय़ांची ठिकाणेच तोडल्याचे निदर्शनास आले. वाढत्या शहरीकरणाचा व व्यापाराचा ताण पक्ष्यांच्या वसाहतीवर इतका भयानक झालाय, हे आम्ही मुळी समजूनच घेतले नाही. एकतर नद्यांची गटारे करून टाकली आहेत. मोठमोठी वृक्षसंपदा जमीनदोस्त करून बिल्डिंग्ज, कॉम्प्लेक्स, हाऊसिंग सोसायटय़ा, घराची नूतनीकरणे यामध्ये पशुपक्ष्यांच्या घरटय़ांचा, वृक्षांचा विचार करतोय कोण?
मग निसर्गसंस्थांचे तोकडे प्रयत्न चालू झालेत.  सह्य़ाद्रीमित्र, सीस्केप या संस्था आणि पत्रकार दीपक शिंदे यांच्या मदतीने जवळपास ३८ गावांचे सर्वेक्षण आम्ही केले. यामध्ये असे आढळले की, सारंगागारे ही बऱ्याच्या ठिकाणी मालकी हक्काच्या जागेत आहेत. त्या मालकांना या बगळ्यांच्या विष्ठेचा त्रास होतो. घरटय़ातून कधी अंडी, कधी पिल्ले खाली पडतात, यांचा सडका-कुजका वास येतो. शिवाय बगळे घरटय़ामध्ये पिलांना भरविण्यासाठी मासे आणतात. प्रत्येक घरटय़ात ३-४ पिल्ले असतात. एका झाडावर जर ६० ते ८० घरटी असतील, तर २४० मासे त्या घरटय़ांवर एकदा तरी आणले जातात. त्यातले ५० जरी मासे खाली पडले, तरी त्यांचा कुजका वास येतो. अशा त्रासामुळे काही ठिकाणी घरटी काढून टाकली जातात. बगळ्यांना दगड मारून हाकलून दिले जाते, अन्यथा फटाके वाजवून बगळ्यांना पळवून लावले जाते. या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक तर ती वसाहत निकामी होत आणि दुसरे घरटे करण्यासाठी डेरेदार जुनी झाडे बगळ्यांना मिळत नाहीत. पर्यायाने जागा सोडणे किंवा वीण न करणे इत्यादी अनेक पर्यायांचा गांभीर्याने विचार करून आम्ही काही जास्त घरटी असणाऱ्या सारंगागारांचे संरक्षण करण्याचे ठरविले. त्या मालकांना भेटून त्यांच्या अंगणात पडलेली घाण वा परसात पडलेला कचरा साफ करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे आम्ही शक्य होईल तितक्या ‘हेरॉनरीज’ संरक्षित केल्या. पण असे साफसफाईचे काम किती गावांतून आपण किती वेळा करू शकतो, हाही एक प्रश्नच आहे. मला एक आश्चर्याची गोष्ट वाटते की, आपले अंगण, आपला परिसर आपण स्वत: साफ करायला नको? प्रत्येकाने हा विचार केला तर?..
काही मालकांनी आम्हाला फारच सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘तुम्ही इतक्या लांबून येऊन घाण साफ करता, यावरून आम्हाला विषयाचं गांभीर्य कळलंय’, असे मतही काहींनी व्यक्त केले. बगळ्यांच्या पिल्लांचा किचकिच आवाज रात्रभर ऐकू येतो आणि आम्हाला झोप लागत नाही, अशी तक्रार करून झाडावर बगळे आले की फटाके लावून आपण कसे त्यांना हाकलण्यात यशस्वी झालो, ही कथा रंजकपणे सांगणारे महाभागही भेटतात.
बगळे आपल्याला फार आवश्यक असे अन्नसाखळीतले रखवालदार आहेत. जिथे कीटकनाशकांचा थेंब पोहोचू शकत नाही, अशा खोडे आणि पानांमधली घट्ट जागा कीटकांनी भरलेली असते. त्या जागा आणि तिथपर्यंत पोहोचून त्यांना खाण्याचे काम फक्त बगळे आणि काही पक्षी रोज दिवसभर न चुकता, कोणताही पगार न घेता करतात आणि आपली शेती निरोगी ठेवतात. जमीन नांगरणीच्या वेळेपासून ते आपल्या कामावर न बोलवता हजर होतात, ते अगदी कापणी-झोडणीपर्यंत शेतकऱ्याला संरक्षण देण्याची जबाबदारी यशस्वी पार पाडतात. अशा या गरीब पक्ष्यांच्या अस्तित्वाचा जर प्रश्न आला तर त्याला जगवणे, पर्यायाने त्याचे घरटे संवर्धित करणे, त्या घरटय़ांची वसाहत ज्या वृक्षांवर आहे, त्या वृक्षांना संरक्षण देणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या सर्वाच्या प्रयत्नानेच ‘सारंगागार’ (हेरॉनरीज) वाचू शकतील.

जर आपल्या परसात, अंगणात वा रस्त्यावर बगळ्यांची वसाहत असलेली सारंगागारे पांढरी रांगोळी काढत असतील, तर संपर्क साधा- ९४२२६८९३५१/ ९६५७८६४२९० या क्रमांकावर. आम्ही आपल्या भेटीस येऊ.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...