मासे मेल्याचं दु:ख आहेच,अन्..

अभिजित घोरपडे, गुरुवार, ९ जून २०११,


पुण्याजवळ रावेत येथे पवना नदीच्या पात्रात दोनच दिवसांपूर्वी हजारो मासे मरून पडले. त्यामागचे नेमके कारण काही दिवसांनी स्पष्ट होईल किंवा कदाचित होणारही नाही. पण प्राथमिक अंदाजानुसार, कोणत्या तरी कारखान्यातून नदीत सोडण्यात आलेल्या दूषित पाण्याचाच हा परिणाम! कारण त्या दिवशी अचानक पाण्याचा रंग लालसर बनला, गढूळपणा वाढला, त्याला दुर्गंधी येऊ लागली आणि मासेसुद्धा मरून पडल्याचे प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट दिल्यावर पाहायला मिळाले. राज्यभरातील बहुतांश नद्यांची पात्रे भयंकर प्रदूषित झालेली असताना, रावेत येथील पवनेच्या पात्राचे वैशिष्टय़ असे, की तिथे नदीचे पाणी स्वच्छ आहे. विशेष म्हणजे येथूनच पिंपरी-चिंचवड शहरासाठी पिण्याचे पाणी उचलले जाते. त्यामुळे या बऱ्यापैकी नैसर्गिक स्थितीत असलेल्या नदीच्या पात्रात मासे मरणे ही निश्चितच चिंताजनक घटना! हा प्रकार इतका गंभीर होता, की गेल्याच मंगळवारी (७ जून) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पात्रात प्रदूषणाचा तवंग आणि मेलेल्या माशांचा थर जमा झाला होता. त्यात विविध प्रकारचे स्थानिक मासे, नदीतील वाम, झिंगे आणि काही प्रमाणात खेकडेसुद्धा होते.
अर्थात, आपल्याकडील नद्यांची सद्य:स्थिती पाहता पावसाळ्याच्या तोंडावर मासे मरणे ही काही दुर्मिळ घटना नाही. आता हा प्रकार पवनेच्या पात्रात घडला, तसाच तो कधी कृष्णेच्या पात्रात घडतो, कधी गोदावरीच्या पात्रात, कधी कोल्हापूरच्या पंचगंगेत, कधी उस्मानाबाद जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या तेरणेमध्ये, तर कधी नागपूर जिल्ह्य़ात कन्हान नदीतसुद्धा! नदीत ठिकठिकाणी साचून राहिलेले प्रदूषित घटक पावसामुळे पुढे वाहत जातात. त्यामुळे मासे मरतात. किंवा दुसरे कारण म्हणजे पावसामुळे नदीला पाणी आल्यावर कारखाने व पालिका-महापालिकासुद्धा आपले प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता तसेच नदीत सोडतात. मग हे पाणी माशांचा बळी घेते. त्यामुळेच पवनेत घडलेली घटना ही सुरुवात आहे. ही बेशिस्त अशीच सुरू राहिली तर इतरही नद्यांच्या पात्रातून मासे मेल्याचे ऐकायला मिळेल. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासारख्या यंत्रणासुद्धा त्याच्याकडे कितपत गांभीर्याने पाहतात, हा प्रश्नच आहे. कारण दर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यातसुद्धा ठिकठिकाणी अशा घटना घडत होत्या; अजूनही त्या घडतच आहेत. त्यापैकी एखाद्याही घटनेचा तपास तडीस नेल्याचे ऐकिवात नाही.
पवना नदीतील मासे मरण्याची घटना आणि इतर ठिकाणी घडणाऱ्या अशाच घटनांमध्ये एक मूलभूत फरक आहे. त्यामुळेच पवनेच्या या घटनेच्या निमित्ताने आणखी काही मुद्दे उपस्थित झाले आहेत. पवनेत मासे मेले आहेत, ते ठिकाण एका मोठय़ा शहराचा प्रमुख जलस्रोत आहे. नदीच्या उगमापासून तुलनेने जवळच ही घटना घडली आहे आणि येथूनच पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरविले जाते. याचा अर्थ असा, की आता प्रदूषण नद्यांच्या उगमांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. नदीप्रदूषण किंवा एकूणच पाण्याचे प्रदूषण ही समस्या आता नवी उरलेली नाही. पण नद्यांची उगमस्थानेसुद्धा प्रदूषणमुक्त राहू नयेत, ही काळजी करण्याजोगीच गोष्ट आहे. किमान उगमाच्या ठिकाणी तरी नद्यांना प्रदूषित होऊ नयेत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र आता नद्यांच्या उगमांच्या ठिकाणी किंवा पाण्याचा साठा जिथे होतो, तिथे कारखाने आणि उद्योग उभे राहत असतील, तरी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. पश्चिम घाटात मोठय़ा प्रमाणात खाणकाम किंवा इतर मोठय़ा प्रकल्पांना परवानगी का द्यायची नाही, यामागे तो प्रदेश दक्षिण भारतातील बहुतांश नद्यांचा उगम असणे हेही एक प्रमुख कारण आहे. संपूर्ण दक्षिण भारताला जे पाणी उपलब्ध होते, त्यात सर्वात मोठा वाटा आहे पश्चिम घाटात पडणाऱ्या धो-धो पावसाचा! त्यामुळेच तर तो प्रदेश संपन्न जैवविविधतेचासुद्धा बनला आहे. या कारणांमुळे, कोयना-चांदोली अभयारण्यांच्या परिसरात नवीन महाबळेश्वरसारखा प्रकल्प किंवा इतर उद्योग येऊ घातलेले असतात, तेव्हा त्यांना विरोध करावा लागतो. आणि याच कारणामुळे धरणांच्या ‘लवासा’सारख्या प्रचंड प्रकल्पांवरही प्रश्नचिन्ह उभे राहते. प्रदूषित घटक पाण्यात मिसळू नयेत यासाठीची काळजी घेतली जाईल, याबाबत कितीही दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र विपरीत आहे. नाहीतर रावेतमधील पवनेच्या पात्रात घडलेल्या घटना पुन्हा पुन्हा घडल्याच नसल्या.
अलीकडच्या काळात नद्यांची उगमस्थाने आणि धरणांची पाणलोट क्षेत्रांमधील वनस्पतीआवरण झपाटय़ाने कमी होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. पुणे जिल्ह्य़ातील मुळशी धरण आणि विशेषत: या धरणापासून खालच्या बाजूला वाहणाऱ्या मुळा नदीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात साचलेला गाळ हा त्या भागातील जंगले आणि एकूणच वनस्पती आवरण कसे कमी झाले आहे, याचाच दाखला देतो. शहरांच्या आसपास विकास होण्याचा प्रदेश हा दूरवर पोहोचतो. तसाच तो हळूहळू धरणांचे पाणलोट व नद्यांच्या उगमांपर्यंतही सरकत आहे. तो कुठपर्यंत सरकू द्यायचा, याचाही विचार करावाच लागेल.
..पवनेत मेलेल्या माशांच्या निमित्ताने हे प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण..’ अशी आपल्याकडे म्हण आहेच. या घटनेच्या निमित्ताने ‘मासे मेल्याचे तर दु:ख आहेच आणि काळही सोकावता कामा नये,’ असेच म्हणावे लागेल. आता काळ सोकावणार का? याचे उत्तर मात्र आता कोणती धोरणे राबवली जातात, यावर अवलंबून आहे. आणि हे उत्तर काळच देईल!

abhighorpade@gmail.com

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...